18 April, 2024
निवडणूक निरीक्षकांची माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षाला भेट
हिंगोली (जिमाका), दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट देत पाहणी केली. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली आणि कमलदीप सिंह यांनीही उपस्थित राहून माहिती घेतली.
श्रीमती एम. एस. अर्चना यांचे संपर्क अधिकारी सुनिल शिंदे, श्री. अन्वर अली यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ, श्री. कमलदीप सिंह यांचे संपर्क अधिकारी सुशांत उबाळे, जिल्हा माध्यम व प्रमाणन सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, समितीचे सदस्य प्राचार्य सुरेश कोल्हे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, माध्यम कक्षातील श्रीमती आशाताई बंडगर, कैलास लांडगे, श्रीमती जयश्री नाईक, परमेश्वर सुडे, नवनाथ ठोंबरे आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमांमध्ये येणारे वृत्त वाचन करून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ते निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकीसंदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करुन देणे आदी बाबींची माहिती घेतली. तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांकडून समाज माध्यमांवर करण्यात येणाऱ्या पोस्टबाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांना निवडणूकविषयक विविध आढावा बैठकांचे वृत्त, पत्रकार परिषदांचे आयोजन, वृत्तपत्रांतील वृत्ताचे संकलन करून त्यावर आवश्यक कार्यवाही करणे, निवडणूकविषयक बातम्यांबाबत अहवाल तयार करून तो भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.
जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्ष, सीव्हिजील कक्षास भेट
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली आणि कमलदीप सिंह यांनी जिल्हा नियोजन कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन पाहणी केली. पथक प्रमुख सुधाकर जाधव यांनी जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाकडे 1950 हा निशुल्क दूरध्वनी क्रमांक आहे. हे संपर्क व तक्रार निवारण केंद्र निवडणूक कालावधीमध्ये 24X7 सुरु असून, तक्रार निवारण कक्षातील कार्यान्वित 1950 या निशुल्क क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सची तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच सिव्हीजील कक्षासही भेट देऊन माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अब्दुल बारी आदी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment