22 February, 2017

मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार

हिंगोली,दि.22:- श्री. वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेबद्दल गौरव म्हणून श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रत यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन " मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा करण्याच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दिनांक 21 जानेवारी, 2017 च्या शासन निर्णयान्वये सुचित केले आहे. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय प्रमुख यांनी सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी, 2017 रोजी पुढील विविध उपक्रम आयोजित करुन " मराठी भाषा गौरव दिन " सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या वर्षासाठी  " संगणक व महाजालावरील मराठी  " या संकल्पनेवर भर देण्यात येत असून  यावर्षी उपक्रमांची सूची पुढील प्रमाणे राहील.

मातृभाषेची महती आणि माहिती , तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयावर विचारमंथनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सकस साहित्याची, नव्या माहितीची, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतून राज्यभर ग्रंथप्रदर्शन / ग्रंथोत्सव / ग्रंथदिंडी आयोजित करणे, शाळा / महाविद्यालय / शासकीय व निमशासकीय कार्यालये / खाजगी संस्थांमध्ये विविध स्तरांवर मराठी भाषा , साहित्य आणि संस्कृतीविषयक विविध प्रकारच्या स्पर्धा ( निबंध, वक्तृत्व इ.) आयोजित करणे. न्यायव्यवहार, शासन प्रशासन, प्रसार माध्यमे, केंद्र तथा राज्य शासनाची कार्यालये, इतर अशासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी होणारा मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा सादरकरणे यांचे आयोजन , मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाच्या विविध उपक्रमांना प्रसिध्दी देणे, आकाशवाणी व दुरदर्शनवरुन सादर करण्यात येत असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मराठी भाषा विषयक मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद आयोजित करणे, मराठी भाषा / साहित्य/ कोश वाड्:मय या विषयावर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन तसेच तज्ज्ञ, विचारवंत व साहित्यिकांच्या मुलाखतींचे आयोजन, प्रसारमाध्यमे तसेच प्रशासनात मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने , चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा सादरीकरणे यांचे आयोजन, युनिकोडप्रणित मराठी आणि इन्स्क्रिप्ट मराठी कळफलक संबंधित विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन. समाजप्रसार माध्यमांतील (सोशल मीडिया) मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी महाजालावरील (इंटरनेट) मराठी या क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने सादरीकरणे यांचे आयोजन . कुसुमाग्रज व इतर सुप्रसिध्द थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन. कुसुमाग्रज व इतर सुप्रसिध्द थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन. दिवंगत साहित्यिकांच्या जन्मगावी /कर्मभुी ( उदा: नाशिक-कुसुमाग्रज, मालगुंड-कवी केशवसुत, खोपोली र. वा. दिघे) येथे शाळांच्या / ग्रंथालयांच्या मदतीने शाळा/ ग्रंथालय/वाचनालय येथे स्थानिक शिक्षण संस्था / महाविद्यालये यांच्यामार्फत दिवंगत साहित्यिकांचे स्मरण करुन त्यांच्या गौरवार्थ कार्यक्रमांचे आयोजन , बोली भाषावरील कार्यक्रमांचे आयोजन ( व्याख्याने , चर्चासत्रे, सादरीकरणे…इ.) शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती याबाबतच्या स्पर्धा, म्हणी , वाक् प्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवर रंजक व्याख्याने / सादरीकरणे, मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा व संबंधित कार्यशाळांचे आयोजन , मराठी कविता, प्रसिध्द उतारे , मराठी भाषा विषयक घोषवाक्ये यांचे भित्तीचित्र प्रदर्शन किंवा स्पर्धांचे आयोजन, मोडी लिपीचे प्रशिक्षण, व्याख्यान किंवा परिसंवादाचे आयोजन, मराठी भाषंच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या नि:स्पृह व्यक्ती व त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांना किंवा प्रकल्पांना भेट देणे.
यात सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या विभागातील कार्यक्षेत्रातील संबंधितांचे सहकार्य घेवून हा सोहळा पार पाडण्यात येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने शासन परिपत्रकान्वये कळविले आहे.
**** 

No comments: