15 April, 2024
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या पुरवणी बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
हिंगोली (जिमाका), दि. 15 : लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या 2 हजार 572 बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया सामान्य निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात पुरवणी बॅलेट युनिट प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी अब्दुल बारी तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री विजय गाभणे, दशरथ लकडे, विनोद हमणे, गोपाल सारडा आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या पुरवणी बॅलेट युनिटची नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते.
जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघ हिंगोली येथे 343, कळमनुरी येथे 346 व वसमत येथे 328 मतदान केंद्र आहेत. या एकूण 1017 मतदान केंद्रांकरिता 92- वसमत विधानसभा मतदार संघासाठी 802 बॅलेट युनिट, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी 890 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 880 बॅलेट युनिट वितरीत करण्यात आले आहेत.
यानंतर संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया पार पाडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment