लाभार्थ्यांच्या घरी आज लागणार ‘आशीर्वादाचा दिवा’
- मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
_कामचुकारांवर कारवाई; ‘काम नाही, वेतन नाही’ तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी_
हिंगोली, दि. २९ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय सेवांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी उद्या (बुधवार, ३० सप्टेंबर) ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन ही कार्यवाही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या दत्तक गावांना आठवड्यातून किमान एक दिवस भेट द्यावी. गावातील विकासकामे आणि विविध शासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रभावीपणे राबवावा. २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता कार्यक्रम आयोजित करावेत. प्रत्येक शाळा व अंगणवाडीमध्ये परसबाग तयार करावी, असेही निर्देश देण्यात आले.
प्रत्येक कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठका घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा. तसेच जिल्ह्यात महिला बचत गटांची मोठ्या प्रमाणावर स्थापना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.
कामकाजात निष्काळजीपणा आणि दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देताना त्यांनी ‘काम नाही, वेतन नाही’ या तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत ‘आपले सरकार’ पोर्टल, पीजी पोर्टल तसेच शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके आदींच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. संबंधित कामकाजात आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मंजुश्री कल्लेवाड, शिक्षणाधिकारी (योजना) संदीप सोनटक्के, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment