30 April, 2024
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण समारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 30 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान, हिंगोली येथे राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित या मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोषाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, शैलेश वाईकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
********
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी घेतला हिंगोली जिल्ह्याचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात दि. 29 एप्रिल रोजी पुणे येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय कुमार जठार, राज्य आरोग्य शिक्षण अधिकारी प्रशांत तुपकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील देसमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी सुवर्णा महाले, जिल्हा लेखा व्यवस्थापक शंकर तावडे, अनिता चव्हाण, ज्योती बांगर, मनीषा वडकुते, पारडकर, उद्धव थिटे, सुनील मुनेश्वर, अझर अली, बापू सूर्यवंशी, नरेश पत्की आदी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कर्मचाऱ्यांना गावपातळीवर काम करतांना येणाऱ्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्याचे निरसन करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी काम करावे. जागतिक महामारी कोविडमध्ये हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी व जनजागृती बाबत वेगळीच ओळख करून दिली आहे. हिंगोली जिल्ह्याने कोविडमध्ये उत्कृष्ट काम केले. विविध योजना व आरोग्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळागाळापर्यंत प्रसिद्धी व जनजागृती करावी. आरोग्याच्या सर्व योजनांची प्रसिध्दी व जनजागृती गावपातळीवर तळागाळापर्यंत करावी आणि सर्वसामान्य जनतेंना त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशा उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर यांनी बैठकीमध्ये दिल्या.
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाच्या पथकाची
जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआयसीयूसह सर्व विभागास भेट
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी त्यांच्या पथकातील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय कुमार जठार, राज्य आरोग्य शिक्षण अधिकारी प्रशांत तुपकरी यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआयसीयूसह सर्व विभागास भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके साहेब, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपक मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड आदी उपस्थित होते.
*******
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 10 मे रोजी मुलाखतीचे आयोजन
हिंगोली (जिमाका),दि. 30 : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 20 मे, 2024 ते 29 मे, 2024 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 57 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी हिंगोली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 10 मे, 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी-57 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावेत. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.
उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टीफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी ई-मेलद्वारे प्रशिक्षण केंद्रास दि. 15 मे, 2024 पर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तर प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण केंद्रामध्ये दि. 19 मे, 2024 रोजी सकाळी 10 वाजता पोहोचणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
29 April, 2024
उष्माघातात नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
काय करावे :
• उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
• तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
• हलकी, पातळ व सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
• जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
• शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
• अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
• गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
• घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
• पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
• कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
• सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळणसाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.
• पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
• गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
काय करू नये :
• लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
• दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
• बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.
• उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)
• शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इत्यादींचा वापर टाळावा.
• शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins) असलेले अन्न टाळावे.
*******
27 April, 2024
हिंगोली लोकसभा मतदार संघात 63 टक्के मतदान
• किनवट विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान
• हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक
• पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी
हिंगोली,(जिमाका) दि.27: हिंगोली लोकसभा मतदार संघात शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 63.54 टक्के मतदारांनी मतदान केले, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 62.54, हदगाव 65.53, हिंगोली 59.92, कळमनुरी 63.60, किनवट 65.86 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात 64.37 टक्के मतदान झाले आहे.
ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली, श्री. कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. आर. जयंथी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली.
यामध्ये विधानसभानिहाय एकूण मतदार आणि झालेले मतदान याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
82-उमरखेड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 1 लाख 5 हजार 984 पुरुष, 90 हजार 743 महिला तर एका तृतीयपंथी मतदारामध्ये समावेश आहे. 83-किनवट विधानसभा मतदार संघात 1 लाख 77 हजार 258 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 93 हजार 655 पुरुष, 83 हजार 601 महिला, तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 84-हदगाव विधानसभा मतदार संघात 1 लाख 90 हजार 338 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 2 हजार 997 पुरुष, 87 हजार 338 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.
तर हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 94 हजार 89 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 7 हजार 691 पुरुष, 86 हजार 397 महिला तर एका तृतीयपंथी मतदाराने आपल्या मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 2 हजार 845 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 11 हजार 196 पुरुष, 91 हजार 648 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 1 लाख 93 हजार 700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 6 हजार 781 पुरुष, 86 हजार 918 महिला आणि एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 18 लाख 17 हजार 734 मतदारांपैकी 11 लाख 54 हजार 955 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 6 लाख 28 हजार 302 पुरुष, 5 लाख 26 हजार 644 महिला आणि 9 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 83-किनवट विधानसभा मतदार संघ (65.86 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (59.92 टक्के) सर्वात कमी राहिले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात 25 तृतीयपंथी मतदारांपैकी 9 जणांनी या राष्ट्रीय कर्तव्यात आपला सहभाग नोंदवला.
किनवट विधानसभा मतदारसंघाच्या सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी श्रीमती कावली मेघना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी, श्रीमती क्रांती डोंबे, डॉ. सचिन खल्लाळ, डॉ. सखाराम मुळे, अविनाश कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुखांनी प्रयत्न केले.
निवडणुकीचा दुसरा टप्पा
देशात दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यात विदर्भातील यवतमाळ-वाशीम, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा या पाच आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता.
*****
जिल्हा हिवताप कार्यालयात जागतिक हिवताप दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील जिल्हा हिवताप कार्यालयात नुकताच जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, तसेच आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासून होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. सर्वांनी एकाच वेळी एकदिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित केला आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आणि जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
या वर्षाचे घोषवाक्य ‘मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी’ असे आहे. भारतामध्ये सन 2016 ते 2030 पर्यंत हिवताप दूरीकरण करण्याचे लक्ष ठरविले आहे, त्याबाबतचे ध्येय व नियोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावे, हिवताप आजार होऊ नये यासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, घरातील पाणी साठ्यांना घट्ट झाकणे लावावीत, घरावरील, घराभोवती पडलेले भंगार सामानाची विल्हेवाट लावावी, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे
हिवताप आणि त्याचा प्रसार
हिवताप हा आजार प्लाझमोडीअम या परोपजीवी जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे 30 ते 50 कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात.
डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते. हिवतापाचा प्रसार अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या यकृतमध्ये जात त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला ताप येते.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
डासांच्या नियंत्रणासाठी घरगुती वापरातील पाण्याचे हौद, टाक्या, बॅरल, रांजण, आठवड्यातून किमान एकदा पुसून कोरडे करावेत. त्यांना घट्ट झाकणे बसवावीत, कापडाने बांधावीत. डबकी बुजावीत, पाणी वाहते करावे, साठलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत. घरातील भंगार सामान निरुपयोगी टायर्सची विल्हेवाट लावावी. कुलर, चायनीज प्लँट व फ्रिजचा ड्रीप पॅन स्वच्छ ठेवावा. शौचालयाच्या नादुरुस्त सेप्टीक टँक दुरुस्त कराव्यात. शौचालयाच्या व्हेन्ट पाईपला जाळी बसवावी अथवा कापड बांधावे. वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा.
ताप आल्यास रक्त नमुना तपासून घ्यावा. आवश्यक औषधोपचार घ्यावा. हिवतापाने निदान व औषधोपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. हिवताप नियंत्रणासाठी हिवताप निदान व उपचार महत्वाचे आहेत.
अॅनाफिलिस डासांमुळे हिवतापाचा प्रसार होतो. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. उदा. पाण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या, डबके, छतावरील पाणी, भातशेतीतील पाणी कॅनॉल, नदी, नाले, ओबे, इत्यादी. अॅनाफिलिस द्वारा एडीस डासांमुळे या आजारांचा प्रसार होतो. हे डास घरगुती स्वच्छ पाण्यात म्हणजेच हौद, बॅरल, रांजण, पाण्याच्या टाक्या, पायनिज प्लॅट डेस कुलर, फ्रिजचा दिप सामान टावरमध्ये साठलेले पाणी यामध्ये तयार होतात. एडीस डास, क्युसेक्स डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. हे डास शौचालयाच्या सेप्टीक टँक, तुंबलेली गटारे, ड्रेनेज लाईन, अस्वच्छ पाण्यात तयार होतात.
हिवतापाची लक्षणे व औषधोपचार
थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, ताप नंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. याबाबत प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करावी. हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासून करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतू आढळतात.
ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाने आपला रक्त नमुना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासून घ्यावे. हिवताप दूषित रक्त नमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळ्याचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशीपोटी घेऊ नये. गर्भवती स्त्रियांनी प्रायमाक्वीन औषधी घेऊ नये व शून्य ते एक वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देऊ नये.
हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना
आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. आतील बाजू व तळ घासूनपुसून कोरड्या करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणीने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी आदीची वेळीच विल्हेवाट लावा. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
*********
Subscribe to:
Posts (Atom)





