23 January, 2023

 कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श जनजागृती कुष्ठ रोग अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेंची व्यापक स्वरुपात जनजागृती करुन  कुष्ठरोगाचे निर्मूलन करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित बैठकीत दिले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात "स्पर्श" कृष्ठरोग जनजागृती अभियान जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर  बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सचिन भायेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लांजेवार, डॉ.सुनील देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षणधिकारी संदीपकुमार सोनटक्के आदी उपस्थित होते.

या मोहमेअंतर्गत 2030 पर्यंत कुष्ठरोग आजाराचे निर्मूलन करण्यासाठी नियोजन करण्यात आले. ही मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे. मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त रुग्ण शोधणे, कुष्ठरोगाची जनजागृती करणे असा आहे. यासाठी प्रत्येक शाळेतून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.

यावेळी सर्व उपस्थितांनी स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतली. तसेच जिल्ह्यात त्वचारोग निदान शिबिरे घेऊन कुष्ठरोग शोध मोहिमेस सहकार्य केल्याबाबत त्वचारोग तज्ञ डॉ. शिवाजी गिते व नर्सींग महाविद्यालयाचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. 

**** 

No comments: