27 February, 2017

महिला दिनानिमित्त महिलांचे नाव मतदार यादीत नोंदणी कार्यक्रम
हिंगोली,दि.27: मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढवावे या उद्देशाने विशेष महिला मतदारांची नोंद घेण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमात नोंदणी केलेल्या महिलांना लगेच ओळखपत्र वाटप होणार आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या मतदार यादीत 1 हजार पुरुषामागे सरासरी 896 महिला मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने आगामी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर महिला मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला आहे. निवडणूकीमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) 27 फेब्रुवारी, 2017 रोजी महिला मतदार नोंदणीचे नियोजन करावयाचे आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील बीएलओनां नमुना क्रमांक 6,7 व 8 अ चे अर्ज वाटप करण्यात येणार असून 8 मार्चपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागात महिला मतदारांची संख्या कमी आहे, अशा भागांमध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे.
या कामी वसतिगृहातील महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट, अशासकीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागात विवाह झाल्यानंतर महिलांची नोंदणी होत नाही. अनेक वेळा महिलांकडे जन्म तारखेचा दाखला नसतो. तसेच माहेरी मतदार यादीत असलेले नाव कमी केले जात नाही. अशा कारणांमुळे महिला मतदारांची नोंदणी कमी होते. याबाबी लक्षात घेऊन निवडणूक विभाग, जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास रेशनकार्ड, लग्नपत्रिका किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे देखील नावनोंदणी करून घेणार आहेत.
तरी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व महिलांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

***** 

No comments: