18 December, 2017

अल्पसंख्याकाच्या कायदेशीर हक्काबाबत जाणीवा निर्माण करा



वृत्त क्र.578                                               दिनांक : 18 डिसेंबर 2017
अल्पसंख्याकाच्या कायदेशीर हक्काबाबत जाणीवा निर्माण करा
                                                निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण

        हिंगोली, दि.018: अल्पसंख्याकाच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीवा निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे काम करुन अल्पसंख्याक समुदायाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घ्यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांनी केले.
            अल्पसंख्याक हक्क्‍ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पठाण बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. चवणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री. पवार, नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, मौलाना आझाद विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. राऊत, श्री. सय्यद  यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. पठाण म्हणाले की, राज्यघटनेने अल्पसंख्याकांना राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहे. अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती नाही. या योजना आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. शासकीय योजना, ध्येयधोरण यामध्ये समन्वय साधून अल्पसंख्याक समाजातील सदस्यांनी आपल्या हक्कांचा वापर करून घ्यावा व कर्तव्याची जाणिव ठेवावी. अल्पसंख्याकांसाठीच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे, सर्वसमावेशक विकास, सर्वांसाठी न्याय व समता प्रस्थापित करणे तसेच अल्पसंख्याकांसाठीच्या 15 कलमी नवीन कार्यक्रमाची अंमलबजावणी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात येते. www.mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती उपलब्ध असल्याची  अल्पसंख्याक हक्क दिनाच्या औचित्याची माहिती दिली.
            यावेळी शिक्षणाधिकारी श्री. पवार, माजी नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, मौलाना आझाद विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. राऊत, श्री. सय्यद, श्री. नजीर अहेमद, श्री. जैन यांची समयोचित भाषणे झाली. त्यांनी अल्पसंख्याक समितीचे पुनर्गठन, 15 कलमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शैक्षणिक संस्थांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा, मुलींसाठी वसतिगृहे, स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांची व अल्पसंख्याक विकास निधीची प्रभावी अंमलबजावणी, जात पडताळणी, जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याकांसाठी विशेष कक्ष, शिष्यवृत्ती, कर्ज, स्मशानभूमिला कुंपण, दारिद्र्यरेषेखालील लोकांना घरकुले याबाबत मते मांडली.
            प्रास्ताविकात नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहिरनामा जाहिर केला. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, पंरपरा आदीचे संर्वधन करता यावे. यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या असून प्रतीवर्षी दि.18 डिसेंबर हा दिवस `अल्पसंख्यांक हक्क दिवस`महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येत असल्याचे सांगुन त्यांनी जिल्ह्यात अल्पसंख्याक नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.
            यावेळी मान्यवरांच्या हस्ते अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध, वकृत्व आणि भित्तीपत्रक स्पर्धेंत यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थींनीना बक्षीस वितरण करण्यात आले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. राऊत यांनी केले तर श्री. आव्हाड यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****

No comments: