23 April, 2024
जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी दि. 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार भारतामध्ये सन 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी दि. 25 एप्रिल, 2024 रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत डासअळी सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण, ॲबेटींग, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवणे, गप्पी मासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी आरोग्य शिक्षण देणे, गटसभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात.
तसेच हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या कीटकजन्य आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी या मोहीम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकन ठेवावे. नाल्या, गटारे वाहते ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. मच्छरदानीचा वापर करावा, उघड्या खिडक्यांना जाळ्या बसवावेत, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर याची विल्हेवाट लावावी. कुलर फ्रिजच्या ड्रिप पॅनमधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावेत. पाण्याचा हौद, टाक्या, रांजन इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावेत. थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाचे लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून योग्य तो औषध उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment