03 October, 2023

 

आकांक्षीत तालुका अंतर्गत आरोग्य मेळावे संपन्न

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, सहायक गटविकास अधिकारी विष्णू भोजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जनसमुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी हिंगोली  तालुक्यात आकांक्षीत तालुका अंतर्गत आरोग्य मेळावे घेण्यात आले.

आयुष्यमान भव मोहिम: अंतर्गत आकांक्षीत जिल्ह्यामध्ये संकल्प सप्ताह 03 ऑक्टोबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी हिंगोली तालुक्यातील सिरसम, फाळेगाव, भांडेगाव, नरसी नामदेव या चार प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत 23 उपकेंद्रांमध्ये तसेच हिंगोली शहरातील दोन नागरी आरोग्य केंद्र व तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आपला दवाखाना असे एकूण 31 ठिकाणी आरोग्य मेळावे घेण्यात आले . या मेळाव्यामध्ये प्रसूतीपूर्व आरोग्य  गरोदर मातांची तपासणी व त्यांचे लसीकरण, बालकांचे लसीकरण, मातांची ॲनिमिया करता तपासणी व त्यांना उपचार करण्यात आले. संसर्गजन्य आजारामध्ये मधुमेह रक्तदाब संशयित कर्करोग यांची तपासणी करण्यात आली. संशयित क्षयरुग्णाची तपासणी करुन त्यांचे थुंकी नमुने घेण्यात आले. आरोग्य शिक्षण व त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

 

*****

 

माजी सैनिक व माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : मराठवाडा पर्यावरण बटालियन, 136 इन्फंट्री बटालियन टी.ए.इको, महार (एमओईएफ) आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या माजी सैनिक आणि माजी महिला कर्मऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महार (एमओईएफ) मध्ये भरतीसाठी दि. 17 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये सोल्जर जीडी-87 पदे, क्लार्क-06 पदे, चिफ कम्युनिटी-01, हाऊस कीपर-01, ब्लॅकस्मिथ-01, मेस कीपर-01, आर्टीसन (Artisan WW)-01 अशा एकूण 98 पदासाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  

या भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवार दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. 17 ऑक्टोबर, 2023 रोजी कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी 6.00 वाजता फिटनेस चाचणीसह सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेच्या एक तास अगोदर म्हणजे पहाटे 5.00 वाजता पोहोचणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*******

 

पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : सध्या सिध्देश्वर व येलदरी धरणाच्या उर्ध्व भागात पर्जन्यमान सुरु असल्याने पाण्याचा येवा होत आहे. सध्या येलदरी प्रकल्प 62.28 टक्के व सिध्देश्वर प्रकल्प 98.81 टक्के भरला आहे.

धरणातील पाण्याचा येवा पाहता धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णा प्रकल्पाच्या सिध्देश्वर धरणातून वक्रद्वाराद्वारे कोणत्याही  क्षणी पाणी  पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी काठच्या परिसरातील गावांच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, जनावरे सोडू नये किंवा कोणतीही जिवित वा वित्तहानी होणार नाही याची  पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी  खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*******

02 October, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 02 :  येथील जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या  सभागृहात  महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, मिलींद वाकळे यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री  यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

01 October, 2023

 

वसमत येथील शासकीय आयटीआय च्या वतीने वसमत शहरात स्वच्छता मोहीम

 





 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत आज दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी बसमतनगर येथील शासकीय आयटीआयच्या वतीने बसमतनगर शहरातील प्रमुख बसस्थानक व उपजिल्हा रुग्णालय या दोन ठिकाणी संस्थेतील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील केर कचरा व इतर अनावश्यक वस्तू उचलून परिसर स्वच्छ करण्यात आले.

या स्वच्छता अभियानामध्ये संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार, बसस्थानक प्रमुख तऱ्हाळे व  वैद्यकीय अधीक्षक डॉ. काळे यांनीही अभियानामध्ये सहभाग नोंदवून स्वच्छता केली.

यावेळी संस्थेतील निदेशक डी.आर.कौरवार, डि.के. बुंदेले, आर. एन. कानगुले, एल. टी. हनुमंतकर, पी. व्ही. वानखेडे, एन. एच. वायवळ, आर. एल. कंधारे, कार्यालयातील कर्मचारी आर.जे. शहारे, एन. एस. भालेराव, बी. टी.  गायकवाड, सोळंके, साळवे व मेस्को कर्मचारी मुनीर यांनीही या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन योगदान दिले.

 

*****

 

 

सामाजिक न्याय विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 


            हिंगोली (जिमाका), दि. 01 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने हिंगोली येथे आज सकाळी ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सकाळी 7.30 वाजता हिंगोली शहरात वसतिगृहाचे विद्यार्थी व सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी श्रमदान करुन स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात करण्यात आला.

या ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघटना उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक अध्यक्ष अशोक तेरकर, महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कारार्थी बबनजी शिखरे, विक्रमजी जावळे  ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. एल. पोपळाईत, बाळापूर येथील शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. टी. कन्नावार, आर. एन. व्यवहारे, उमग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयाजीराव पाईकराव, जेष्ठ नागरिक खुर्शीद मिया पठान, सरस्वती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा ताराताई खंदारे, डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी धम्मदीप नरवाडे, सिध्दार्थ गोवंदे, श्रीकांत कोरडे, विशाल इंगोले इत्यादी उपस्थित होते.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक इंगोले यांनी केले. 

            या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनी कु.प्रेरणा राहुल ढेंबरे व कु.संध्या लिंबाजी हातागळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या विषयावर गीत गायन केले.

            यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रादेशिक अध्यक्ष अशोक तेरकर यांनी जेष्ठ नागरिकांच्या व्यथा व वृध्दापकाळात जीवन कसे जगावे यावर सखोल मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय समारोपामध्ये सहायक आयुक्त राजू एडके यांनी ज्येष्ठ नागरिकासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रं. 14567 सुरु असल्याचे उपस्थितांना अवगत करुन देऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ज्येष्ठ नागरिकांचे अडचणीसाठी सदैव तत्पर असल्याचे मनोगत व्यक्त केले.

            यावेळी उपस्थित 200 ते 250 ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालय, हिंगोली यांचे आरोग्य पथकाने आरोग्य तपासणी व दंत तपासणी करण्यात आली.

            कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी अनमोल सहकार्य केले.

********

 

 

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत नरसी येथे महा श्रमदान

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांचा सहभाग

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  हिंगोली तालुक्यातील नरसी येथील  संत शिरोमणी  नामदेव महाराज मंदिर परिसरात व कयाधु नदी घाटावर  मुख्य कार्यकारी अधिकारी  संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत "एक तारीख एक तास महाश्रमदान" कार्यक्रम राबविण्यात आला.

या महा श्रमदान कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यांमध्ये नरसी नामदेव पर्यटन स्थळ, मंदिर परिसर , मंदिराचा मुख्य रस्ता, मुख्यद्वार व मंदिर परिसर, कयाधू नदी घाटावर मोठ्या प्रमाणात महाश्रमदान करण्यात आले. महा श्रमदान कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी अधिकारी व तसेच नरसी ग्रामपंचायत मधील कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक महिला, बचत गटातील प्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक,  सेवक व गावातील महिला, गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयजी दैने व त्यांच्या  पत्नी अनघा संजय दैने एक घंटा स्वच्छतेसाठी श्रमदान केले.  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत येथील सर्व गावात जिल्हा, तालूका, ग्राम स्तरावरील सर्व ग्रामपंचायतीमध्ये महाश्रमदान राबविण्यात आले आहे. यामध्ये नरसी गावातील  आलेल्या स्वयंसेवकाचां संजय दैने व अनघा संजय दैने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.  तसेच सर्व विभागात विभाग प्रमुख यांनी सुद्धा स्वयंसेवकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानांतर्गत दिनांक 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता ही सेवा"   या वर्षाची थीम ‘‘कचरा मुक्त भारत’’ ही आहे. त्याचाच एक भाग म्हणून   "एक तारीख एक तास  महाश्रमदान " जिल्ह्यामध्ये यशस्वी राबविण्यात आले. तसेच नरसी  येथे सर्व विभागातील विभाग प्रमुख, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आत्माराम बोंद्रे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग वाटेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व  ग्रामीण भागातील तसेच  स्वच्छता उपक्रमाचा दृश्यमान परिणाम दिसण्याच्या दृष्टीने महा श्रमदान राबविण्यात आले आहे.

*****