04 December, 2017

क्षयरुग्ण शोधमोहीम दिनांक 4 ते 18 डिसेंबर या कालावधीत राबवणार



वृत्त क्र. 564                                              दिनांक : 04 डिसेंबर 2017
क्षयरुग्ण शोधमोहीम दिनांक 4 ते 18 डिसेंबर या कालावधीत राबवणार
हिंगोली,दि.04: सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यकमांतर्गत  क्षयरोगाची लक्षणे  असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व त्यावरील औषधोपचार शासकीय संस्थांमध्ये मोफत केले जातात. बरेच रुग्ण लक्षणे असूनही क्षयरोगाबाबतच्या अज्ञानामुळे  तपासणी करुन घेत नाहीत. त्यामुळे  क्षयरोगाचा प्रसार झपाट्याने  होत आहे. समाजामध्ये  क्षयरोगाबाबत  जनजागृती  करणे तसेच निदान न झालेल्या क्षयरुग्णांचे निदान होण्याकरीता सक्रीय क्षयरुग्ण  शोध मोहिमेचा तिसरा टप्पा राज्यात 13 जिल्ह्यात  व 11 महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 4 ते 18 डिसेंबर  या कालावधीत राबविण्यात  येत आहे . हिंगोली जिल्ह्यातही ही मोहीम  राबविण्यात येणार आहे .
झोपडपट्टी , ऊसतोड मजूर, विटभट्टी मजूर, रस्ते व बांधकाम  मजूर, निराधार, निराश्रीत, अनाथाश्रमे, वृध्दाश्रमे, स्थलांतरीत, नॅको ने निवडलेली जोखीमग्रस्त गावे आदी  अतिजोखमीच्या भागामध्ये  सर्व्हे होणार आहे. क्षयरोग  नियंत्रणासाठी जिल्ह्यात 1 लाख 13 हजार 345 जोखीमग्रस्त लोकसंख्येचा सर्व्हे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत  घरोघरी जाऊन केला जाणार आहे.  क्षयरोग शोधमोहिमे दरम्यान आढळून आलेल्या संशयित क्षयरुग्णांची तपासणी  आवश्यकता असल्यास सीबीनॅट मशीनद्वारे  केली जाणार आहे .
संशयित रुग्णांचा थुंकी नमुना तपासणी व क्ष किरण तपासणी मोफत केली जाणार आहे. तरी  ज्यांना दोन आठवड्यांपासून खोकला, ताप, वजन कमी होणे , थुंकीवाटे रक्त पडणे इत्यादी लक्षणे  आढळून येणाऱ्या  व्यक्तींनी  या मोहीमेमध्ये मोफत थुंकी तपासणी  जवळच्या  सरकारी दवाखान्यात करुन घ्यावी . क्षयरोगाचे निदान झालेल्‍या  रुग्णावर मोफत  औषधोपचार केला जाणार आहे . या मोहिमेचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे .
00000

No comments: