21 September, 2026

* लोकसंवाद कार्यक्रमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन* श्रीराम बाल गणेश मंडळ, नवा मोंढा येथे लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन*



 हिंगोली, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत श्रीराम बाल गणेश मंडळ, नवा मोंढा, हिंगोली येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगार तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

        जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या वतीने रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यासाठी युवक-युवतींनी कोणत्या पद्धतीने नोंदणी करावी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आदींबाबत कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी श्रीराम बा. मगर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

        महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात सहा ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथे शासकीय तंत्रनिकेतन, कळमनुरी येथे वराहमिहीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), तोंडापूर येथे कृषी विज्ञान केंद्र, औंढा नागनाथ येथे शककर्ता शालीवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सेनगाव येथे तोष्णीवाल महाविद्यालय आणि वसमत येथे बहिर्जी स्मारक महाविद्यालय या ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत.

        या रोजगार महाकुंभात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी महास्वयंम पोर्टल www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी. तसेच https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकद्वारेही नोंदणी करता येणार आहे. पात्रताधारक उमेदवारांना संबंधित पदांसाठी अर्ज करणे सुलभ व्हावे, यासाठी नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया यावेळी समजावून सांगण्यात आली.

        रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून नामांकित कंपन्या, स्थानिक उद्योग तसेच शासकीय स्वयंरोजगार योजनांचे प्रतिनिधी थेट उमेदवारांची निवड व मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी आपल्या जवळच्या संबंधित केंद्रावर दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी श्रीराम बा. मगर यांनी केले.

        श्रीराम बाल गणेश मंडळ, नवा मोंढा, हिंगोली व युवा फ्रेंड्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन हिंगोली नगरपालिकेचे गटनेते श्रीराम बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील यांनी लोकसंवाद उपक्रमाची भूमिका व उद्देश स्पष्ट केला. यावेळी हिंगोली नगरपालिकेचे गटनेते श्रीराम बांगर, जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर भारती, मानसी राऊत व गोपाल दुबे, घनश्याम तापडिया, ओम सारडा, आनंद अग्रवाल, सागर तापडिया, शंकर अग्रवाल, अर्पित दुबे, अक्षय सारडा, गगन चौरसिया, केशव दुबे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांचे व श्रीराम बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

                                                                    00000

No comments: