17 May, 2018

जलयुक्तच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकरीता दोषी अभियंत्यावर कार्यवाहीचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश






जलयुक्तच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकरीता दोषी
अभियंत्यावर कार्यवाहीचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

        हिंगोली, दि.17: जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत.
            हिंगोली तालूक्यातील सावा आणि चोरजवळा या गावात जलयुक्त अंतर्गत जलसंधारण विभागातंर्गत तीन आणि जिल्हा परिषदेच्या एक अशा एकुण चार सिमेंट नाला बांध कामांच्या गुणवत्तेची आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रत्यक्ष केली. जलसंधारण विभाग आणि आणि जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांध कामांची सार्वजनीक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे यांनी रिबाउन्ड हॅमरद्वारे तपासणी केली असता, सदर कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच सदन नाला बांधमध्ये पिचिंग आणि खोलीकरणांचे काम व्यवस्थित झालेले नाही. सदर कामे करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत ठाकुन त्याचे देयक अदा करु नये, किंवा देयक अदा केले असल्यास वसुल करुन घ्यावे. शासनाच्या महत्वकांक्षी असलेल्या योजनांची कामे चांगल्या दर्जाची करुन न घेता शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याने संबंधीत अभियंत्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी यावेळी दिले. तसेच चोरजवळा येथील शेतकऱ्यांने नाला बांधच्या मध्ये बोअरवेल घेतल्याने सदर बोअरवेल जप्तीचे आदेशही जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी यावेळी दिले.
            यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुबडे, जिल्हा परिषद लघुसिचंन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. येडगे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे, अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, सहाय्यक नियोजन अधिकारी द.रा. आव्हाड,  जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. खिराडे आदींची उपस्थिती होती.

****

No comments: