23 April, 2024
शुक्रवारी ‘आधी मतदान, मगच लगीन’ - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांचे मतदारांना आवाहन
• मतदारांनी 100 टक्के मतदान करण्यासाठी आपले योगदान द्यावे
हिंगोली (जिमाका), दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या शुक्रवारी 26 एप्रिल 2024 रोजी हिंगोली लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या दिवशी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारसंघातील नववधू-वरासह सर्व मतदारांनी सकाळी 7 वाजता आधी मतदान, मगच लगीन म्हणत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
देशभरासह हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी 16 मार्च 2024 पासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 16 मार्चपासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातील 16 पथके या प्रक्रियेत सहभागी असून, निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक आर. जयंथी हे या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 2006 मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याकामी मतदारसंघातील विविध अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात विवाह समारंभ असले तरीही नवमतदारांनी आपले मतदान करत, आई-वडीलांना मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत पोहचवत 100 टक्के मतदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
निवडणूक आयोगही आता मतदारांच्या दारी पोहचला असून, निवडणूक यंत्रणा डोंगर-दऱ्या, नदी-नाले, काट्याकुट्याचे रस्ते तुडवत एकेक ज्येष्ठ व दिव्यांगांचे टपाली मतदान करून घेत आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या भावाचे-बहिणीचे, मित्र, आप्तेष्ठातील कोणाचेही लगीन असले तरीही आधी मतदान करूनच लग्नाला निघावे. तसेच सर्वांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment