04 October, 2026

ताकतोडा येथे डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेची पाहणी

ताकतोडा येथे डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेची पाहणी
ग्रामपंचायत व आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सूचना

हिंगोली, दि. ३ (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या ताकतोडा येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावातील आरोग्यविषयक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने आरोग्य विभागामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. पाणीसाठ्यांमध्ये अबेटिंग करण्यात आले, तसेच ज्या भांड्यांमध्ये अळ्या आढळल्या, ते पाणीसाठे रिकामे करून स्वच्छ व कोरडे करण्यात आले.

डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरिया यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना डॉ. पुरी यांनी ग्रामपंचायतीला दिल्या. गटारे नियमितपणे स्वच्छ करावीत, परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस संपूर्ण गावात एकाच वेळी ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे त्यांनी सांगितले. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून भांडी स्वच्छ व कोरडी ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमित गृहभेटी देऊन गावात सर्वेक्षण करावे. ताप किंवा इतर आजारांची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात यावेत, अशा सूचनाही डॉ. पुरी यांनी दिल्या.

या पाहणीप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले, जिल्हा माध्यम  अधिकारी मारोतराव पोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. तपासे, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी संजय पवार, आरोग्य सहायक रामदेव जोशी, संजय बोरबले, ग्रामपंचायत अधिकारी श्री. मेनकुंदळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. महादेव वानखेडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगावचे आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments: