03 January, 2023

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3 रुपये प्रती किलो तांदूळ, 02 रुपये प्रती किलो गहू व 01 रुपये प्रती किलो भरडधान्य वितरीत करण्यात येते. केंद्र शासनाने दि. 01 जानेवारी, 2023 पासून हे अन्नधान्य मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दि. 01 जानेवारी ते दि. 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात यावे, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

अन्नधान्य वितरणाबाबत शासनाचे नियतन आदेशातील इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरणानंतर लाभार्थ्यांना द्यावयाच्या पावतीबाबत संगणक कक्षाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

केंद्र व राज्य शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना व रास्तभाव दुकानदारांना कळविण्यात यावे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013  अंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याबाबत पात्र लाभार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील तलाठ्यांमार्फत प्रत्येक गावांमध्ये दंवडी देण्यात यावी. दवंडी  दिल्याबाबतचा पंचनामा अहवाल तलाठ्यामार्फत प्राप्त करुन घेऊन आपण आपल्या कार्यालयात जतन करुन ठेवावा व दवंडी दिल्याबाबतचा संकलित पंचनामा अहवाल त्वरीत सादर करावा, असे आदेशही जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.  

*****  

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी


 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायक रंजना कोठाळे यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

02 January, 2023

 

आशा डे निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशांचा सत्कार

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने आशांचा सन्मान


 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांच्या पुढाकारांने आशा डे निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील आशा कार्यकर्तींचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

आज येथील माजी खा.स्व.शिवाजीराव देशमुख सभागृहात हिंगोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने आशा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार,  जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सचिन भायेकर, सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, युवती सक्षमीकरण प्रशिक्षक रत्नाकर महाजन, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, पं.स.चे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, महिला बाल विकास अधिकारी राजेश मगर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळकृष्ण लांजेवार, ॲड. सुकेशनी ढवळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा समुह संघटक अजहर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, ॲड.सुकेशनी ढवळे, रत्नाकर महाजन यांनी महिला सक्षमीकरण व इतर विषयावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी उपस्थित आशा कार्यकर्तींना आशा डे निमित्त शुभेच्छा देऊन जिल्ह्याने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी राज्य पातळीवर केलेली आहे. यामुळे जिल्हयाचा नावलौकिक वाढत आहे. कोविड काळामध्ये आशा कार्यकर्तींसह आरोग्य विभागाचे महत्वपुर्ण योगदान आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते धनवंतरी पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशा कार्यकर्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार भगीरथी शिवाजी शिखरे, द्वितीय प्रणाली प्रल्हाद खिल्लारे, संघमित्रा जगनाथ खंदारे (प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सी) प्रथम पुरस्कार, संगिता मसाजी गायकवाड (प्रा.आ.केंद्र भांडेगाव प्रथम पुरस्कार), ज्योती विजय गरपाळ (प्रा.आरोग्य केंद्र फाळेगाव प्रथम पुरस्कार), रिना प्रल्हाद दाभाडे हिंगोली शहर प्रथम पुरस्कार, सुनिता सुभाष गायकवाड हिंगोली शहर प्रथम पुरस्कार, सविता रामप्रसाद जाधव (प्रा.आ.केंद्र सिरसम प्रथम पुरस्कार) या आशा कार्यकर्तींचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंदना सोवितकर यांनी केले. यावेळी आशा डे निमित्त गितांचे सादरीकरण राजु लोखंडे, कांबळे, खिल्लारे व त्यांच्या संचाने सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांना स्क्रिनद्वारे महिला सक्षमीकरणावर सांगोपांग मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, डॉ.दिपाली पतंगे, डॉ.अझहर देशमुख, डॉ.वैशाली मुळे, डॉ.श्रीमती गुठ्ठे, डॉ.जगताप, डॉ.समरिन, डॉ.टारफे, डॉ.कर्‍हाळे, डॉ.चाटसे,  प्रकाश बर्वे, रविंद्र भालेराव, शैलेश मुंदडा, हर्षवर्धन मनवर, शेख अन्वर, मारोती सोलापुरे, पंजाब गायकवाड, प्रदिप आंधळे, गणेश ठोके, शेख नसरीन, स्वाती जगताप, दिपीका देशमुख, अनिता घोगंडे, वंदना मोरे, जयश्री इंगोले, मंदा भिसे, कावेरी चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आशा कार्यकर्तीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

 

 

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी

प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

  • प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी

 

              हिंगोली (जिमाका), दि. 02 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 साठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी, 2023 ते 31 जानेवारी, 2023 पर्यंत पाठविता येणार आहेत. दि. 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी  पात्र आहेत.

            या स्पर्धेसाठी नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s new’  या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Rules Book and Application Form’ या शिर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध होतील.

            प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी, 2023 ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक  या स्पर्धेसाठी  प्रवेशिका दाखल करु शकतात.

            मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

            लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर, पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2023 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

            या योजनेअंतर्गत लेखक व प्रकाशकांना प्रवेशिका पाठविण्यास सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखेत सोय केली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांनी आपली प्रवेशिका व पुस्तके संबंधित तहसील कार्यालयात दि. 31 जानेवारी, 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.  

*******

 

पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्यात 11 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नॅशनल करिअर सर्व्हिस यांच्यामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली येथे दि. 30 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व तसेच पदवीधारक या पात्रतेचे 40 उमेदवार उपस्थित होते. या 40 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

या मेळाव्यास टाईम्स प्रा.औरंगाबाद, टाटा मनसा हिंगोली या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*****

 

किडनी वाचवा आणि डायलेसीस थांबवा अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : आजच्या तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धुम्रपान, मद्यपान, तंबाखू, गुटखा व मेडिकलमधून डॉक्टरच्या सल्याशिवाय पेनकिलर औषधी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे व खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे किडनी खराब व निकामी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे समाजामध्ये किडनी आजाराविषयी व डायलेसीसबाबत माहिती जनतेला व्हावी म्हणून येथील जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस विभागामार्फत किडनी वाचवा आणि डायलेसीस थांबवा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जनजागृतीसाठी किडनी विषयी प्राथमिक माहिती, रचना, कार्य व उपचार पध्दती, किडनी फेल होण्याची कारणे आणि डायलेसीस प्रतिबंध कसे करावे या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे.

या निबंध स्पर्धेसाठी 500 ते 1000 हजार शब्द मर्यादा आहे. प्रत्येक महाविद्यालय, शाळा यांनी ही स्पर्धा त्यांच्यास्तरावर आयोजित करुन सर्वोत्कृष्ट 05 निबंध (गुणानुक्रमे 1,2,3,4,5) निवडून डायलेसीस विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली  येथे दि. 15 जानेवारी, 2023 पर्यंत जमा करावेत. अधिक माहितीसाठी डायलेसीस विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.टी.एस.आऊलवार (मो. 8080316559) यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त निबंधामधून सवोत्कृष्ट 03 निबंधाची निवड करुन पारितोषिक देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी व कै. पंडित गुरुजी यांच्या स्मरणार्थ       श्री. गजानन शिंदे यांच्यातर्फे प्रथम बक्षीस 2101/- रुपये व शासकीय प्रमाणपत्र, द्वितीय बक्षीय 1101 रुपये व शासकीय प्रमाणपत्र, तृतीय बक्षीस 501 रुपये रोख व शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांनी कळविले आहे.

 *****

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विविध कक्षाची स्थापना

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2023 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचा कालावधी दि. 29 डिसेंबर, 2022 ते दि. 04 फेब्रुवारी, 2023 पर्यंत राहणार आहे. 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 चे  कामकाज सुरळीत व कालमर्यादेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ जितेंद्र पापळकर यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील नियम 159 नुसार विविध कक्षाची स्थापना करुन त्यावर कक्ष प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हास्तरीय समन्वयक व आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून कक्ष प्रमुख म्हणून अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती केली आहे. कायदा व सुव्यवस्था/जिल्हा सुरक्षा नियोजन करणे या समितीवर कक्ष प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची, मतदान कर्मचारी व्यवस्थापन व निवडणूक संचालन कक्षावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे, मतपत्रिका तपासणी कक्षासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, मतदान साहित्य स्वीकृती व वितरण कक्षासाठी विशेष भूसंपादन अधिकारी गोविंद रणवीरकर, स्वीप आणि मूलभूत सोयी सुविधा कक्षासाठी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रशिक्षण कक्षासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गणेश शिंदे, वाहन परवाना व विविध परवाने वितरण कक्ष व वाहतूक आराखड्यानुसार वाहन व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार (महसूल) विठ्ठल परळीकर, आयटी ॲप्लीकेशन सेल ॲन्ड पोल डे रिपोर्टींग सेलसाठी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अब्दूल बारी, नोडल अधिकारी म्हणून सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार, स्ट्राँग रुम तयार करणे व बॅलेट बॉक्सेस व्यवस्थापना कक्षासाठी तहसीलदार नवनाथ वगवाड, मतदार यांच्या कार्य प्रती तयार करण्यासाठी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीराम पाचपुते, अवैध दारु वाटपास प्रतिबंध कक्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले, उमेदवार खर्च आणि जप्त रकमा व मुद्देमाल तपासणी कक्षासाठी कोषागार अधिकारी झुंजारे, कोविड-19 आरोग्य कक्षासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, मा. निवडणूक निरीक्षक यांच्या व्यवस्थापन कक्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोत्रे, जिल्हा माध्यम नियंत्रण कक्षासाठी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, मतदार मदत कक्ष/तक्रार निवारण कक्षासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कक्षनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कक्ष अधिकाऱ्यांनी  जबाबदारीने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

             

****