15 April, 2024
सुजाण मतदारराजा, तुझं एक मत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी… जेव्हा गृह मतदानासाठी प्रतिनिधी जातात, डोंगर-दरी, धरणाच्या काठावर….!
• ईसापूर धरणाच्या काठावरील गाडीबोरी येथील एका मतदाराचे टपाली मतदान
• कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा येथे तीन किलोमीटर चालत जावून केले टपाली मतदान
हिंगोली (जिमाका), दि 15: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी लोकशाहीचा लोकोत्सव सुरू आहे. याच लोकोत्सवाचा प्रमुख आहे तो, येथील मतदारराजा. या मतदारराजाच्या एकेका मतासाठी निवडणूक यंत्रणा जेव्हा कडक उन्हात, पावसात आणि काट्याकुट्याचा रस्ता तुडवत, माळरानावरून, डोंगर-दरीतून चालत धरणाच्या काठी वास्तव्यास असलेल्या झोपडीत पोहचते… तेव्हा देशातील नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होतो, हे मात्र तितकेच खरे…!
आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील पैनगंगेच्या काठावर असलेल्या गाडीबोरी या गावात मतदान केंद्राचे फिरते पथक पोहचून येथील ज्येष्ठ मतदार असलेल्या श्रीमती पुंजाबाई गणपत व्हडगीर या 87 वर्षीय आजी आणि श्रीमती पुंजाबाई रामराव पोले या 85 वर्षीय आजीनेही टपाली मतदानातून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले अमूल्य मत दिले. कळमनुरी तालुक्यात 14 आणि 15 एप्रिल रोजी टपाली मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
टपाली किंवा गृह मतदान प्रक्रियेमध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 16 फिरते मतदान पथकाच्या माध्यमातून 14 आणि 15 एप्रिल रोजी टपाली गृह मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. अनुपस्थित असलेल्या मतदाराचे मतदान 20 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील बोथी गावापासून 3 किलोमीटर अंतरावरील डोंगर वस्तीवर फिरते मतदान कक्षाच्या प्रतिनिधींनी चालत जावून येथील रंगुबाई देवराव खंदारे या 85 वर्षीय मतदाराचे मतदान करून घेतले. रंगुबाई यांना या वयात मतदान केंद्रावर जावून मतदान करता येणार नाही, अशी खंत होती. मात्र, निवडणूक यंत्रणाच रंगुबाईच्या झोपडीत पोहचल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
या गावात एकूण 17 मतदार असून, त्यांचे मतदान करून घेण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी श्रीमती रेवता लुटे, सूक्ष्म निरीक्षक किरण हुंबे, तलाठी गणेश माखणे, एकनाथ कदम, श्रीमती विमल टेकाम, पोलीस कर्मचारी श्री. सरकटे, विजय भिसे, माळधावंड्याचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर मस्के यांच्यावर आहे. तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघात 12 फिरते मतदान केंद्र पथक 15, 16 आणि 21 एप्रिल रोजी मतदारांच्या घरी जावून मतदानाची प्रक्रिया राबविणार आहेत.
तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघातील गावागावात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार आर. यु. सुरडकर यांनी टपाली मतदानासाठी येथील तहसील कार्यालयातून पथके रवाना केली. उमरखेड येथील निवडणूक कर्मचा-यांरी गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडत आहेत.
15-हिंगोली लोकसभा मतदार संघाची अधिसूचना 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर हे मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेत जातीने लक्ष घालत आहेत. त्यांच्या सोबतीला अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मेघना कावली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, डॉ. सचिन खल्लाळ, डॉ. सखाराम मुळे, उमाकांत पारधी, अविनाश कांबळे हे त्याकामी आपापली कर्तव्ये पार पाडत आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी 1348, ज्येष्ठ नागरिकांचे 843, दिव्यांग 185 आणि अत्यावश्यक सेवेतील 20 असे एकूण 2 हजार 396 मतदार आहेत. सर्व विधानसभा निहाय टपाली आणि गृह मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी 263, ज्येष्ठ मतदार 140, दिव्यांग 53, किनवट मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी 140, ज्येष्ठ 151, दिव्यांग 34, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी 11, हदगाव मतदारसंघातील अधिकारी-कर्मचारी 166, दिव्यांग 15, वसमत विधानसभा मतदार संघात अधिकारी-कर्मचारी 251, ज्येष्ठ 106, दिव्यांग 52, अत्यावश्यक सेवेतील 8, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचारी 251 आणि 85 ज्येष्ठ मतदारांचा समावेश आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघातील अधिकारी-कर्मचारी 277, ज्येष्ठ मतदार 361, दिव्यांग 31 आणि अत्यावश्यक सेवेतील एका मतदाराचा समावेश आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment