30 November, 2016

सैनिकांच्या पाल्यांकरिता युनिट कोटा सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि. 30 : जिल्ह्यातील सर्व आजी / माजी सैनिक व विधवा यांच्यासाठी दि. 05 डिसेंबर, 2016 ते 08 डिसेंबर, 2016 पर्यंत मराठा लाईट रेजीमेंटल सेंटर बेळगाव कँप येथे आजी / माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यांसाठी सैन्य भरती मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये सोल्जर जनरल ड्युटीकरिता दि. 05 डिसेंबर, 2016 तर सोल्जर ट्रेडसमॅनकरिता दि. 07 डिसेंबर, 2016 व सोल्जर कार्ल्ककरिता दि. 08 डिसेंबर, 2016 अशी भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी भरतीचे ठिकाणी सकाळी 6 वाजण्यापूर्वी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन सैनिक कल्याण कक्षाणे कळविले आहे.

                                                            ***** 

29 November, 2016

गोळीबार सरावासाठी मैदान ( फायर बट ) ची उपलब्धता
        हिंगोली, दि. 29 : पोलीस अधिक्षक परभणी यांनी परभणी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा वार्षिक गोळीबार सराव दिनांक 30 नोव्हेंबर, 2016 ते दिनांक 06 डिसेंबर, 2016 या कालावधीत घेण्याचे आयोजित केलेले आहे. परभणी जिल्ह्यातील फायरिंग बट चे काम चालु असल्याने त्याठिकाणी गोळीबार सराव घेता येत नाही. तरी गोळीबार सरावासाठीचे मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करीत आहे, सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सुचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.
                                                            *****


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2017 मधील
अंदाजित स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
हिंगोली, दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
            परीक्षांचा तपशील पुढीलप्रमाणे : 1)  तांत्रिक सहायक परीक्षा 2016 ची जाहिरात ऑक्टोबरमध्ये प्रसिध्द होईल. परीक्षा 15 जानेवारी रोजी होईल. 2) विक्रीकर निरीक्षक 2016 या पदाची जाहिरात नोव्हेंबरमध्ये प्रसिध्द केली जाणार आहे. 29 जानेवारी रोजी पूर्व तर मे 2017 मध्ये मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. 3) राज्य सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रसिध्द होईल. या परीक्षेची पूर्वपरीक्षा 2 एप्रिल व मुख्य परीक्षा 16, 17 व 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. 4) पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात जानेवारी 2017 मध्ये प्रसिध्द होईल. 12 मार्च रोजी पुर्व तर मुख्यपरीक्षा 11 जुन रोजी होणार आहे. 5) सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेची जाहिरात जानेवारीमध्ये प्रसिध्द केली जाणार असून 30 एप्रिल रोजी पूर्व, तर 6 ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा होईल. 6) लिपिक-टंकलेखक 2017 ची जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रसिध्द केली जाणार असून 14 मे पुर्व तर 3 सप्टेंबर रोजी मुख्यपरीक्षा होणार आहे. 7) दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रसिध्द होणार आहे. पूर्वपरीक्षा 21 मे, तर मुख्य परीक्षा 8 ऑक्टोबर रोजी होईल. 8) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रसिध्द केली जाणार असून 2 जुलै पुर्व तर 15 ऑक्टोबर रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. 9) महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात मार्चमध्ये प्रसिध्द होणार. पूर्वपरीक्षा 4 जुन रोजी, तर मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर रोजी होईल.
10) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 09 जुलै रोजी होईल. त्यापैकी महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017 व महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, 26 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा  17 डिसेंबर रोजी, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, 24 डिसेंबर रोजी होईल. 11) सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल 2017 मध्ये प्रसिध्द होईल. परीक्षा 25 जुन रोजी होणार आहे. 12) सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिलमध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा 16 जुलै रोजी होईल. त्यापैकी पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा  05 नोव्हेंबर, 2017 रोजी, सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 10 डिसेंबर, 2017 रोजी तर विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 07 जानेवारी, 2018 रोजी होईल. 13) कर सहायक परीक्षा 2016 ची जाहिरात एप्रिलमध्ये प्रसिध्द होईल. 20 ऑगस्ट रोजी पुर्व तर 31 डिसेंबर रोजी मुख्यपरीक्षा होणार आहे. 14)  महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिलमध्ये प्रसिध्द होईल. पूर्वपरीक्षा 30 जुलै रोजी व मुख्य परीक्षा 17 डिसेंबर रोजी होईल. 15) विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात सप्टेंबरमध्ये प्रसिध्द होईल. परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.
शासनाकडून संबंधित पदांसाठी विहित वेळेत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे वरील अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकाबाबतची अद्ययवत माहिती वेळोवेळी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

*****  

25 November, 2016

नगरपरिषद निवडणुकांसाठी जिल्ह्यात कलम 144 लागू
हिंगोली, दि. 25 : जिल्ह्यातील नगर परिषद हिंगोली, वसमत व कळमनुरी सार्वत्रिक निवडणुक, 2016 ची प्रक्रिया जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान व मतमोजणी होणार आहे. त्या मतदान केंद्राच्या ठिकाणी दिनांक 27 नोव्हेंबर, 2016 चे सकाळी 7.00 वाजेपासुन ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी दिनांक 28 नोव्हेंबर, 2016 रोजी मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नगर परिषदेचे नांव, मतमोजणीचे ठिकाण व मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 1) हिंगोली, कल्याण मंडप, हिंगोली - 91, 2) वसमत, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत - 64, 3) कळमनुरी, नगर परिषद कार्यालय, कळमनुरी - 28.
उपरोक्त नमुद ठिकाणी 100 मिटरच्या परीसरात व्यक्तीच्या समुहास मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहे. सदरील आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसर व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात व्यक्तीच्या समुहास मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहेत. सदरील आदेश निवडणुक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी / कर्मचारी व मतदान केंद्राच्या परिसरातील मतदारास लागु होणार नाहीत. मतदान केंद्राच्या परिसरात व मतमोजणीच्या ठिकाणी 100 मिटरच्या आत खाजगी वाहन घेऊन जाण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत.  
*****
                                                                                           


जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा
हिंगोली, दि. 25 :  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवार, दिनांक 25 नोव्हेंबर, 2016 रोजी संविधान दिनानिमित्त उपस्थित विविध विभागाचे अधिकारी/ कर्मचारी यांना शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, तहसिलदार वैशाली पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीर, आदी अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी भारतीय संविधानाच्या " उद्देशिकेचे वाचन "  केले. पुढील प्रमाणे आहे. 
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, 1949 रोजी याव्दारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करुन स्वत: प्रत अर्पण करीत आहोत.

                                                            *****
 

24 November, 2016

आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याचे हैद्राबाद उच्च न्यायालयाचे
न्यायमुर्ती श्री. एम. एस. के. जयस्वाल यांचा हिंगोली दौरा 

हिंगोली, दि. 24:- आंध्रप्रदेश तेलंगणा राज्याच्या हैद्राबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एस. के. जयस्वाल हे दिनांक 25 नोव्हेंबर, 2016 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दिनांक 25 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 6 -35 वाजता नांदेड येथे आगमन 6-40 वाजता  मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील. 8-30 वाजता हिंगोली येथील विश्रामगृह येथे आगमन व हिंगोली येथून मोटारीने रात्री 8 -30 वाजता नांदेडकडे प्रयाण करतील. रात्री 11 -30 वाजता रेल्वेने सिकंदराबादकडे प्रयाण करतील.   
****




जिल्हा परिषद निवडणूक - अंतिम प्रभाग रचनेकरीता आरक्षण जाहीर

हिंगोली, दि.24:- मा. राज्य निवडणुक आयुक्त,महाराष्ट्र यांच्याकडील अधिसुचना अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 (महाराष्ट्र अधिनियम ,5) च्या कलम 12 पोट कलम (1) खाली हिंगोली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या  अनुसुचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हिंगोली जिल्हा परिषद जितक्या निवडणूक विभागामध्ये (गट) विभागण्यात येईल, त्या निवडणूक विभागाची संख्या व त्याची व्याप्ती  निश्चित करणारा आणि ज्या निवडणूक विभागामध्ये अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती व नागरीकांचा मागासप्रवर्ग  आणि त्याच प्रमाणे स्त्रियांकरीता जागा राखुन ठेवण्यात येतील. ते निवडणूक विभाग  आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी ( अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागसप्रवर्ग, आणि त्याच प्रमाणे इतर सर्वसाधारण स्त्रियांसह) जागा राखुन ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग दर्शविणारा क्रमांक जिपपंसनि / सा.प्र./कावी दिनांक 10/10/2016 चा आदेशाचा  प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम,5) च्या कलम 12 पोट कलम (1)  निश्चीत केलेल्या पध्द़तीप्रमाणे उक्त़ जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी  प्रसिध्द करण्यात  आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतीचा सर्वकष विचार करून जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आदेश देण्यात आले आहेत.
                महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम ,1961 (सन 1962 च्या महाराष्ट्र अधिनियम ,5) चा कलम 9 (1) अन्वये राज्य निवडणुक आयुक्त महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसुचना क्रमांक रानिआ/जिपपंस-2016/ प्र.क.16/ का.7 दिनांक 18/08/2016 व पत्र क्र. रानिआ/जिपपंस-2016/प्र.क.16/का.7 दिनांक 18/08/2016 व क्र.रानिआ/ जिपपंस/2011/ प्र.क.14/ का-7 दिनांक - 04/10/2011  चे  आदेशान्वये त्यांनी हिंगोली जिल्हा परिषदेच्याबाबतीत  खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या  अधिनियम 1961 ( सन 1962 च्या महाराष्ट्र अधिनियम ,5) चा कलम 12 चा पोट कलम (2) अन्वये आणि राज्य निवडणुक आयुक्तांच्या क्रमांक अधिसुचना रानिआ/जिपपंस-2016/ प्र.क.16/ का.7 दिनांक 18 ऑगस्ट, 2016 क्र. रानिआ/ जिपपंस/2011/ प्र.क.14/ का-7 दिनांक - 04/10/2011  च्या पत्रान्वये त्यांनी हिंगोली जिल्हा परिषदेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती , नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या  जागा व स्त्रियांसाठी (अनुसुचित जाती  , अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागा) राखुन ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

निवडावयाच्या सदस्यांची एकुण संख्या :-  52 जागा , अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यासाठी राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या :-  28 जागा , अ) अनुसुचित जाती   :-  08   जागा , ब) अनुसुचित जमाती :-   06   जागा , क) ना.मा.प्रवर्ग  :-14   जागा.
स्त्रियांसाठी ( अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागा धरुन ) राखुन ठेवावयाच्या एकुण जागा :- 26 जागा
उपरोक्त क्र.(3) पैकी वरील क्रमांक (2) मधील (अ),(ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी  राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे राहील :-
अ) अनुसुचित जाती   :- 04 जागा ,  ब) अनुसुचित जमाती :-  03  जागा , क) ना.मा.प्रवर्ग :- 07  जागा
सर्वसाधारण स्त्रियांसाठी  राखुन ठेवावयाची जागांची संख्या :- 12  जागा .
राज्य निवडणुक आयुक्त महाराष्ट्र यांच्या कडील अधिसुचना क्रमांक  अधिसुचना रानिआ/जिपपंस-2016/ प्र.क.16/ का.7 दिनांक 18/08/2016 व पत्र क्र. रानिआ/जिपपंस-2016/प्र.क.16/का.7 दिनांक 18/08/2016  अन्वये  प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत  समित्या अधिनियम, 1961 ( सन 1962 च्या महाराष्ट्र अधिनियम,5 ) चा कलम 12 चा पोट कलम (1) खाली जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी, हिंगोली यांनी जिल्हा परिषद क्षेत्र जितक्या मतदार गटात विभागण्यात येईल त्या मतदार गटांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असुन , ज्या मतदार गटामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती , नागरिकांचा मागासप्रवर्ग  यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती,नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसह ) जागा राखुन ठेवण्यात येतील ते मतदार गट निर्दिष्ट करीत आहे. या आदेशाच्या तारखेच्या निकट  नंतरच्या  पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
****    

औंढा-वसमत मार्गावरील वाहतूकीत बदल
हिंगोली, दि. 24 :- सहाय्यक मंडळ इंजिनियर कार्यालय, पुर्णा यांनी दि. 25 नोव्हेंबर, 2016 रोजीचे सकाळी 8.00 वाजता ते दि. 26 नोव्हेंबर, 2016 चे सकाळी 08.00 वाजता पावेतो रेल्वे गेट क्र. 165 at Km921/4-5 चे काम करावयाचे असल्याने औंढा-वसमत मार्गावरील वाहतूक वळविण्यात येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये दि. 25 नोव्हेंबर, 2016 रोजीचे 8.00 वा. ते दि. 26 नोव्हेंबर, 2016 चे 8.00 वाजता पावेतो औंढा-वसमत मार्गावरील वाहतुक ही चौंढी ते कुरूंदा मार्ग वसमत व वसमत ते औंढा  मार्ग जाणारी वाहतुक कुरूंदा ते चौंढीकडून वळवुन औंढाकडे वळविण्यात येत आहे.

*****
विशेष केंद्रिय सहाय्य योजनेतंर्गत आदिवासी जमातींनी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 :  विशेष केंद्रिय सहाय्य योजने अंतर्गत खालील दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांचे नावे योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दर्शविल्याप्रमाणे परिपुर्ण कागदपत्रांसह आवेदन अर्ज दि. 15 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपुर्ण नसलेले आवेदन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. योजनेचे नाव, योजनेचा लाभ व सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे.
1) जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झालेल्या आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांना व्यवसायाकरिता पोल्ट्री स्थापन करून देणे व प्रशिक्षण देणे : सामु‍हिक - 1) आ‍दिवासी स्वयंसहाय्यता बचतगट हे जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झाल्याबाबतचे नोंदणीकृत प्रमाणपत्र जोडावे 2) बचत गटातील सर्व सभासद हे आदिवासी असावेत त्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे 3) बचत गटातील कमीत कमी एका लाभार्थ्यांकडे एक एकर जमीन, बारामाही पाणी, वीज इत्यादी सुविधा असल्याचे  कागदपत्र. (सातबारा, विहिर नोंद, मोटार विजपंप, प्रमाणपत्र, चालु वर्षातील वीजबील, होल्डींग) 4) पोल्ट्रीफॉर्मसाठी घ्यावयाचे क्षेत्र/जमीन बचत गटाला किमान 5 वर्ष वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालकाचे व बचत गटातील सर्व सदस्य यांनी रुपये शंभर स्टॅम्प पेपरवर रजिस्टर हमीपत्र जोडावे 5) बचतगटाचे चालु व्यवहार असलेले पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी. 6) रहिवासी प्रमाणपत्र 7) ओळखपत्र 8) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 9) दोन पासपोर्ट साइज फोटो
2) दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळ भाजीपाला विकसीत करणेकरिता शेडनेटची उभारणी करणे : वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र 2) लाभार्थ्यांच्या नावे दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र (गुणांकन क्रमाक व यादीतील क्रमांक नमुद असावा.) 3) लाभार्थ्यांचे नावाची जमीन असल्याचा सातबारा व 8 अ होल्डींग 4) रहिवासी प्रमाणपत्र 5) ओळखपत्र 6) लाभार्थी कृषी पदविका धारण करत असल्यास पदविका प्रमाणपत्र जोडावे 7) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 8) लाभार्थ्यांस किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक 9) जमीन सिंचनाखाली असल्याचे प्रमाणपत्र (वीजपंप/तेलपंप पुरावा) 10) वीज बिल चालु वर्षाचे.
3) अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम प्लास्टीक अस्तरीकरणासह करणे (दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसाठी) : वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र 2) स्वत:च्या नावे एक हेक्टर जमीन असल्याचा सातबारा व 8 अ व होल्डींग जोडने आवश्यक 3) लाभार्थ्यांच्या नावे दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र (गुणांकन क्रमाक व यादीतील क्रमांक नमुद असावा.) 4) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 5) जमीन सिंचनाखाली असल्याचे प्रमाणपत्र (वीजपंप/तेलपंप पुरावा) 6) विज बील चालु वर्षाचे 7) रहिवासी प्रमाणपत्र 8) ओळखपत्र 9 दोन पासपोर्ट साईज फोटो.

                                                            ***** 
शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम
·         प्रारुप मतदार यादीवर दावे हरकती स्विकारणे
हिंगोली, दि. 24:-   निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर, 2016 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 1 ऑक्टोबर, 2016 ते दिनांक 5 नोव्हेंबर, 2016 या कालावधीत तालुका निहाय नोंदणी झालेल्या शिक्षक मतदारांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
.क्र.
तालुक्याचे नाव
महसूल मंडळ निहाय भाग
प्रारुप मतदार यादीतील मतदार संख्या
पुरुष
स्त्री
एकूण
1
हिंगोली
154 ते 160=07
525
108
633
2
कळमनुरी
161 ते 166=6
442
55
497
3
सेनगाव
167 ते 172=6
339
13
352
4
वसमत
173 ते 179=7
638
112
750
5
औंढा नागनाथ
180 ते 183=4
274
40
314
एकूण
154 ते 183=30
2218
328
2546

प्रसिध्द करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी मा. विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद , जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली , सर्व उपविभागीय कार्यालये सर्व तहसील कार्यालये जिल्हा हिंगोली येथे अवलोकनास्तव ठेवण्यात आलेली आहेत. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप यादीवर दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 ते 8 डिसेंबर, 2016 या कालावधीत दावे हरकती दाखल करता येणार आहेत. नागरिकांकडन प्राप्त होणारे दावे हरकती संबंधित तहसील कार्यालय येथे स्विकारले जातील . दावे हरकती दाखल करण्याकरिता लागणारे नमुने ( नमुना -19, नमुना-7 नमुना -8 ) जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये येथे उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाच्या मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून आपले दावे हरकती विहीत वेळेत दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी कळविले आहे.

*****