30 November, 2025
वसमत नगर परिषद तसेच हिंगोलीतील दोन प्रभागांच्या निवडणुका स्थगित
• राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर
हिंगोली, (जिमाका) दि. ३० : मा. न्यायालय व राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार वसमत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक तसेच हिंगोली नगर परिषदेच्या दोन प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने सुधारित वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ७ उमेदवारांनी दाखल केले होते. या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ४ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार असून, १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. आवश्यक असल्यास २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान घेण्यात येईल व २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
हिंगोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ५(ब) आणि ११(ब) या दोन जागांसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. या प्रभागांवरील न्यायालयीन अपीलाचा निकाल २२ नोव्हेंबर २०२५ नंतर लागल्याने नियमित कार्यक्रमानुसार निवडणूक घेणे शक्य नव्हते.
*कळमनुरी नगर परिषद – निवडणूक पूर्ववत*
कळमनुरी नगर परिषदेबाबत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्याने येथील निवडणुकीची प्रक्रिया पूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच पार पाडली जाणार आहे.
*राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश*
जिल्हा न्यायालयाकडून २३ नोव्हेंबर २०२५ नंतर निकाल लागलेल्या कोणत्याही नगरपरिषद अथवा नगरपंचायतीतील संबंधित सदस्य किंवा अध्यक्ष पदाच्या निवडणुका नियमानुसार स्थगित करण्यात येत आहेत. अशा सर्व जागांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित करून आयोगाला सादर करणे आवश्यक आहे.
परिशिष्ट–१ नुसार, मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायं. ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तत्काळ लागू राहील.
उपरोक्त क्षेत्रातील मतदारांवर प्रलोभनपर घोषणा, कार्यक्रम किंवा कृती कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. निवडणूक आयोगाने नियमानुसार व्यापक प्रसार करावा तसेच सर्व नवीन निर्देशांचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार सुधारित निवडणूक कार्यक्रमाचे पालन करण्याचे आवाहन सचिव सुरेश काकाणी यांनी केले आहे.
*****
28 November, 2025
आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त कळमनुरी तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती
हिंगोली(जिमाका), दि.28: आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्त हिंगोली जिल्ह्यात “विशेष गरजा असलेल्या मुलांचे (दिव्यांग मुले) संस्थाबाह्य पुनर्वसन” या विषयावर जनजागृती उपक्रमांना सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासनाने या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.आर. दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार कळमनुरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी पोलीस स्टेशन, बसस्थानक, खाजगी रुग्णालये, प्रसूतीगृहे अशा विविध सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, बॅनर व माहितीपत्रकांच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी कोणतेही बालक परस्पर दत्तक देणे किंवा घेणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. दत्तक घेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करूनच पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.
कायदा तसेच परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत असलेल्या उमंग शिशुगृह (विशेष दत्तक संस्था), सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह (हिंगोली), तसेच श्री स्वामी समर्थ बालगृह, खानापूर (चित्ता) याबाबत माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी बाल संगोपन योजना व प्रतिपालकत्व योजनेची माहिती तर केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या आपत्कालीन सेवेविषयी मार्गदर्शन केले.
या जनजागृती कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.डी. माहुरे, डॉ. अनिती जामगडे, डॉ. शिवप्रसाद शेट्टे, कळमनुरी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, डॉ. लक्ष्मण कदम, डॉ. स्मिता कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
‘बाल विवाह मुक्त महाराष्ट्र’–आपला संकल्प अभियानाअंतर्गत कनेरगाव नाका येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न
हिंगोली(जिमाका), दि.28 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘बाल विवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून हिंगोली तालुक्यातील मौजे कनेरगाव (नाका) येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली व इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेरनेस अॅण्ड रिफॉर्म (आयएसएआर) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006, पोक्सो कायदा तसेच बाल संरक्षण प्रणाली विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणांची रचना, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळाची कार्यप्रणाली याबाबत माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील तरतुदी, अल्पवयीन विवाह हा दंडनीय गुन्हा असून त्यासाठी एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांपर्यंतच्या सक्त मजुरीची शिक्षा असल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण व शहरी भागातील बाल विवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली.
कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी बालकांचे अधिकार व संरक्षणासंबंधी कायद्यांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करवून घेतले. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. आयएसएआर संस्थेच्या प्रकल्प समन्वयक अनिता भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जिल्हा समन्वयक देविदास खरात यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मनोहर, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. कार्यक्रमादरम्यान बाल विवाह प्रतिबंध, बाल अधिकार संरक्षण व कायदेशीर उपाययोजनांविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.
बाल विवाह प्रतिबंधासाठी तात्काळ मदत किंवा माहितीकरिता चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन 112 टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले .
*****
हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूक मतदार संघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
हिंगोली (जिमाका), दि. 28 : राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार, दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात दि. 26 नोव्हेंबर, 2025 च्या अधिसूनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी वरील नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच वरील नमूद करण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.
*****
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पिंपळदरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट
हिंगोली (जिमाका), दि.28 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देऊन शालेय उपक्रम, मूलभूत सुविधा, विद्यार्थी उपस्थिती तसेच अध्यापनाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील स्वच्छता, डिजिटल शिक्षण साधनांचा वापर, पोषण आहार योजना, शालेय इमारतीची स्थिती व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पिंपळदरी गावातील नागरिक उपस्थित होते.
*****
मत्स्यव्यवसाय घटक योजनेसाठी अर्ज मागविण्याबाबत सूचना
• धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान
हिंगोली(जिमाका), दि. 20 : हिंगोली जिल्ह्यातील धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय संबंधित घटक योजनेकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समाविष्ट गावांतील अनुसूचित जमातीमधील इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, याबाबतची जाहिरात दि. 20 नोव्हेंबर, 2025 नुकतीच प्रसारमाध्यमात प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिद्ध जाहिरातीतील अटींनुसार अर्जदारांनी त्यांच्या प्रवर्गाची खातरजमा करण्यासाठी जातीचा दाखला तसेच जात वैधता प्रमाणपत्र संलग्न करणे अपेक्षित आहे. तथापि, अनेक अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याची बाब लक्षात घेता, योजनेपासून कोणताही पात्र अर्जदार वंचित राहू नये म्हणून पर्यायी दस्तऐवज मान्य करण्यात आले आहेत.
अर्जदारांकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला, आदिवासी वन पट्टाधारक असल्याबाबतची सातबारा नोंद, आदिवासी सामूहिक वन संसाधन धारक असल्याचे दस्तऐवजीकरण, संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही दस्तऐवज जातीच्या पुराव्यासाठी मान्य राहील.
या योजनेकरिता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय हिंगोली येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.
*****
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय दि. 1 नोव्हेंबर, 2025 पासून नवीन जागेत स्थलांतर झाले आहे.
नवीन जागेचा पत्ता : सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, गावंडे निवास, अंबिकानगर, कोथळज रोड, हिंगोली-431513 येथे स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी होणारे सर्व पत्रव्यवहार वरील पत्यावर करावेत, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.
*****
तूर पिकांवरील होणाऱ्या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
हिंगोली (जिमाका), दि. 28: जिल्ह्यामध्ये तूर पीक हे फुलोऱ्यावर आहे व काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे. रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या आळीच्या वाढीस पोषक असते. प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी), पिसारी पतंग व शेंग माशी या तिन्ही किडी कळ्या, फूल व शेंगावर आक्रमण करुन तुरीच्या उत्पादनात लक्षणीय घट आणू शकतात. वेळोवेळी सर्वेक्षण करुन प्रादुर्भाव ओळखून आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करण्याचा हा कालावधी आहे. शेतकरी बांधवांनी जागरुक राहुन या तिन्ही किडीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
फूलगळ व चट्टेगळ जास्त प्रमाणात होत असल्यास 13:00:45 हे 100 ग्राम अधिक एनएए2 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेंगा पोखरणी अळी व फायटोप्थेरा मर या समस्येवर पहिली फवारणी 50 टक्के फुलोरावर असतांना निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा आझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एचएएपीव्ही 500 एलई किंवा बॉसलिस थुरिनजिएंसीस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी. 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी. यासाठी 4 इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 3 ग्रॅम किंवा लेब्डा सायहॅलोमथ्रीन 5 टक्के ईसी 10 मिली किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा क्लोनेंनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एससी प्रवाही 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणीसाठी किटकनाशकाची शिफारस केलेली मात्रा साध्या पंपासाठी असून पॉवर ऑपरेटेड पंपासाठी तीन पट मात्रा वापरावी.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील उपाययोजनांचा तात्काळ अवलंब करुन तूर पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
*****
26 November, 2025
आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृती उपक्रमांना प्रारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 26: आंतरराष्ट्रीय दत्तक महिना (नोव्हेंबर) निमित्त हिंगोली जिल्ह्यात “विशेष गरजा असलेल्या मुलांचे (दिव्यांग मुले) संस्थाबाह्य पुनर्वसन” या प्रमुख थीमअंतर्गत जनजागृती उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या नियोजनानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला.
या उपक्रमांअंतर्गत प्रथम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृह वॉर्ड, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम व आहार तज्ञ श्रीमती सुप्रिया इंगोले यांच्या सहकार्याने पोषण पुनर्वसन केंद्र (0 ते 5 वर्षे बालक) येथे दत्तक प्रक्रियेबाबत माहितीपत्रके, पोस्टर्स व बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांची भेट घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात जागृती साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच हिंगोली रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टर राजकुमार, रेल्वे पोलीस कर्मचारी चांदु खंदारे आणि पॉइंट मॅन सोपान गांजरे यांच्या उपस्थितीत स्टेशन परिसरात दत्तक प्रकियेवरील कायदेशीर माहिती पत्रके लावून जनजागृती करण्यात आली.
नोव्हेंबर महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा केला जात असून, या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन 1098 यांच्या वतीने बालकांच्या हक्क, सुरक्षा, पुनर्वसन आणि दत्तक प्रक्रियेवरील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोणतेही बालक परस्पर किंवा अनौपचारिकरित्या दत्तक घेणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
इच्छुक पालकांनी दत्तक प्रक्रियेसाठी www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर विधिसंमत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक अंकुर पाटोडे, राजरत्न पाईकराव व तथागत इंगळे उपस्थित होते.
*****
संविधान दिन व समता रॅली उत्साहात साजरी • “घर घर संविधान” उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
हिंगोली(जिमाका), दि. 26: भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी हिंगोली येथे संविधान दिन व समता रॅलीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सकाळी 8 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून समता रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, विशेष अधिकारी (शानिशा) अमोल घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
या रॅलीत सरजुदेवी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी तसेच शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहापर्यंत काढण्यात आली.
यानंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात संविधान दिन कार्यक्रम व संविधान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा उद्देशिकेची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी सरजुदेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून संविधान गीताचे सामूहिक सादरीकरण तसेच संविधान आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पठाडे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती वर्षा घुगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच बार्टी समतादूत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम सुरू
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण 13 हजार 500 दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिव्यांगांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला असून, जिल्हा रुग्णालयाच्या लगत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यालयात ही पडताळणी केली जाणार आहे.
ही प्रक्रिया दि. 26 नोव्हेंबर 2025 पासून दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत दिव्यांग मंडळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोलीमार्फत पार पाडली जाणार आहे.
दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणून दररोज 70 दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार असून, नोंदणीची वेळ सकाळी 11 ते दुपारी 4 अशी राहणार आहे. नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक 02456-299200 उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिव्यांग बांधवांनी या विशेष पडताळणी मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. यु. मुंगल यांनी केले आहे.
*****
संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 26 : दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ असून, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांची मूल्ये अंगीकारण्याचा संदेश यातून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने 2015 पासून संविधान दिन देशभर उत्साहात साजरा केला जात आहे.
संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व गणराज्य मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत तसेच संविधानाबद्दल आदर, जागरुकता आणि जबाबदार नागरिकत्व विकसित व्हावे, या हेतूने राज्य शासनाने शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या सहकार्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सामंजस्य करार केला आहे. पुढील पाच वर्षांत सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार आहे. त्याअंतर्गत संविधान दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांनी संविधान दिन प्रभात फेरी, व्याख्यानमाला, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पथनाट्य, पोवाडे, गाणी व सांस्कृतिक सादरीकरण, मानवी साखळी निर्मिती, आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन सेल्फी पॉइंट आणि संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा आदी उपक्रम राबवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
संविधान दिन प्रभात फेरी : संविधानाबद्दल आदर, जनजागृती आणि नागरिकत्वभावना वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संविधानाशी संबंधित घोषवाक्यांसह फलक तयार करणे, देशभक्तीपर गीतांसह प्रभात फेरी काढणे.
संविधान व्याख्यानमाला/सेमिनार : संविधान निर्मिती प्रक्रिया, मूलभूत हक्क-कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांविषयी मार्गदर्शनासाठी संविधान अभ्यासक, वकील, प्राध्यापक यांची व्याख्याने आयोजन. प्रश्नोत्तर व चर्चासत्राचे आयोजन करावे. चित्रकला व पोस्टर स्पर्धा : “आपले संविधान – आपला अभिमान”या विषयावर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेला वाव देणे आणि शाळेत प्रदर्शन लावणे. संविधान प्रश्नमंजुषा : संविधान विषयक ज्ञान वाढविण्यासाठी वर्गनिहाय/गटनिहाय प्रश्नमंजुषा स्पर्धा. विजेत्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे द्यावेत. पथनाट्य सादरीकरण : संविधानिक मूल्यांची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाव, शाळा व सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करणे. पोवाडे, गाणी व सांस्कृतिक सादरीकरण : लोककलेच्या माध्यमातून संविधानाविषयी अभिमान व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवणे, मानवी साखळी निर्मिती : विद्यार्थ्यांनी “आम्ही भारताचे लोक”घोषवाक्यासह एकता व अखंडतेचा संदेश देण्यासाठी मानवी साखळी तयार करणे व प्रास्ताविकाचे वाचन करावे. “आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन सेल्फी पॉइंट : विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडण्यासाठी शाळेत सेल्फी पॉईंट उभारणे आणि संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा : संविधानातील प्रतीके व राष्ट्रीय मूल्ये दर्शविणारी विविध मॉडेल्स तयार करणे व प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या जिल्हा व तालुका समन्वयकांचे सहकार्य उपलब्ध राहणार आहे.
या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शिक्षण संचालक, पुणे यांना दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावा, असे निर्देश राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
******
रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून तीन आवर्तने देण्यास मंजुरी
• पहिले आवर्तन 15 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026
हिंगोली (जिमाका), दि. 26 : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून तीन आवर्तने सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत सोडण्याचे ठरले असून, प्रत्येक आवर्तनाचा कालावधी 20 दिवसांचा असेल. शेतकऱ्यांनी या नियोजनाचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.
समितीच्या बैठकीत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी तातडीने पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार तीन आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिले आवर्तन 15 डिसेंबर ते 4 जानेवारी, दुसरे आवर्तन 8 जानेवारी ते 28 जानेवारी आणि तिसरे आवर्तन 5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. पावसाळी किंवा आकस्मिक परिस्थितीनुसार तारखेत आवश्यक बदल करण्यात येऊ शकतात.
दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी धरणातील उपलब्ध 100 टक्के जिवंत पाणीसाठ्यावर आधारित रब्बी व उन्हाळी हंगामाचे प्राथमिक नियोजन तयार करण्यात आले आहे. उन्हाळी हंगामासाठी स्वतंत्रपणे पुढील बैठक घेऊन मान्यता दिली जाणार आहे. इसापूर प्रकल्पाच्या डावा व उजवा कालवा आणि त्याअंतर्गत वितरण व्यवस्थेद्वारे प्राप्त मागणीनुसार पाणी पुरवठा केला जाईल.
सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास लाभधारकांनी नमुना क्र. 7 व 7-अ मधील पाणी मागणी अर्ज शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपसा परवानगीची प्रत, अपत्य प्रमाणपत्र, तसेच अल्प किंवा अत्यल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
शेतातील शेतचारी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांची असेल. तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठ्यात अडचण आल्यास विभाग जबाबदार राहणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंजुरी रद्द करण्यात येईल. सर्व लाभधारकांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम व विभागीय नियमांचे पालन करावे, असेही आवाहन कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांनी केले आहे.
*****
25 November, 2025
शेतक-यांनी आधारभूत दरानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदी योजनेच्या लाभासाठी दलालांच्या अमिषाला बळी पडू नये-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतली आढावा बैठक
हिंगोली (जिमाका), दि. 25 : शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थांच्या अमिषाला बळी पडू नये. आपले मूग उडीद व सोयाबीन देऊ नये किंवा त्यांच्यामार्फत कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व एनसीसीएफ यांची यांची जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार एनसीसीएफमार्फत मूग उडीद व सोयाबीन खरेदीकरिता आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पणन महासंघाचे कुंडलीक शेवाळे, कृषी पणन मंडळाचे दिगंबर शिंदे, वखार महामंडळाचे व सीसीआयचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे 7 व महाराष्ट्र राज्य कृषि पणनच्या 11 खरेदी केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व एनसीसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26 साठी हिंगोली जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार एनसीसीएफमार्फत मूग उडीद व सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दि.30 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया पणन महासंघाकडून 7 खरेदी केंद्रावर दि.15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. तसेच कृषी पणन मंडळाकडून 2-3 दिवसामध्ये सुरू होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्येष्ठ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर न येण्यासाठी सवलत आहे. मात्र त्यांनी प्रतिनिधी म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यामार्फत नामनिर्देशन करून शेतमाल जमा करावा. स्वत: शेतकरी नोंदणी करण्यासाठी शासनाने ई- समयमुक्ती अँपवर नोंदणी करावी. सर्वसाधारणपणे 3 दिवसात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर जमा होतील. सर्व खरेदी केंद्रांना जास्तीत जास्त एसएमएस सोडून सोयाबीन खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान केंद्र शासनाने मूग उडीद व सोयाबीन खरेदीकरिता मूग 8768 रुपये प्रति क्विंटल, उडीद 7800 रुपये प्रति क्विंटल व सोयाबीन 5328 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केले आहेत. शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या शेतमालाची (सरासरी दर्जा) नुसार नजीकच्या प्रतवारी केंद्रावरून प्रतवारी करून घेऊनच आपला एफएक्यू दर्जाचा शेतमाल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा. ज्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मदत होईल, असे सांगितले.
सोयाबीन साठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पुढीलप्रमाणे फक्त एफएक्यू (सरासरी दर्जा) माती, काडी, कचरा व बाह्य पदार्थ डागी 2 टक्के, चिमलेले, अपरिपक्व व रंगहीन – 5 टक्के, कीड किंवा भुंगा लागलेले दाणे – 3 टक्के, मशीनने तुटलेले, भेगा पडलेले -15 टक्के व ओलावा -12 टकके शेतकऱ्यांनी मूग उडीद व सोयाबीन विक्री करिता आपल्या गावाजवळील एनसीसीएफच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन किंवा एनसीसीएफने तयार केलेल्या ई-समयमुक्ती मोबाईल अँपवरून करावी. नोंदणीसाठी ई-पीक पाहणी केलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. ही नोंदणी पॉस मशीनद्वारे करण्यात येणार असल्यामूळे प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संपूर्ण खरेदीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी खरेदीकरिता आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
या आढावा बैठकीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच कापूस खरेदीचाही आढावा घेतला.
**
सर्व वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य
हिंगोली (जिमाका), दि. 25 : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार सर्व मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या जी.एस.आर.1962 (इ) दि. 04 डिसेंबर 2018 आणि जी.एस.आर.6052 (इ) दि. 06 डिसेंबर 2018 अन्वये दि. 01 एप्रिल 2019 पासून उत्पादित सर्व नवीन वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरीमुळे होणारे गुन्हे रोखणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांवर एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांनाही एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी या कामाकरिता एफटीए एचएसआरपी सोल्यूशन प्रा. लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांसाठी एचएसआरपी प्लेटची नोंदणी आणि बुकिंग करण्यासाठी https://mhhsrp.com या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी.
जुन्या मोटार वाहनांवर सध्या वापरात असलेल्या नक्कल किंवा तत्सम दिसणाऱ्या नंबर प्लेट्स दि. 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी बदलणे आवश्यक आहे. दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी केवळ अधिकृत उत्पादकांकडून बसविण्यात आलेल्या एचएसआरपी प्लेट्स वैध मानल्या जातील व त्या वाहन पोर्टलवर नोंदविल्या जातील.
इतर कोणत्याही अनधिकृत उत्पादक किंवा पुरवठादाराकडून बसविलेल्या नंबर प्लेट्स मोटार वाहन कायदा व नियमांनुसार दंडनीय ठरतील. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर निर्धारित मुदतीत अधिकृत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एचएसआरपी संचासह बसविण्यासाठी जीएसटी वगळून दुचाकी व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, तीन चाकीसाठी 500 रुपये व इतर वाहनासाठी 745 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
एचएसआरपी उत्पादन वाहन मालकाला निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर एचएसआरपी बसविण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना, सोसायटीमध्ये शिबीर आयोजित करु शकतात. पण अशी सुविधा ही वाहन मालकाच्या ऐच्छिक राहील. कोणत्याही परिस्थितीत नियुक्त केलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट केंद्रावर मालकांना एचएसआरपी बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे 5, कळमनुरी येथे 2, वसमत येथे 3 व सेनगाव येथे 01 एचएसआरपी सेंटर कार्यान्वित आहेत. जिल्हृयातील संबंधित वाहनधारकांनी आपल्या वाहनांचे एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवून घ्यावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे.
******
24 November, 2025
जिल्ह्यात वाचन संस्कृती बळकटीसाठी ‘वाचन वीर प्रकल्प’अंतर्गत 31 मॉडेल शाळांची निवड
• निपुण हिंगोली 2.0 अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाची अंमलबजावणी
हिंगोली (जिमाका), दि. 24: निपुण हिंगोली 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी, तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांची सक्षम तयारी करता यावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन वीर प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून 31 मॉडेल शाळांची निवड करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात एकूण 5 तालुके असून 877 जिल्हा परिषद शाळा आहेत. यामध्ये 82 हजार 473 विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मुले 39 हजार 901 व मुली 42 हजार 572 आहेत.
वाचन वीर प्रकल्पांतर्गत निवडलेल्या 31 मॉडेल शाळांमध्ये 8 हजार 847 एवढी विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये 4 हजार 396 मुले व 4 हजार 451 मुलींचा समावेश आहे.
या प्रकल्पांतर्गत सर्व 31 शाळांमध्ये वाचन कक्ष व सुसज्ज ग्रंथालये उभारण्यात येणार असून, या कक्षांमध्ये स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सर्वांगीण अभ्यासासाठी आधुनिक, सुस्थित व वायुवीजनयुक्त वाचन कक्ष उपलब्ध असणार आहे. वाचन कक्ष २४x७ खुले राहणार असून विद्यार्थ्यांना विद्यार्थी-अनुकूल सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
व्यवस्थापनासाठी क्लास मॉनिटर व शिक्षक-प्रभारी नियुक्त करण्यात येणार आहे. सतत वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जेवर आधारित कक्ष असणार आहे. पॉवर बॅकअपची सुविधा उपलब्ध असणार आहे. सध्या गावठाण फीडरवरील 12 ते 16 तासांच्या वीजपुरवठ्याऐवजी वाचन कक्षांसाठी पूर्णवेळ वीज मिळणार आहे. प्रत्येक शाळेला अंदाजे दीड लाख रुपये किमतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. युपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, एनडीए, आरआयएमसी, नीट, शिष्यवृत्ती परीक्षा आदी विषयांवरील पुस्तके समाविष्ट असणार आहेत. हे सर्व वाचन कक्ष ग्रामीण शाळांमध्ये उभारण्यात येणार आहेत. निवडणुका पूर्ण झाल्यानंतर वाचन कक्षांच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.
अतिरिक्त उपक्रम
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पास सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार शंका समाधान सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार व रविवार ‘रीडिंग डे’ कार्यक्रम राबवून कादंबरी वाचनास प्रोत्साहन दिले जाणार आहे, असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले
***
शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र महाविस्तार एआय
हिंगोली (जिमाका), दि. 24 : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय हे अत्याधुनिक ॲप विकसित करण्यात आले आहे. हे कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आधारित ॲप शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट डिजिटल सहाय्यक ठरत आहे. शेती संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचे कार्य करते.
महाविस्तार ॲप पारंपारिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील अंतर कमी करते. या ॲपमुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचवून उत्पादन वाढवण्यासाठी मदत होणार आहे. महाविस्तार ॲपमुळे हवामान अंदाज व बाजार भावावर आधारित तात्काळ निर्णय घेता येतो. पिकांसाठी योग्य खत विनियोजन करता येईल. तसेच कीडरोग नियंत्रणाच्या उपाययोजना वेळेवर राबविता येते. याशिवाय या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनांविषयी माहिती मिळणार आहे. शेतीसंबंधी समस्या सोडविण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा परिचय होणार आहे. ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन दर्जा सुधारेल. शेती व्यवसाय अधिक सुलभ व परिणामकारक बनेल. तसेच संपूर्ण कृषी समुदायाला आधुनिक तांत्रिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व लाभदायक करण्याचे कार्य करणार आहे.
ॲपमधील चॅट बॉटद्वारे शेतकऱ्यांना मराठी भाषेत प्रश्न विचारुन तात्काळ शासकीय स्त्रोतांकडून खात्रीलायक उत्तरे प्राप्त होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर महाविस्तार ॲप डाउनलोड करुन आपला मोबाईल क्रमांक वापरुन सहज नोंदणी करुन शकतात. नोंदणी झाल्यानंतर ॲपमध्ये उपलब्ध सर्व सुविधा पूर्णपणे मोफत वापरता येतात. तसेच सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना लीडर बोर्डवर स्थान मिळेल. ज्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये ज्ञानवर्धनासोबत स्पर्धात्मकता निर्माण होईल.
हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या सर्व सभासदांकडून ॲप डाऊनलोड करावे आणि नियमितपणे या ॲपचा उपयोग करुन आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
******
23 November, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांची तपासणी
• पात्रता परीक्षेला ५०६२ उमेदवारांची उपस्थिती तर २४६ अनुपस्थित
हिंगोली, दि. २३ (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी आज आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ हिंगोली शहरातील ११ परीक्षा केंद्रांवर शांततेत आणि सुरळीत पार पडली. परीक्षेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः विविध परीक्षा केंद्रांना भेट देत तपासणी केली.
ही परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांमध्ये पार पडली. या दोन सत्रात झालेल्या परीक्षेला एकूण ५३०८ उमेदवार पात्र होते.
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक परिरक्षक तसेच प्रत्येक केंद्रावर परीक्षा केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार पेपर-१ सकाळी १०.३० ते १.०० मध्ये २४४२ पैकी २३३९ उपस्थित तर १०३ गैरहजर राहिले आणि पेपर-२ दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत २८६६ पैकी २७२३ परीक्षार्थी उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली आणि १४३ गैरहजर राहिले.
जिल्हा परीषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी यावेळी परीक्षा केंद्रांवर भेटी देत आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी केंद्रप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या तसेच सर्व व्यवस्था प्रत्यक्ष पाहून समाधान व्यक्त केले.
परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित संनियंत्रण अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी (प्रा.), जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे संपूर्ण सत्र शिस्तबद्ध व सुरळीत रीतीने पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ही परीक्षा शहरातील पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश, स्कूल जवळा पळशी रोड हिंगाली,
अनसुया विद्यामंदिर खटकाळी परिसर हिंगोली भाग-१,
आदर्श महाविद्यालय, हिंगोली इमारत भाग-१, शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूल, हिंगोली, सरजुदेवी भि.भा. आर्य कन्या विद्यालय, हिंगोली, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल हिंगोली, शिवाजी महाविद्यालय कोथळज रोड, माउंट लिटेरा झी स्कूल नरसी फाटा हिंगाेली आणि अनसुया विद्यामंदिर खटकाळी परिसर हिंगोली येथे घेण्यात आली.
*****
21 November, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सुकळीवीर येथील शक्तीपीठ महामार्गाच्या शेतजमिनीची पाहणी
* वारंगा फाटा जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट
हिंगोली (जिमाका) दि. 21 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सुकळीवीर येथील शक्तीपीठ महामार्गाच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गासाठी आवश्यक जमीन, प्रलंबित बाबी, मोजणी तसेच संबंधित कामांच्या प्रगतीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रशासनाला आवश्यक त्या सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी वारंगा फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील पायाभूत सुविधा, स्वच्छता, विद्यार्थी उपस्थिती, पोषण आहार व्यवस्था तसेच अध्यापनाची गुणवत्ता यांची पाहणी केली. शिक्षकांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेऊन कामे गतीमान केली जातील, असे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
******
विविध योजनांचे देण्यात आलेले उद्दिष्ट बँकांनी वेळेत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी विविध शासकीय योजनांमध्ये देण्यात आलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, व्यवस्थापक रवींद्र पत्की, कृषी उपसंचालक पी. एस. हजारे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुजित झोडगे, विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित उपस्थित होते.
बैठकीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगट कर्ज प्रकरणे आदी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
या सर्व योजनांचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
एसबीआयने समाधानकारक काम न केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. संबंधित एलडीएमसोबत सोमवार रोजी विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रस्तावांच्या मंजुरीमध्ये विलंब झाल्यामुळे याबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला. बँक ऑफ इंडिया यांनी 20 नोव्हेंबरपर्यंत मंजूर प्रस्तावांची खातरजमा करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. वसमत बँक ऑफ महाराष्ट्र यांनी केलेल्या मंजुरींची पडताळणी करून लेखी अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले.सर्व प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करून निकाली काढावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत बँकनिहाय उपलब्ध प्रस्ताव, मंजुरीची स्थिती, विलंबाची कारणे याबाबत प्रत्येक बँकेने पुढील बैठकीत सविस्तर माहिती सादर करावी.
बँकांकडे अनेक प्रस्ताव असून त्यांची मंजुरी प्रलंबित असल्याचे आढळले. बँका आणि उद्योजक यांची एसओपी तयार करून घ्यावी, तसेच प्रत्यक्ष कामकाजाची यादी तयार करावी. गुरुवारी बँक व्यवस्थापकांची विशेष बैठक घेण्याचे ठरविण्यात आले असून त्यादिवशी नामंजूर व प्रलंबित प्रस्तावांची संपूर्ण माहिती सादर करावी, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी निर्देश दिले.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिक गतीने कार्यवाही करून नागरिकांना वेळेत लाभ मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
********
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक
हिंगोली, (जिमाका) दि. २१ : जिल्ह्यातील तीनही नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरु असून, या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक (ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले), ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती स्थापण्यात आली आहे. या समितीत जिल्हा पोलिस अधीक्षक, उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडणे आवश्यक आहे. अर्जाचा विहित नमुना महाराष्ट्र शासनाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेसोबत दिलेला आहे.
*जाहिरात प्रमाणन करण्यासाठी उमेदवारांनी यामध्ये खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.*
या अधिसूचनेनुसार भाग चारमध्ये जाहिरात प्रमाणनासाठी अर्ज करताना
इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित / प्रसिद्ध करावयाच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणनः सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित / प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकविषयक जाहिरातींचे माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे.
खालील स्वरूपाच्या आशयाचा समावेश असलेल्या जाहिराती प्रसारित / प्रसिद्ध करता येणार नाहीत व अशा स्वरुपाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणनही केले जाणार नाही,
(क) भारतीय संविधानाची पायमल्ली, केंद्र / राज्य शासनाच्या कायद्यांचे उल्लंघन,
(ख) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांची पायमल्ली,
(ग) धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, पेहराव इत्यादींच्या आधारे तेढ अथवा शत्रुत्वाची शक्यता,
(घ) प्रार्थना स्थळांचे छायाचित्र / छायाचित्रणाचा समावेश,
(ङ) कायदा व सुव्यवस्थेला आव्हान, हिंसेला प्रोत्साहन, शांततेचा भंग,
(च) न्यायालयाचा अथवा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेची बदनामी,
(छ) देशाच्या ऐक्याला, सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा,
(ज) अन्य कुठल्याही देशावर टिका, अवमानजनक टिप्पणी अथवा तिरस्कारपूर्ण विधान,
(झ) संरक्षण दलाच्या अधिकारी/कर्मचारी अथवा संरक्षण दलाचे छायाचित्र/छायाचित्रण,
(ञ) राजकीय पक्ष, राजकीय नेता किंवा अन्य कोणावरही खोटे आरोप,
(ट) कुठल्याही राजकीय नेत्याच्या अथवा व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप,
(ठ) नीतिमत्ता व सभ्यतेचे उल्लंघन,
ड) अश्लिलतेला प्रोत्साहन,
(३) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक / पोटनिवडणुकांसंदर्भातील प्रस्तावित जाहिरातीचे संबंधित समितीने पूर्वप्रमाणन केले नसल्यास, अशा जाहिरातीचे प्रसारमाध्यमांना प्रसारण/प्रसिद्धी करता येणार नाही.
(४) निवडणूकविषयक जाहिरातींवर राजकीय पक्षाने खर्च केला असल्यास त्याचा समावेश पक्षाच्या; तर उमेदवाराने खर्च केला असल्यास त्याचा समावेश उमेदवाराच्या निवडणूक खर्चात करणे आवश्यक आहे.
(५) एखाद्या व्यक्तीस किंवा मतदारास आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया हँडलवरून राजकीय मत व्यक्त करण्यास साधारणतः कुठलेही बंधन नाही. (मात्र, त्यातून कायदा सुव्यवस्था, सभ्यता/ नीतिमत्ता, निवडणुकीत अडथळा, अपराधास चिथावणी इत्यादींसंदर्भात प्रश्न उपस्थित होता कामा नये. त्याचबरोबर अब्रुनुकसान किंवा न्यायालयाचा अवमान होणार नाही, याबाबत दक्षता घेणे आवश्यक राहील.) त्यास राजकीय जाहिरात म्हणून समजले जाणार नाही. त्यामुळे त्यास पूर्वप्रमाणनाची आवश्यकता नाही; परंतु निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्यापासून कुठल्याही व्यक्ती/ मतदारास एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या लेखी परवानगीशिवाय परस्पर जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही. तशी जाहिरात किंवा तसा प्रचार करावयाचे असल्यास तिचे पूर्वप्रमाणन करणे बंधनकारक असेल व त्या प्रस्तावित जाहिरातीचा किंवा प्रचाराचा खर्च यथास्थिती संबंधित राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या/उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करणे आवश्यक राहील.
00000
20 November, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती स्थापन
हिंगोली: (दि.20)जिमाका: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था/ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 चा कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी) स्थापना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.
निवडणूक कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या सोशल मिडीया, टी. व्ही. चॅनेल, रेडीओ, केबल्स व वर्तमानपत्रातील निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे, जाहिरातींना परवानगी देणे, एखादी बातमी पेड न्यूज आहे का, हे तपासून त्याबाबत योग्य कारवाई करणे आदी कामे समिती करणार आहे. समितीमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे अध्यक्ष असून, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित मुख्याधिकारी हे समिती सदस्य असून जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
*माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज:*
टीव्ही चॅनेल, रेडीओ एफएम, आकाशवाणी, प्रचाररथ, सिनेमागृह, सोशल मिडीया तसेच वृत्तपत्रांच्या इ-आवृत्तीतील (जाहिराती सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्या दृक-श्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) जाहिरातींसाठी प्रसारणपूर्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (इंग्रजी किंवा मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्ये आवश्यक माहिती भरुन सादर केला जावा. अर्जासोबत दोन सीडी (सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्या टंकलिखीत मजकुरासह दोन प्रती ट्रान्सस्क्रीप्ट जिल्हा माहिती कार्यालय, दुसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण समितीकडे फक्त उमेदवारांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण करून दिले जाणार आहे.
राजकीय पक्षांच्या जाहिराती राज्यस्तरीवरील समितीकडून प्रमाणित करुन दिल्या जातील. त्यासाठी मुंबई येथील समितीशी संपर्क साधावा. हिंगोली जिल्ह्यातील उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी (प्राधिकृत असलेले) जिल्हा समितीकडे अर्ज सादर करु शकतात. त्याप्रमाणेच फक्त उमेदवाराच्या वैयक्तिक सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरील पोस्ट, फोटो, व्हिडीओ यांच्यासाठी पूर्व प्रमाणिकरण करुन घेण्याची गरज नाही. प्रत्येक ऑडिओ जाहिरात किंवा ऑडिओ-व्हिज्युअल जाहिरात स्वतंत्र असावी. एकाच सीडीमध्ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नये. अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता, जाहिरात कोणत्या उमेदवारासाठी आहे. त्याचे नाव, पक्षाचे नाव, जाहिरात कुठे दाखवणार, जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरातीतील भाषा यांचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे.
मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी तीन दिवस आणि इतर उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी सात दिवस अगोदर अर्ज करु शकतात. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्य असावा. इतरांची बदनामी करणारा, जाती-जातींमध्ये, धार्मिक तेढ निर्माण करणारा नसावा. देशविघातक कृत्याला प्रोत्साहन देणारा नसावा. तसेच मुद्रीत माध्यमातील जाहिराती मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाची असल्यास जिल्हास्तरीय समितीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
*****
19 November, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ई-केवायसी कॅम्प, महसूल कार्यालये व जिल्हा परिषद शाळांना दिली भेट
हिंगोली(जिमाका),दि.19 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्ह्यातील विविध शासकीय उपक्रम, महसूल कार्यालये तसेच जिल्हा परिषद शैक्षणिक संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
नागरिकांना शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
*बासंबा व नरसी ई-केवायसी कॅम्पना भेट*
जिल्हाधिकार्यांनी बासंबा आणि नरसी येथील ई-केवायसी कॅम्पची पाहणी करत लाभार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला. नागरिकांना अडथळेविना सेवा मिळावी तसेच कामकाजात गती आणावी, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
*सेनगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयास भेट*
सेनगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात भेट देऊन प्रलंबित कामकाज, नोंदणी प्रक्रिया व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची तपासणी करण्यात आली. महसूल विषयक प्रकरणे वेळेवर निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले.
*पेडगाव व नांदुरा जिल्हा परिषद शाळेला भेट*
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पेडगाव व नांदुरा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षणाची गुणवत्ता, शालेय सुविधा, स्वच्छता व पोषण आहार यांचा आढावा घेतला. शाळांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व विभागांनी लोकाभिमुख व पारदर्शक कामकाजावर भर देत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक परिणामकारक बनवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
******
जिल्ह्यातील कृषि सिंचन योजनांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा
*कृषि सिंचन विभागाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश*
• जलयुक्त शिवार अभियान 2.0
• प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना
• गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा
• जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषि विभागास तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना
हिंगोली, दि.१९ (जिमाका): जिल्ह्यातील जास्तीत जास्त कृषिक्षेत्र सिंचनाखाली आणून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने कृषि विभागाने तातडीने सुधारणा करून ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषि अधिकारी पी. एस. कच्छवे, विकास याचावाड, व्ही. एन. निर्वळ यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2.0 व गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केल्या.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2.0 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 39 गावांची निवड करण्यात आली असून या प्रकल्पांतर्गत 3 प्रकल्प मंजूर आहेत. त्यात प्रकल्प क्रमांक 1 व 2 (तालुका कळमनुरी) येथील मृद व जलसंधारण कामांच्या प्रगतीवरून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे गतीने पूर्ण करण्यासाठी तातडीने सुधारणा करून प्रगती करण्याच्या सूचना कृषि विभागाला देण्यात आल्या. तसेच या दोन्ही प्रकल्पांना स्वतः जिल्हाधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रकल्प क्रमांक 3 (तालुका सेनगाव) येथील कामांबाबत समाधान व्यक्त करून उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कळमनुरी तालुक्यानेही प्रकल्प क्र. 3 च्या धर्तीवर येथील कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संपूर्ण प्रकल्पासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली असून प्रस्तावित आराखड्यानुसार नियोजनबद्धपणे सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
*शेतकरी लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम*
उत्पादन पद्धतीतील वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांनी कृषि साहित्य खरेदी करून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आदेश सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांना देण्यात आले. यासाठी विशेष मोहीम राबवून प्रगती वाढवावी, असे सांगण्यात आले.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 — बहुतेक विभागांची समाधानकारक प्रगती असून, कृषि विभागाच्या अभियानांतर्गत 73 गावांची निवड करण्यात आली असून जलसंधारण विभाग, लघुसिंचन, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पुर्णा पाटबंधारे व भूजल सर्वेक्षण या विभागांनी मिळून 90 टक्के कामे पूर्ण केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. याउलट कृषि विभागाची प्रगती अत्यंत कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.
ग्राउंड ट्रुथिंगमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण — कृषि विभाग मागे जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याला 19,858 स्थळ पडताळणीचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी 9,877 स्थळ पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. जलसंधारण व इतर विभागांनी लक्ष्याप्रमाणे कामे पूर्ण करून अतिरिक्त 4,744 पडताळणीही केली आहे. परंतु कृषि विभागाने तात्काळ स्थळ पडताळणी करून तातडीने कामाची गती वाढवावी, असे स्पष्ट निर्देश दिले गेले.
बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कामाचे सादरीकरण केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकल्प आणि अभियानांची कामे निर्धारित मुदतीत आणि नियमानुसार पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
*****
जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
* जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न
हिंगोली, (जिमाका) दि. 19: शासनाच्या आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग प्रसार शून्यावर आणण्यासाठी १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबरदरम्यान कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश पवार, शिक्षणाधिकारी आशावरी काळे, सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. शिवाजी गीते, पथकप्रमुख अधिकारी डॉ. सुनिल देशमुख यांची उपस्थित होती.
जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. तेव्हा नागरिकांनी कुष्ठरोग सर्वेक्षण पथकाला सहकार्य करून स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण व समाज कल्याण या विभागांनी समन्वय राखून अभियान यशस्वी राबवावे, अशा सूचना बैठकीत दिल्या. शहरी भागामध्ये विशेष लक्ष देऊन सर्वेक्षण करावे, त्याचबरोबर या अभियानात राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रम (आर. बी. एस.के.) टीममार्फत शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
राज्याने सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय निश्चित केले आहे. या ध्येयाच्या अनुषंगाने, कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नवीन कुष्ठरोग शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून अभियानात समाजातील निदान न झालेले कुष्ठरोग लवकरात लवकर शोधून काढणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरोग शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करणे आणि त्यामुळे होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. या अभियानात घरोघरी जाऊन टीममार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते यांनी प्रास्तावित करताना सांगितले.
या अभियानात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील 1135 सर्वेक्षण टीम मार्फत एकूण 11 लाख 23 हजार 836 लोकसंख्येचे सर्वेक्षण करुन एकूण 723 गावामध्ये सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, महिला बाल कल्याण विभागाचे जी. जी. कापसे, डॉ. छाया कोल्हाळ, डॉ. बालाजी भाकरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, मंचक पवार, चंद्रकांत पाटील, अमोल कुलकर्णी, अझर अली, शेख मुनाफ, वैजनाथ देशमुख, केशव डासरे आदी उपस्थित होते.
***
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार
• गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
हिंगोली (जिमाका), दि.19 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याव्यतिरिक्त उर्वरित कामकाज सुरळीत सुरू असून, पात्रता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करुन, लवकरात लवकर नवीन पात्रता प्रमाणपत्र सुरु करणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
महामंडळाची पात्रता प्रमाणपत्र संबंधीची प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती, मात्र व्याज परतावा व बँक मंजुरी प्रकरणांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात असून सप्टेंबर, २०२५ अखेर होल्ड केलेली व स्थगित केलेली प्रकरणे वगळता व्याज परताव्यासाठी दावा केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही एजंट आणि ट्रॅक्टर एजन्सी यांनी संगनमत करून,एकच मोबाईल क्रमांक वापरुन अनेक प्रकरणे महामंडळाकडे दाखल केली होती. त्यातील काही व्याज परताव्याचे पैसे एजंटने स्वत: च्या खात्यावर घेतले असल्याचे निदर्शनास आले आहे. या माहितीची दखल घेत, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकांना त्वरित कारवाईसाठी पत्र दिले. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी तातडीने प्रकरणाची दखल घेत तोफखाना पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे संबंधितांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नाशिक व अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. अशा घटना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील एजंटमार्फत किंवा इतर यंत्रणांमार्फत घडल्या आहेत का, याची तपासणीदेखील महामंडळ करीत आहे.
नाशिक व अहिल्यानगर येथे घडलेल्या गैरव्यवहारासारखी प्रकरणे अन्य ठिकाणी घडू नये, यासाठी खाते प्रमाणिकरण प्रणाली लागू करण्यात येत आहे. एजंटमार्फत दाखल केलेली अशी प्रकरणे महामंडळाने तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केली आहेत. अशा लाभार्थ्यांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांसह आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयक यांना संपर्क करावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in प्रणालीवर उपलब्ध आहे. यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता, अन्य प्रकरणी एकच मोबाईल क्रमांक/ लॉगीन करुन एकच प्रकरण दाखल करता येईल, अशी सुधारणा महामंडळाने प्रस्तावित केली असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली आहे.
******
आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त माहितीपत्रकाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते विमोचन
हिंगोली (जिमाका), दि.19 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.आर.दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने विशेष गरजा असलेल्या मुलांचे (दिव्यांग मुले) यांचे संस्थाबाह्य पुनर्वसन या थिमसह हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहितीपत्रकाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. जिल्ह्यात खाजगी रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा बाल संरक्षण व चाईल्ड हेल्प लाईन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकता अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दिली. याप्रसंगी बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित, प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, राजरत्न पाईकराव आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.
******
स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा
हिंगोली (जिमाका), दि.19 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधा अभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुजाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलांमुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 चे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर भरणे सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास सादर करावे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
*******
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली(जिमाका), दि.19: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रगती चोंडेकर, नायब तहसीलदार संतोष बोथीकर, सचिन जोशी, डी. एस. जोशी यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्री. माचेवाड यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
******
18 November, 2025
'माय भारत केंद्र' युवकांसाठी दिशादर्शक - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली,(जिमाका)दि. 18 : जिल्ह्यातील 'माय भारत केंद्र' हे युवकांसाठी दिशादर्शक ठरणारे असून या संधीचा लाभ युवा वर्गाने घेऊन राष्ट्रीय स्वाभिमान व एकात्मता साधून आत्मनिर्भर भारत निर्माण करावा, असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले.
येथील माय भारत केंद्राच्या वतीने एकात्मता युनिटी मार्च पदयात्रेतून एकतेचा जयघोष, राष्ट्रीय अभिमान आणि स्वावलंबनाचा संदेश घेऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून पदयात्रेचा प्रारंभ करताना जिल्हाधिकारी गुप्ता बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माय भारत केंद्राचे आदर्श युवा पुरस्कार्थी पत्रकार डॉ.विजय निलावार, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, समाजसेविका सुनीता मुळे मंचावर उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकातून केंद्र प्रमुख अनिल ढेंगे यांनी योजनाबद्दल माहिती दिली. पदयात्रेची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केल्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची व आत्मनिर्भर भारतची शपथ जिल्हाधिकारी श्री. गुप्ता तर व्यसन मुक्तीची शपथ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपस्थित युवक-युवतींना दिली.
ही पदयात्रा शिवाजीराव देशमुख सभागृहात पोहचली.त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे, डॉ. विजय निलावार, क्रीडा अधिकारी मारावार, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा प्रमुख प्रा.डॉ.पवन वासनिक, प्रा.किशोर इंगोले, प्रा.डॉ.सुधीर वाघ आदींच्या हस्तेसांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर हिंगोली माय भारत केंद्राच्या माध्यमातून युवकांनी मजल मारली असून भविष्यातही हिंगोली जिल्ह्याचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करून शुभेच्छा दिल्या. 1993 ला मला या केंद्राने आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक पुरस्काराचा मानकरी ठरलो तसे तुम्हा युवक-युवतींबाबत या उपक्रमातून व्हावे, अशा शुभेच्छा देऊन डॉ. निलावार यांनी अपेक्षा व्यक्त केल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात युवक युवती नि सांघिक व वैयक्तीक रंगदार उत्स्फूर्त कला प्रदर्शन केले. प्रथम पारितोषिक भारतीय विद्या मंदिरच्या ललाटी भंडारा, गोंधळ या नृत्याला, द्वितीय अनुसया विद्या मंदिरच्या अंबाबाई गोंधळाला यावे या उपक्रमाला, तिसरे पारितोषक तिसरे सरजुदेवी भिकुलाल भारूका विद्यालयातील लावणी नृत्याला, उत्तेजनार्थ कु.माही घुगे, हर्षदा कुगावकर याना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व मेडल्स देऊन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या सर्व उपक्रमात व कार्यक्रमात हिंगोली जिल्हा स्काऊट गाईडचे स्वयंसेवक व प्रमुख माधुरी दळवी, सरजुदेवी भारुका विद्यालयाचा एन.सी.सी.कॅडेट व विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना, आदर्श महाविद्यालय, न्यू मॉडर्न कॉलेज, खाकीबाबा इंग्लिश स्कूल, भारतीय विद्यामंदिर, अनुसया विद्या मंदिर, शिवाजी महाविद्यालय हिंगोलीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि समन्वयक, संडे ऑन मॉर्निंग सायकलिंग ग्रुप सह राष्ट्रप्रेमी नागरिक मेरा युवा भारत केंद्राचे प्रवीण पांडे, क्रीडा विभागाचे आत्माराम बोथीकर आदी सर्व निमंत्रित सहभागी झाल्याने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे केंद्र प्रमुख अनिल ढेंगे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.किशोर इंगोले यांनी केले. शेवटी सामूहिक वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
***
17 November, 2025
हिंगोली व वसमत नगर परिषद निवडणूक निरीक्षक म्हणून रत्नदीप गायकवाड यांची नियुक्ती
• राजकीय पक्ष, उमेदवार, नागरिक किंवा मतदाराची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9702220024 हा आहे.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेले निवडणूक निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या स्वाक्षरीने आदेशित करण्यात आले आहे.
***
'नशामुक्त भारत अभियाना'त सर्वांनी सहभागी व्हावे - जिल्हधिकारी राहुल गुप्ता
* समारोपीय कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. १७: केंद्र शासनाच्या निर्णयानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये उद्या मंगळवार, दि. १८ रोजी 'नशामुक्त भारत अभियानांचा समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
दि. १ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान 'नशामुक्त भारत अभियाना'अंतर्गत विविध जागरुकता उपक्रम राबवले गेले. या उपक्रमांमध्ये नशामुक्त भारत प्रतिज्ञा व लेखन, रांगोळी, चित्रकला, घोषवाक्य लेखन, रॅली, नुक्कड नाटक, चर्चासत्रे, कार्यशाळा, योगशाळा आणि नागरिक जागरूकता अभियानांचा समावेश होता.
या कार्यक्रमांचा समारोप उद्या मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी अमृतसर, पंजाब येथे होणार आहे. या ठिकाणी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील सर्व शालेय, महाविद्यालयीन, आश्रमशाळा आणि अनुदानित विना अनुदानित वसतिगृहांमध्ये सकाळी ११ वाजता सामूहिक आणि वैयक्तिक नशामुक्त प्रतिज्ञा घेतली जाईल. यासोबतच सोशल मिडियावर #NMBA हॅशटॅगसह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून, देशव्यापी नशामुक्त आंदोलनास जास्तीत जास्त पॅम्पलेट्स आणि जाहिरातांचे समर्थन दिले जाईल.
याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, सामाजिक संस्था, खाजगी आणि शासकीय वसतिगृहे, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये 'नशामुक्त भारत अभियाना'च्या ई-प्रतिज्ञेसाठी एकत्रित अहवाल सादर करावा लागणार आहे. हा कार्यक्रम सोशल मीडियावर प्रसारित करणे, विविध माध्यमांद्वारे त्याची जाहिरात करणे आणि त्याचे राष्ट्रीय सूचना विभागामार्फत राष्ट्रीय स्तरावर रिपोर्टिंग करण्यात येणार आहे.
नशामुक्त भारत अभियानाने समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करणे आणि एक मजबूत जागरुकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
***
खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओवरील आक्षेपार्ह प्रसारणावर राहणार नियंत्रण
• जिल्हास्तरीय केबल टेलिव्हिजन नेटवर्क सनियंत्रण समितीची बैठक संपन्न
हिंगोली,(जिमाका)दि. 17 : खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 नुसार जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज दि. 17 नोव्हेंबर, 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
या बैठकीत खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व खाजगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 चे पालन करणे बंधनकारक असून, सदर कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत खाजगी वाहिन्यांनी फ्रि टू एअर वाहिन्या आणि दूरदर्शन वाहिन्याचे प्रक्षेपण करणे बंधनकारक आहे. जाहिरात संहितेचे कार्यक्रमाच्या प्रसारणात उल्लंघन करणे, विविध धर्म, जाती, भाषा, वर्ग, समूह आणि समाजाच्या भावना दुखविणारे किंवा समाजात द्वेषभावना पसरविणारे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे अधिकार या समितीला असणार आहेत. अशा प्रसारणाची तक्रार आल्यास संबंधित केबल चालकाकडून कार्यक्रमाची दृश्ये मागविण्याचे अधिकार समितीला आहेत. ज्या नोंदणीकृत खाजगी वाहिन्या किंवा एफ. एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आक्षेपार्ह प्रक्षेपण करत असतील, अशा वाहिन्यांची किंवा रेडिओची तक्रार प्राप्त झाल्यास या कायद्यानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच अनिवार्य वाहिन्यांच्या प्रक्षेपणात व्यत्यय येणे, सिग्नल न मिळणे अशा त्रुटी आढळल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास प्राधिकृत आधिकाऱ्यांनी संबंधित केबल ऑपरेटरला समज द्यावी. जिल्ह्यातील कार्यरत खासगी एफ. एम. रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सद्वारे हवाई प्रसारण संहितेचे पालन होते का नाही, यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या.
तक्रारींची शहानिशा करुन केबल चालक किंवा खासगी एफ. एम. रेडिओ विरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करावी. जर एखाद्या कार्यक्रमाचा सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत असेल किंवा कोणत्याही समाजात असंतोष निर्माण होत असेल तर तात्काळ जिल्हाधिकारी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या त्वरित नजरेस आणून द्यावे. तसेच जिल्ह्याकरिता तक्रार निवारण केंद्राची स्थापना करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने स्थानिक वृत्त वाहिन्यांना केबल ऑपरेटर म्हणून नोंदणी देण्याऐवजी फक्त केबल ऑपरेटर किंवा केबल परिचालक म्हणूनच परवानगी द्यावी. टपाल विभागानेही याबाबतची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी किंवा एफ. एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह संदेशाचे प्रसारण होत असल्यास संबधित वाहिन्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांमध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 कायद्याबाबत विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव प्रभाकर बारहाते यांनी या खाजगी दूरचित्रवाणी सनियंत्रण समितीची रचना व तीची कार्ये तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरात याविषयी दर्शकांकडून येत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच केबल वाहिन्या आणि केबल चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभर कायदा लागू केला आहे. तसेच स्थानिक खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्राचे सनियंत्रण करण्याचे काम ही समिती करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
या बैठकीस समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी इरफान पठाण, सरजूदेवी भिकुलाल आर्य कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या माधवी गुंडेकर, महिलासाठी काम करणाऱ्या उज्वल प्रसारक मंडळ या स्वयंसेवी संस्थेचे उज्वल पाईकराव, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी गजानन देशमुख, समर्थ पत्रकारिता व जनसंवाद महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे यांची यावेळी उपस्थिती होती.
*****
15 November, 2025
आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मोबाईलचा सकारात्मक वापर करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हिंगोली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 15 : भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जावे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सकारात्मक वापर करून अभ्यास व पुस्तके वाचण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी केले. तसेच ‘आदि कर्मयोगी अभियान’अंतर्गत राज्य व देश पातळीवरील यशाबद्दल त्यांनी प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे तसेच या अभियानात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
कळमुनरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे, सहायक प्रशासन अधिकारी आर.एस. भडके, आर. एल. भोसले, डी.यु. भानापुरे, लेखा अधिकारी कपिल पर्रे, ओ. एस. फड (सं.स.), 'उगम'चे जयाजी पाईकराव, सिरळीच्या अनुदानित आश्रमशाळेचे अध्यक्ष श्री. देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘आदि कर्मयोगी अभियान’मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जे.आर. सानप, विलास राठोड, स्वाती किर्तनकार, बालाजी काळे, अरविंद सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिलीप महाजन यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी आदिवासी समाजातील शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि जिल्ह्यातील 10 वी व 12 वीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनुदानित आश्रमशाळा सिरळी येथील 35 आदिवासी विद्यार्थिनींनी फक्त 15 मिनिटांत भागवत कथा लिहिण्याचा विक्रम केला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या सर्व 35 विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपात आपल्या भाषणातून डी. यु. भानापुरे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.
**
































