06 April, 2024
निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
हिंगोली (जिमाका), दि. 06 : लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी-कर्मचारी (पोलींग पार्टी) यांची आज निवडणूक निरीक्षक श्रीमती एम.एस अर्चना यांच्या उपस्थितीत सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली.
यावेळी खर्च निरीक्षक कमलदीप सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अब्दुल बारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ही सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यातून मतदानाच्या ठिकाणी कोणता अधिकारी-कर्मचारी कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्चित करण्यात आले. यानंतर शेवटची सरमिसळीकरणाची प्रक्रिया ही मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार आहे. तसेच यापुढे कोणत्याही निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यास निवडणूक प्रक्रियेतून वगळणे अथवा ड्युटी रद्द करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक कामी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना पाठविण्यात येते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment