23 April, 2024
लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्यासाठी जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दि. 26 एप्रिल, 2024 पार पडत आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावेत. यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रनिहाय मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी इत्यादीचा तीन ते चार जणांचा एक गट तयार करण्यात यावा. या गटामार्फत संबंधित मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी जनजागृती मोहीम राबवून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात यावे. तसेच अद्याप वोटर गाईड व वोटर माहिती स्लीप वाटल्या नसल्यास त्यांचेही वाटप करण्यात यावे, अशा सूचना हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व स्वीपचे नोडल अधिकारी यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment