30 January, 2023

 

फुटबॉल क्लब बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 :  राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबदध्द प्रशिक्षण, पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दा नमूद असून या अंतर्गत राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. (फुटबॉल क्लब) बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करुन त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे , तेथील निवास, प्रशिक्षण इत्यादी बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफसी बायर्न महाराष्ट्र कप टीव्ही-9 मराठी हे मिडिया पार्टनर आहेत.

            राज्यातून 20 खेळाडू जर्मनी येथे सदर प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. या फुटबॉल स्पर्धा 14 वर्षाखालील मुलांच्या गटात घेण्यात येणार आहे.

            यासाठी 14 वर्षाखालील वयोगट असलेली मुले दि. 01 जानेवारी, 2009 नंतर जन्मलेला असावा. एकूण खेळाडूंची संख्या 20 मुले असणार आहे. तसेच 02 मार्गदर्शक व व्यवस्थापक असे एकूण 22 जण असणार आहेत.

            जिल्हास्तर एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप (14 वर्षाखालील मुले) स्पर्धेसाठी शाळांचे प्रवेश अर्ज दि. 01 ते 06 फेब्रुवारी, 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावे. स्पर्धेची तारीख व स्थळ लवकरच कळविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, फुटबॉल क्लब, फुटबॉल संघटना यांनी याची नोंद घेऊन जास्तीत जास्त 14 वर्षाखालील मुलांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

No comments: