20 April, 2024
हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा
हिंगोली (जिमाका), दि. 20 : राष्ट्रीय हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर हिवताप आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना व अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. हिवताप हा किटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर आजार आहे. गर्भवती महिला व बालकांना हिवतापापासून सर्वाधिक धोका संभवतो वेळीच उपचार घ्यावा.
आवश्यक उपाययोजना :
कीटकनाशक, आळी नाशकाची, डासोउत्पत्तीस्थानामध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडणे, डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंप साठे व्यवस्थित झाकून ठेवावे, इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नये, वैयक्तिक सुरक्षतेसाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्तीचा वापर, घरांच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावणे, घराच्या सभोवतालील परिसरामध्ये पाण्याची डबके साचू देऊ नये. ते वाहते करावी किंवा त्यामध्ये जळके ऑइल किंवा रॉकेल टाकावे, नारळाच्या करवंट्या, टायर्स, फुलदाण्या, कुलर्स यामध्ये पाणी साचू देऊ नये.
कोरडा दिवस पाळा, हिवताप, डेंगू आजार टाळा :
आठवड्यातून एक दिवस शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. या दिवशी आपल्या घरातील सर्व पाणी साठा स्वच्छ पुसून कोरडे करून त्यामध्ये पाणी भरावे. जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे आणि हिवताप, डेंगू आजार टाळावा, असे आवाहनही जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment