हातात हात मिळवू या,
कुष्ठरोगाला पळवू या…!
राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्श जनजागृती
अभियान साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती
अभियान अंतर्गत दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत विविध जनजागृती
कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षीचे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गतचे
‘‘कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात (Lets Fight Leprosy
and make Leprosy a History)’’ हे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. स्पर्श कुष्ठरोग
जनजागृती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती अभियानाची
माहिती देणारा हा लेख …
कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम
लेप्री या जंतूपासून होणारा सौम्य सांसर्गिक आजार आहे. औषधोपचार न घेतलेल्या सांसर्गिक
रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला कुष्ठरोगाचा संसर्ग होऊ शकतो. समाजात 95 टक्के
लोकांना हा रोग होत नाही. उर्वरित 05 टक्के लोकांना त्यांच्या नैसर्गिक रोग प्रतिकार
शक्तीनुसार हा रोग होतो.
कुष्ठरोगाची निदानात्मक लक्षणे : शरीरावर एक किंवा
अनेक फिक्कट तांबूस रंगाचे बधीर चट्टे, परावर्तीय मज्जा जाड व दुखऱ्या होणे. तसेच संबंधित
भागावर बधीरता आढळणे, हात, पाय व चेहरा यांच्या स्नायूमध्ये अशक्तपणा जाणवणे, जंतू
परीक्षणात कुष्ठजंतू आढळणे.
जगात कुष्ठरोगाची
व्याप्ती कमी जास्त प्रमाणात आढळते. साधारणत: कुष्ठरोगाचे रुग्ण जगातील सर्व देशामध्ये
आढळतात. तथापि, विविध देशामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे वेगवेगळ्या पध्दतीने दिसून येतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सन 2021 मध्ये जगात 1 लाख 40 हजार 594 कुष्ठरोगाचे
रुग्ण आहेत. यामध्ये एकट्या भारतात 75 हजार 394 इतके कुष्ठरोगाचे रुग्ण आहेत. जागतिक
आकडेवारीनुसार 54 टक्के रुग्ण हे भारतात आहेत.
भारतात सन 2030 पर्यंत शून्य कुष्ठरोग रुग्ण, कुष्ठरोगाच्या संसर्गाचे शून्य प्रसारण, कुष्ठरोगामुळे शून्य अपंगत्व, शून्य कलंक आणि भेदभाव हे व्हिजन राबविण्यात येणार आहे.
राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सन 1955-56 साली पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वावर एकविध पध्दतीने राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 1981-82 पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पध्दत राज्यात टप्याटप्याने लागू करण्यात येऊन 1995-96 सालापर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये उपचार चालू करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात
सन 1981-82 साली दर दहा हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 71.1 एवढे होते.
सन 1997-98 साली दर दहा हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 6.7 एवढे होते.
सन 2005-2006 साली दर दहा हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 0.39 एवढे होते.
यावर्षी जिल्ह्याचे
कुष्ठरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. सन 2021-22 या वर्षी दर हजार लोकसंख्येमध्ये
कुष्ठरुग्णांचे प्रमाण 0.08 एवढे आहे. तर डिसेंबर, 2022 अखेर दर हजार लोकसंख्येमध्ये
कुष्ठरुग्णांचे प्रमाण 1.35 एवढे आहे.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती
अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जानेवारी, 2023 रोजीच्या ग्रामसभेत जिल्हाधिकारी
यांच्या घोषणापत्राचे ग्रामसेवत वाचन, ग्रामप्रमुख/सरपंचाचे भाषण, कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा
घेणे, गावातील प्रौढ व्यक्तीस महात्मा गांधीचा (बापू) पेहराव करुन त्यांच्यामार्फत
अथवा सपना या शाळकरी मुलीमार्फत कुष्ठरोग व क्षयरोग विषयक माहिती व संदेश देण्यात आले.
तसेच कुष्ठरोगाविषयी प्रश्न उत्तरे कार्यक्रम राबविण्यात आले आहे.
तसेच दि. 30 जानेवारी
ते 13 फेब्रुवारी, 2023 या पंधरवाड्यात शाळांमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या
प्रतिज्ञाचे वाचन, शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबत संदेश लिहिणे, शाळेमध्ये नुक्कड-नाटक,
प्रश्न-मंजुषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणे, कविता, रांगोळी स्पर्धा, कटपुतळी,
चित्रकला स्पर्धा, पथनाट्य इत्यादी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
स्थानिक महिला मंडळे,
बचत गट, तरुण मंडळे यांच्या सभा घेणे, खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा, बाजाराच्या
ठिकाणी प्रदर्शन, आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे. शहरी भागात रोटरी क्लब, लायन्स
क्लब इत्यादी संस्थेच्या सहाय्याने कुष्ठरोगाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती
अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली
दि. 23 जानेवारी, 2023 रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक घेऊन आरोग्य विभाग, शिक्षण
विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा आशा समन्वयक
अशा विविध विभागांना जबाबदारी सोपविली आहे. विविध विभागाने आपापली जबाबदारी पार पाडून
ही मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
संजय दैने यांनी बैठकीत दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. सचिन भायेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली अंगणवाडी कार्यकर्ती, आशांच्या मदतीने जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य
केंद्र, 132 आरोग्य उपकेंद्रात, 563 ग्रामपंचायती व 711 गावामध्ये स्पर्श कुष्ठरोग
जनजागृती अभियान राबवून कुष्ठरुग्णाचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर उपचार
करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करुन आपला हिंगोली जिल्हा कुष्ठरोग मुक्त करुया
आणि हातात हात मिळवून कुष्ठरोगाल पळवू या …. !
-- चंद्रकांत स. कारभारी
माहिती
सहायक
जिल्हा
माहिती कार्यालय, हिंगोली
*****
No comments:
Post a Comment