06 April, 2024
चुनाव पाठशाला या उपक्रमांतर्गत भरली मतदानाची शाळा
हिंगोली (जिमाका), दि. 06 : 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत कळमनुरी, हिंगोली आणि वसमत विधानसभा क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून ‘चुनाव पाठशाला’ या उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांमध्ये आज मतदानाची शाळा भरविण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातीलच मतदार जनजागृतीचा एक उपक्रम म्हणून जिल्ह्यात मतदानाची शाळा भरविण्यात आली .
यावेळी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे, लोकशाहीत मतदानाचे महत्त्व. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया कशी होते याची प्रात्यक्षिक अनेक शाळांमधून दाखविण्यात आले. 40 टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त अपंगत्व असलेले तसेच 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सेवा यावेळी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. याबाबतची माहिती या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व मतदारांना देण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक शाळांमधून मतदानाची शपथ घेतली गेली. तर काही शाळांनी प्रभात फेरी काढून पोस्टर बॅनरवर घोषणा लिहून मतदार जागृती केली. येथून पुढील काळातही चुनाव की पाठशाला अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी तसेच नवीन मतदारांनी आत्मविश्वासाने आणि भयमुक्त वातावरणात मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम घेतले जाणार असल्याचे स्वीपचे नोडल अधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी सांगितले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तसेच जिल्हा स्वीप समिती सदस्य नितीन नेटके, विजय बांगर, दीपक कोकरे आणि बालाजी काळे यांनी प्रयत्न केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment