03 January, 2023

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3 रुपये प्रती किलो तांदूळ, 02 रुपये प्रती किलो गहू व 01 रुपये प्रती किलो भरडधान्य वितरीत करण्यात येते. केंद्र शासनाने दि. 01 जानेवारी, 2023 पासून हे अन्नधान्य मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दि. 01 जानेवारी ते दि. 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात यावे, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

अन्नधान्य वितरणाबाबत शासनाचे नियतन आदेशातील इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरणानंतर लाभार्थ्यांना द्यावयाच्या पावतीबाबत संगणक कक्षाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

केंद्र व राज्य शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना व रास्तभाव दुकानदारांना कळविण्यात यावे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013  अंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याबाबत पात्र लाभार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील तलाठ्यांमार्फत प्रत्येक गावांमध्ये दंवडी देण्यात यावी. दवंडी  दिल्याबाबतचा पंचनामा अहवाल तलाठ्यामार्फत प्राप्त करुन घेऊन आपण आपल्या कार्यालयात जतन करुन ठेवावा व दवंडी दिल्याबाबतचा संकलित पंचनामा अहवाल त्वरीत सादर करावा, असे आदेशही जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.  

*****  

No comments: