30 April, 2024
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 10 मे रोजी मुलाखतीचे आयोजन
हिंगोली (जिमाका),दि. 30 : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 20 मे, 2024 ते 29 मे, 2024 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 57 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी हिंगोली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 10 मे, 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी-57 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावेत. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.
उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टीफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी ई-मेलद्वारे प्रशिक्षण केंद्रास दि. 15 मे, 2024 पर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तर प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण केंद्रामध्ये दि. 19 मे, 2024 रोजी सकाळी 10 वाजता पोहोचणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment