रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचा समारोप
हिंगोली
(जिमाका),
दि. 18 : जिल्ह्यात दि. 11 जानेवारी ते
17 जानेवारी, 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान-2023 राबविण्यात आला आहे. या अभियानामध्ये
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये
नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, वाहनाना रेडियम लावणे, रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करणे,
विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करणे, तसेच
प्रभात फेरी काढणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले होते.
या अभियानाचा निरोप समारंभ
कार्यक्रमानिमित्त येथील शिवलीला मंगल कार्यालयात दि. 17 जानेवारी, 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या शालेय शिक्षणामध्ये रस्ता जनजागृती
करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते
करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र
सुर्यवंशी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक विभागाचे
शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य
गणेश शिंदे, हिरो शोरुमचे एमडी नरेश देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता
जोशी, मोटार वाहन निरीक्षक जगदीश माने, नलिनी काळपांडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्ह्यातील उपस्थित सर्व शाळेतील मुख्याध्यापक,
शिक्षकांना रस्ता सुरक्षेची शपथ देऊन दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा
व चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर करावा. तसेच वाहनाचे सर्व विधीग्राह्य
कागदपत्रे सोबत ठेवावीत. आपली सुरक्षितता हे आपल्या कुटुंबाची सुरक्षितता असून
वाहन चालवितांना वेग मर्यादेचे पालन सर्वांनी करावे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर
टाळावा, असे उपस्थितांना आवाहन केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट परिधान
करणे, सिटबेल्टचा वापर करणे, अति वेगाने वाहन न चालविणे या तीन गोष्टींची काळजी
प्रत्येकाने घेतल्यास बऱ्याच प्रमाणात अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत
होईल, असे सांगितले. तसेच सर्वांनी अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत
मिळण्यासाठी प्रत्येकांनी आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणे करुन
अपघातात जखमी व्यक्तीचे प्राण वाचू शकेल असे आवाहन करुन सर्व मुख्याध्यापक व
शिक्षकांनी किमान एक दिवस शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा जनजागृतीबाबत
मार्गदर्शन करावे, अशा सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उप
प्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांनी दि. 11 जानेवारी ते 17
जानेवारी, 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची
सविस्तर माहिती देऊन मागील वर्षात जिल्ह्यात घडलेल्या अपघाताचे विश्लेषण करुन कोणत्या
कारणामुळे जास्त अपघात घडले आहे, याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच त्यांनी दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा
वापर करणे, चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्टचा प्रामुख्याने वापर करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकांत बोयणे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद
गोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश माने, पवन बानबाकोडे, निलेश पवार,
स्वप्नील ससाणे, गोपाळ हराळे, अतुल बानापूरे, मनोजकुमार कांबळे, नरेश देशमुख तसेच उप
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे व शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
******
No comments:
Post a Comment