19 January, 2023

 

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत 2020-21 आणि 2021-22 या वर्षासाठी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी 24 जानेवारी, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 23 जानेवारी, 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे उपलब्ध असून याबाबतचे प्रस्ताव दि. 24 जानेवारी, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

या पुरस्कारासाठी अर्जदार महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्यास असावा. त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. राज्यात सतत 10 वर्ष क्रीडा मार्गदर्शकांचे कार्य केलेले असावे. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी प्रत्येकी एक महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूने अर्ज करणाऱ्या पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 05 वर्षापैकी 02 वर्ष त्या जिल्ह्याच्या मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे, राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा विचार होणार आहे.

******

No comments: