'लोकसंवाद'मधून युवकांमध्ये एड्सविषयी जनजागृती
हिंगोली, दि. २४ (जिमाका) : एचआयव्ही असलेले गैरसमज दूर करून युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘लोकसंवाद’ कार्यक्रम मोची गल्ली, गाडीपुरा येथील श्री गुरु रविदास गणेश मंडळात पार पडला. यानिमित्त आयसीटीसी, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन अंतर्गत एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी आणि प्र.जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके यांनी मार्गदर्शन केले. एचआयव्ही संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय, गैरसमज, कलंक व भेदभाव, मानसिक आरोग्य, मादक पदार्थांचा दुरुपयोग तसेच एचआयव्ही/एड्स कायदा-२०१७ याबाबत माहिती देण्यात आली.
समुपदेशक बालाजी चापाकानडे यांनी एचआयव्ही संसर्गाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि एचआयव्ही बाधित व्यक्तींशी संवेदनशीलतेने वागण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
एचआयव्हीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी एचआयव्हीविषयक क्यूआर कोड स्कॅन करून ‘सेल्फ रिस्क असेसमेंट’ केले. या उपक्रमातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन कुरील, सचिव पवन कुरील, सदस्य रोहित कुरील, रामलाल कुरील, बलराम कुरील आणि बजरंग कुरील यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment