27 April, 2024
जिल्हा हिवताप कार्यालयात जागतिक हिवताप दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील जिल्हा हिवताप कार्यालयात नुकताच जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, तसेच आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासून होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. सर्वांनी एकाच वेळी एकदिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित केला आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आणि जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
या वर्षाचे घोषवाक्य ‘मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी’ असे आहे. भारतामध्ये सन 2016 ते 2030 पर्यंत हिवताप दूरीकरण करण्याचे लक्ष ठरविले आहे, त्याबाबतचे ध्येय व नियोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावे, हिवताप आजार होऊ नये यासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, घरातील पाणी साठ्यांना घट्ट झाकणे लावावीत, घरावरील, घराभोवती पडलेले भंगार सामानाची विल्हेवाट लावावी, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे
हिवताप आणि त्याचा प्रसार
हिवताप हा आजार प्लाझमोडीअम या परोपजीवी जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे 30 ते 50 कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात.
डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते. हिवतापाचा प्रसार अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या यकृतमध्ये जात त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला ताप येते.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
डासांच्या नियंत्रणासाठी घरगुती वापरातील पाण्याचे हौद, टाक्या, बॅरल, रांजण, आठवड्यातून किमान एकदा पुसून कोरडे करावेत. त्यांना घट्ट झाकणे बसवावीत, कापडाने बांधावीत. डबकी बुजावीत, पाणी वाहते करावे, साठलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत. घरातील भंगार सामान निरुपयोगी टायर्सची विल्हेवाट लावावी. कुलर, चायनीज प्लँट व फ्रिजचा ड्रीप पॅन स्वच्छ ठेवावा. शौचालयाच्या नादुरुस्त सेप्टीक टँक दुरुस्त कराव्यात. शौचालयाच्या व्हेन्ट पाईपला जाळी बसवावी अथवा कापड बांधावे. वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा.
ताप आल्यास रक्त नमुना तपासून घ्यावा. आवश्यक औषधोपचार घ्यावा. हिवतापाने निदान व औषधोपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. हिवताप नियंत्रणासाठी हिवताप निदान व उपचार महत्वाचे आहेत.
अॅनाफिलिस डासांमुळे हिवतापाचा प्रसार होतो. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. उदा. पाण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या, डबके, छतावरील पाणी, भातशेतीतील पाणी कॅनॉल, नदी, नाले, ओबे, इत्यादी. अॅनाफिलिस द्वारा एडीस डासांमुळे या आजारांचा प्रसार होतो. हे डास घरगुती स्वच्छ पाण्यात म्हणजेच हौद, बॅरल, रांजण, पाण्याच्या टाक्या, पायनिज प्लॅट डेस कुलर, फ्रिजचा दिप सामान टावरमध्ये साठलेले पाणी यामध्ये तयार होतात. एडीस डास, क्युसेक्स डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. हे डास शौचालयाच्या सेप्टीक टँक, तुंबलेली गटारे, ड्रेनेज लाईन, अस्वच्छ पाण्यात तयार होतात.
हिवतापाची लक्षणे व औषधोपचार
थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, ताप नंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. याबाबत प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करावी. हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासून करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतू आढळतात.
ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाने आपला रक्त नमुना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासून घ्यावे. हिवताप दूषित रक्त नमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळ्याचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशीपोटी घेऊ नये. गर्भवती स्त्रियांनी प्रायमाक्वीन औषधी घेऊ नये व शून्य ते एक वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देऊ नये.
हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना
आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. आतील बाजू व तळ घासूनपुसून कोरड्या करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणीने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी आदीची वेळीच विल्हेवाट लावा. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
*********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment