13 April, 2024
निवडणूक निरीक्षक एम. एस. अर्चना यांच्याकडून तपासणी नाके, मतदान केंद्राची पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 13 : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज उमरखेड विधानसभा मतदार संघातील तपासणी नाके आणि मतदान केंद्रांना भेटी देऊन पथकांकडून करण्यात येणाऱ्या निवडणूक विषयक कामांची पाहणी केली.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, उमरखेडचे तहसीलदार आर. यू. सुरडकर, महागाव तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, संपर्क अधिकारी पुष्पा पवार, गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे, मुख्याधिकारी मंगेश जामनोर, मंडल अधिकारी दत्तात्रय दुर्केवार आदी यावेळी उपस्थित होते.
हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विविध मतदान केंद्र आणि तपासणी नाक्यांना भेट देत पाहणी केली. तसेच मतदान केंद्रांवरील तयारी आणि तपासणी नाक्यांवरील यंत्रणेच्या मतदान केंद्रावरील सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. सध्या उन्हाळा सुरू असल्याने मतदान केंद्रावरील पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करणारे साधन उपलब्धतेची पाहणी करत समाधान व्यक्त केले.
मार्लेगाव नाका येथील एसएसटी पथक पाहणी, शहरातील नागेश वाडी, तातरशाह, नगरपालिका, उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्र व स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. मतदानाच्या दिवशी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. दिव्यांग मतदारांना मतदान करताना व्हीलचेअर, ज्येष्ठ मतदारांसाठी केंद्रावर असलेल्या सुविधा, पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी करण्यात येणारा निवारा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना एम. एस. अर्चना यांनी केल्या.
मतदानाचा टक्का वाढावा आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मतदारसंघात विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे नवमतदारांसह सर्वांना मतदान केल्यानंतर सेल्फी काढता यावा आणि इतर मतदारांना समाजमाध्यमांवरून मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळावी. मतदारांमध्ये मतदान करण्याप्रती जनजागृती व्हावी, यासाठी मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक एम. एस. अर्चना यांनीही आज उमरखेड तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
निवडणूक निरीक्षक एम. एस. अर्चना यांनी आज येथील खर्च निरीक्षक पथकास तसेच एक खिडकी पथक आणि मीडिया कक्षास भेट देऊन पाहणी केली. तसेच येथील होत असलेल्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment