24 September, 2026

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी पात्र पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी- जिल्हाधिकारी

 


हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ९९ मतदारांची नोंदणी

हिंगोली, दि. २४ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने २२ सप्टेंबर २०२६ पासून संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ९ हजार ९९ मतदारांची नोंदणी झालेली आहे. दि. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पात्र पदवीधर नवमतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रगती चौडेकर तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


निवडणूक कार्यक्रम

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ असून, नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण होणार आहे.


नवमतदारांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा

दि. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. पात्र पदवीधरांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र पदवीधर नवमतदारांनी https://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन मतदार नोंदणी करावी.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या पदवीधरांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र पदवीधरांनी उपलब्ध ऑनलाइन सुविधेचा वापर करून विहित मुदतीत मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

No comments: