09 January, 2023

 

बाल हक्क संरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जनजागृती

 


हिंगोली (जिमाका), दि. 09 :  जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या मार्गदर्शनानुसार शालेय विद्यार्थ्याच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण आणि बाळापूर पोलिस ठाणे यांच्या समन्वयाने विविध उपक्रमांची जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये हुंडाबळी, बाल विवाह, स्त्रीभृण हत्या, शालेय महाविद्यालयीन मुलीची छेडछाड अशा सामाजिक कुप्रथा विरोधात राजर्षी शाहू विद्यालय आणि तोंडापूर येथील कृषी महाविद्यालय येथील विद्याथ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे पाउल उचलले आहे.

समाजात बाल हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजातील कुप्रथा मोडीत काढण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, बस स्थानक आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, भवानी मंदिर इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथ नाट्याचे सादरीकरण करुन उपस्थितांसमोर समाजातील भयावह वास्तविकतेचे थरारक चित्र उभे केले व अशा वाईट प्रथा या समाजाच्या विकासासाठी परिणामी देशाच्या विकासासाठी कशा घातक ठरतात यांची जाणीव करुन दिली.

बाल विवाह झाल्यामुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक विकासावर तसेच बाल विवाहातून जन्माला येणारे बाळ मतिमंद, कुपोषित, अंपग जन्माला येवु शकते, बाल माता मृत्यु होऊ शकतो अशा दुष्परिणामाची जाणीव करुन दिली. तसेच विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष असणे गरजेचे आहे व या कायद्याअंतर्गत गुन्हेगाराना 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 01 लाख रुपये दंड असे शिक्षेचे प्रावधान असल्याचे सांगून बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस छेडछाड सारख्या समस्येला सामोरे जावे लागत असते. अशा वेळेस त्रास सहन न करता पोलीस हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक 112 डायल करुन तात्काळ पोलिस यंत्रणेची मदत घेवून अशा रोड रोमियोंना चांगलाच चोप दिला जातो. याविषयी आणि हुंड्याच्या मागणीसाठी कशाप्रकारे महिलांचे शारीरिक, मानसिक शोषण केले जाते, कित्येक वेळा काही महिलांना आपला जीवही गमवावा लागतो. याअनुषंगाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 याविषयी पथ नाट्याच्या माध्यमातुन जन जागृती केली.

राजर्षी शाहू विद्यालय, आखाडा बाळापुर व जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, आखाडा बाळापुर येथील विद्यार्थ्यांना रस्त्याने चालतांना डाव्या बाजुने चालावे, वाहतुकी विषयी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे सरंक्षण अधिनियम 2015, बाल विवाह प्रतीबंध कायदा 2006 याविषयी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांकडुन बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेची शपथ घेतली.

बालकांना पोलीस ठाणे आखाडा बाळापूर येथे प्रत्यक्ष नेऊन पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 डायल केल्यानंतर कशाप्रकारे आपण दिलेली माहिती संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पर्यंत पोहचते व आपल्याला तात्काळ मदत केली जाते याविषयी, सेल्फ डिफेन्स, वायरलेस सिस्टीम विषयी व शस्त्रांविषयी माहिती दिली.

या कार्याक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, शिवाजी बोंडले व इतर पोलीस कर्मचारी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी जरिबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी अँड.अनुराधा पंडित, राजर्षी शाहू विद्यालय मुख्याध्यापक एन. डी. करंडे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. एच. सुरवसे यांनी पुढाकार घेतला.

****

No comments: