08 April, 2024
लोकसभा निवडणूक भयमुक्त आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे - निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना
• सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च अचूक नोंदवावा-खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह
हिंगोली (जिमाका), दि 08 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आज अंतिम झाली आहे. 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करुन सहकार्य करावे, असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खर्च निवडणूक निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहिरात, फ्लेक्स, पॉम्पलेट, ऑडिओ जाहिरात, व्हिडीओ जाहिरातीचे प्रमाणिकरण करुन घ्यावे. वाहन परवानगी, सभेची परवानगी यासह आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन प्रचार करावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक त्या परवानग्या घेऊनच प्रचार करावा. तसेच जाती-धर्मात तेढ निर्माण होणारे, वैयक्तीक आरोप होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत काही अडचणी आल्यास संपर्क साधावा, अशा सूचना निवडणूक निरीक्षक सामान्य श्रीमती एम.एस. अर्चना यांनी केल्या.
उमेदवारांच्या सर्व खर्चाचे जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीमार्फत हिशोब ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी दैनंदिन खर्च जिल्हास्तरीय खर्च समितीला सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवारांच्या खर्चाची निवडणूक कालावधीत तीन वेळा तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी उमेदवाराला बोलावण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. खर्चामध्ये त्रुटी आढळून आल्यास, खर्च लपविल्यास, तपासणीवेळी हजर न राहिल्यास उमेदवाराविरुद्ध कार्यवाही करून उमेदवारी रद्द करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी निवडणुकीसाठी स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक असून, निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातूनच सर्व खर्च होणे आवश्यक आहे. रोखीचे व्यवहार न होता सर्व व्यवहार ऑनलाईन बँकेतूनच झाले पाहिजे यासाठी खबरदारी घ्यावी. याबाबत काही अडचणी आल्यास संपर्क साधावा, अशा सूचनाही निवडणूक खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली यांनी यावेळी केल्या.
उमेदवारांना रोख रक्कम खर्च करण्याची मर्यादा दहा हजार रुपये असली तरीही ती रक्कम उमेदवारांच्या बँक खात्यातून काढलेली असणे आवश्यक आहे. शक्यतो सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाले पाहिजेत. त्यांची दररोज नोंद घेऊन निवडणूक खर्च समितीला कळविणे बंधनकारक आहे. निवडणूक विभाग सर्व उमेदवारांस बारकाईने नजर ठेवून आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आपला खर्च अचूक नोंदवावा, अशा सूचनाही खर्च निरीक्षक कमलदीप सिंह यांनी केल्या.
सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च वेळेत दाखल करावे. एक खिडकी योजनेतून सर्व परवानग्या घ्याव्यात. ईव्हीएम मशीनच्या बॅलेट पेपर सेटींग वेळी सर्व उमेदवारांना बोलावून आपल्या समक्ष हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधून किंवा सी-व्हीजील ॲपच्या माध्यमातूनही ती देता येईल. हिंगोली लोकसभा मतदार संघातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींग सुविधेच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना मतदानाच्या दिवशी सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पुरेसा विद्युत पुरवठा, रॅम्प, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर यासह विविध सुविधांचा यात समावेश असणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
रोख रक्कम, मद्य वितरण, सभा यासह सर्व हालचालींवर पोलीस विभागाची नजर राहणार असून याबाबत काही तक्रार असल्यास 1950 किंवा 112 या निशुल्क क्रमांकावर करावी. या कालावधीत आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment