21 April, 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (15- हिंगोली) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी घेतला निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि.21 : मतदानपूर्व आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापली भूमिका आणि जबाबदारी योग्य पद्धतीने समजून घ्यावी. राष्ट्रीय कर्तव्यावरील ही जबाबदारी पार पाडताना कोणतीही चूक होता कामा नये, याची सर्वांची दक्षता घेण्याचे निर्देश उमरखेडचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी दिले.
तहसीलदार आर. यु. सुरडकर, नायब तहसीलदार वैभव पवार, मंडळ अधिकारी संजय वाघमारे यावेळी उपस्थित होते.
मतदान प्रक्रियेत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट आदी साहित्य वाटप, स्वीकरणे आणि मतदानोत्तर ते सर्व साहित्य परत स्ट्राँग रूमकडे घेऊन येताना घ्यावयाची संपूर्ण खबरदारी कर्तव्य पार पाडताना लक्षात ठेवावी. या काळात कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक होता कामा नये, असे सांगून सहायक निवडणूक अधिकारी डॉ. मुळे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
गुरुवार, दि. 25 एप्रिल रोजी साहित्य वाटप व 26 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदानानंतर मतदानाचे साहित्य स्वीकार करणे, मतदानाची प्रभागनिहाय टक्केवारी क्षेत्रीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून दर दोन तासाला टक्केवारी ऑफलाइन गोळा करून अहवाल नियंत्रण अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश डॉ. मुळे यांनी दिले.
15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झोन निहाय मतदानाची टक्केवारी क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वेळेत पाठवावी. यामध्ये संबंधितांना अडचण आल्यास प्रत्यक्ष कामकाज करण्यापूर्वी ती प्रक्रिया समजून घेण्याच्या सूचनाही सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी उपस्थितांना दिल्या.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment