30 November, 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 जिल्ह्यात 39 मतदान केंद्रावर होणार मतदान

 


·        16 हजार 764 मतदार, 156 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

हिंगोली,दि.30:- जिल्ह्यात 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 39 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रावर 13 हजार 631 पुरुष मतदार आणि 03 हजार 133 महिला मतदार असे एकूण 16 हजार 764 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान प्रक्रीयेसाठी 39 मतदान केंद्राध्यक्ष आणि 117 मतदान अधिकारी असे एकूण 156 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्‍ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी  5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक- 2020 साठी त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन  1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मतदान करावे, असे आवाहन  जिल्‍हाधिकारी हिंगोली तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 5- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ यांनी  केले आहे.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार

 


हिंगोली,दि.30:-  आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि.10.11.2020 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील, असे जिल्हाधिकारी हिंगोली तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद‍ विभाग पदवधीर मतदारसंघ यांनी कळविले आहे.

****

27 November, 2020

05औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुक-2020 पदवीधर मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देश सूचना जारी

 


         हिंगोली, दि.27:-05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार दि.01 डिसेंबर-2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतदान होणार असुन भारत निवडणुक आयोगाने मत नोंदविण्यासाठी मतदान आवश्यक सुचना जारी केल्या आहेत.

मतदान करण्याची पद्धत :

        मतदान करण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरावा. याशिवाय तुमची मतपत्रिका अवैध ठरेल असे इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा इतर चिन्हांकित करावयाची साधने वापरू नयेत."पसंतीक्रम" (Order of Preference) या स्तंभामध्ये, ज्यास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोर 1' हा अंक नमूद करुन त्यास मतदान करता येईल. '' हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल.जरी निवडून यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी "1" हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल. निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम" (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शविता येईल. कोणत्याही उमेद्वारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद केला जाईल याची खात्री करावी. आणि एकसमान अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमुद केले नसल्याची सुद्धा खात्री करावी.पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3, इत्यादी आणि तो एक, दोन,तीन, इत्यादी असा शब्दात दर्शविलेला नसावा.

     “पसंतीक्रम" (Order of Preference) स्तंभामधील अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3, इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I,II,III, इत्यादी किंवा देवनागरी स्वरुपातील १, २, ३ किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविला जाईल. मतपत्रिकेवर तुमचे नाव किंवा कोणतेही शब्द, आणि तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे नमूद करू नयेत. तसेच अंगठ्याचा ठसा सुध्दा उमटवू नये, यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर केवळ ü किंवा X' असे नमूद करणे पुरेसे नाही, अशी मतपत्रिका बाद ठरू शकते. आपला पसंतीक्रम केवळ अंकात 1,2,3, इत्यादी वर विषद केल्याप्रमाणे नमूद करावा. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर '1' हा अंक तुम्ही दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे आहेत. दुसरा आणि त्यापुढील पसंतीक्रम दर्शविणे किंया न दर्शविणे ही बाब तुमच्यासाठी ऐच्छिक आहे.

या कारणामुळे आपले मत अवैध ठरु शकतात:

      अंक '1' नमूद नसल्यास. एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर '1' हा अंक नमूद केलेला असल्यास. '1' हा अंक अशा रितीने नमूद केला आहे का, तो कोणत्या उमेदवारा करिता दिला याबाबत संदिग्धता आहे. '1' हा अंक आणि इतर अंक जसे की, 2, 3 इत्यादी एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद केलेले असल्यास. पसंतीक्रम अंका ऐवजी शब्दात नमूद केल्यास. मतदाराची ओळख पटेल असे कोणतेही चिन्ह किंवा लिखान मतपत्रिकेवर नमूद असल्यास. निवडणूक निर्णय अधिका-याने पसंतीक्रम नमूद करण्यासाठी दिलेल्या जांभळ्या स्केच पेन,शिवाय इतर वस्तुने कोणताही अंक नमूद केलेला असल्यास वरील कारणांनी अवैध ठरविण्यात येईल.

       या पद्धतीने भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदारांनी कसे मतदान करावे व आपले मतदान अवैध ठरणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

                                                         *****

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 16 रुग्ण ; तर 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 66 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 27 : जिल्ह्यात 16 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 08 व्यक्ती, वसमत परिसरात 2 व्यक्ती व सेनगांव  परिसरात 04 व्यक्ती असे एकूण 16 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 15 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, तर 02 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे आज रोजी एकूण 10 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 322 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 204 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 66 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

26 November, 2020

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद

 


 

हिंगोली,दि.26: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा उद्भवण्याची शक्यता असल्याने घ्यावयाची खबरदारी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्याकरीता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

            जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी नागरिकांशी शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर, 2020 रोजी सायंकाळी 04.30 वाजता संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरीता जिल्हा प्रशासन काय करत आहे ?  येणाऱ्या कालावधीत नागरिकांनी कोणत्या निर्देशाचे पालन करावयाचे आहे. आपात्कालीन कालावधीत नागरिकांना कोणत्या माध्यमातून मदत मिळेल, याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ’ या फेसबुक पेजच्या कंमेन्ट बॉक्सच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना व प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विचारता येणार असून जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देखील देणार आहेत.

नागरिकांनी आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठविताना आपले ठिकाण व तालुका आवर्जून नमूद करावा. येणाऱ्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हिंगोलीकरांनी या फेसबुक लाईव्ह संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी  होऊन नवीन नियम व उपाययोजनाबाबत माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

****

 

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण ; तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

 


·  53 रुग्णांवर उपचार सुरु, तर एकाचा मृत्यू

 

         हिंगोली,दि. 26 : जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड ॲन्टिजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 08 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती आणि कळमनुरी परिसर 09 व्यक्ती असे एकूण 22 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज 01 कोविड-19 रुग्ण बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे. तर 01 कोव्हिड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभिर असल्यामूळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकून 09 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 306 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 201 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 53 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

 


            हिंगोली, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमत्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

            यावेळी   नायब तहसिलदार राजेंद्र गळगे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

19 November, 2020

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतंर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

      हिंगोली,दि.19 : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सन 2020-2021 ते सन 2024-2025 या पाच आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मुख्य उद्देश हा मत्स्योत्पादनात वाढ, निर्यात मुल्यात वाढ करणे, मासेमारी पक्षात नुकसानीमुळे होणारी तुट कमी करणे, मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे व त्यामुळे मत्स्यसंवर्धन आणि मच्छिमारांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे हा आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत विविध घटकांची अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यामध्ये करण्यात येत असून सदर योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांकडून योजना निहाय अर्ज मागविण्यात येत आहेत.

यामध्ये नविन मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना, नविन मत्स्यबीज संगोपन तळी खोदकाम, जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचयन, पारसबागेतील लघु रास प्रकल्प, पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन, तीन चाकी रिक्षासह शितपेटी, मत्स्य व्यवसाय विस्तार आणि मदतसेवा या योजनेचा समावेश असून या योजने अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गास 40 टक्के तर अनुसुचित जमाती किंवा अनुसुचित जाती किंवा महिला प्रवर्गास 60 टक्के अनुदान आहे. सदर योजनांचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यास मत्स्यव्यवसायाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

     सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांनी अर्ज किंवा प्रकल्प अहवाल नमुना जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता.) हिंगोली यांच्या कार्यालयातून प्राप्त करावा किंवा pmmsy.hingoli@gmail.com या ई-मेल वर नमुना अर्ज प्राप्त करण्याची मागणी करावी. लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करतांना प्रधानमंत्री योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमधील योजनेचा अनुक्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती http:nfdb.gov.in/guidelines या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी अर्जासोबत प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशिल, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला जोडणे आवश्यक आहे.लाभार्थ्यांनी आपला परिपूर्ण अर्ज व प्रकल्प अहवाल व सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीसह pmmsy.hingoli@gmail.com या ई-मेल वर पाठवावा.

         दर महिन्याला प्राप्त अर्जाची तपासणी करुन यादी लगतच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत (ड्रा) पध्दतीद्वारे अंतिम करण्यात येईल. मान्य संख्येतील लाभार्थी संख्येच्या दुप्पट संख्येत प्रतिक्षा यादी होईपर्यंत लाभार्थी अर्ज स्विकारण्यात येतील. निधी उपलब्धता व जिल्ह्याची गरज बघून प्रतिज्ञा यादीतील पात्र लाभार्थ्यांना याच वर्षी किंवा सन 2021-22 च्या जिल्हा आराखड्यात समाविष्ट करुन घेण्याचा  प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. श्री. पिंपळगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली आहे.

****

 

जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मुलनासाठी शोध कार्यक्रम राबविणार

 


                हिंगोली,दि. 19: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत  सक्रिय कुष्ठ रुग्ण शोध व नियमित संनियत्रण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने  पुर्वनियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा समन्वय समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  शिवाजी पवार, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. राहुल गिते यांची उपस्थिती होती.

            जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन अंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 380 गावातील 6 लाख 72 हजार 355 नागरिकांची आशा वर्कर आणि आरोग्य सेवक-स्वयंसेवक मार्फत तपासणी करुन नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर पूर्ण कालावधीपर्यंत मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. समाजातील  कुष्ठरोगाबाबत गैरसमज कमी करता यावे, यासाठी जिल्ह्यात 1 डिसेंबर, 2020 ते 28 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियत्रण सर्वक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे. नवीन विना विकृती संशयीत कुष्ठरोगी तसेच नवीन विकृत व असंसर्गीत कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे.

            यावेळी सदर कुष्ठरोग कार्यक्रमात मदत करणारे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शिवाजी गिते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उप विभागीय आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थाचे प्रतिनीधी आदींची उपस्थिती होती.

****

जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी दूरीकरण कार्यक्रम नियोजन करुन राबवावा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 



            हिंगोली,दि. 19: सन 2025 पर्यंत संपुर्ण देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले असुन, त्याअनुषंगाने जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांचा शोध घेवून त्याच्यांवर योग्य ते उपचार करुन जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातुन क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे नियोजन करुन राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय टि.बी. फोरम बैठकीत जिल्हाधिकारी श्री. जयवंशी हे बोलत होते. यावेळी जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा शल्य चिकीत्सक अधिकारी डॉ. राजेंद्र सुर्यवंशी,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  शिवाजी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांची उपस्थिती होती.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यातील क्षयरोगाने ग्रस्त असलेले रुग्ण शोधुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ‘राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम राबवितांना कोरानाचे रुग्ण शोधुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ज्या सुत्राचा (फॉर्म्युला) वापरला होता. तोच क्षयरोग रुग्ण शोधण्याकरीता वापरावा. जेणेकरुन क्षय रोगी सापडतील आणि सामुदायिक संसर्ग रोखण्यास यश मिळेल. तसेच सापडलेल्या रुग्णांना औषधोपचारांचा कोर्स पूर्ण करण्यास प्रवृत्त करावे. तसेच क्षयरोग रुग्णांना प्रतीमहा रु. 500/- पोषण आहार भत्याची रक्कम थेट बँकेत जमा करण्याचे निर्देश संबंधीत बँक अधिकारी यांना यावेळी दिले. क्षयरोग मुक्त झालेले रुग्णांनी जास्तीत-जास्त क्षयरोग रुग्णांना औषध उपचार करुन हा रोग पूर्णपणे बरा होतो याकरीता प्रबोधन करावे. क्षयरोग रुग्णांना व त्यांच्या कुटूंबीयाची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करुन त्याचे योग्य पूनवर्सन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी संबंधितांना दिले.

            यावेळी योग्य औषधोपचार घेवून क्षयरोगावर यशस्वी मात करणाऱ्या नागरिकांचा तसेच सदर क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात मदत करणाऱ्या खाजगी डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उप विभागीय आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थाचे प्रतिनीधी आदींची उपस्थिती होती.

****

12 November, 2020

खाजगी प्रवासी बसधारकाने सुधारीत मानक कार्यपध्दतीचे पालन करावे

 

 

हिंगोली, दि. 12 : परिवहन आयुक्त यांच्या मार्फत खाजगी प्रवासी बसेस यांनी वाहतूक करतांना अंमलात आणावयाची सुधारीत मानक कार्यपध्दतीचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पर्यटक, प्रवासी वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेसकरिता खालीलप्रमाणे सुधारीत मानक कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करावे आणि खाजगी प्रवासी बसधारकाने अटीचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी.

यामध्ये खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 20 (1) (X‍) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष स्वच्छ ठेवावे व उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या आहेत त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. कोव्हिड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे (उदा. ताप, सर्दी, खोकला) दिसत असल्यास त्यास प्रवासास प्रतिबंध करण्यात यावा. सर्व प्रकारच्या खाजगी कंत्राटी बस वाहनांमधून शंभर टक्के क्षमतेने पर्यटक, प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. चालकाने प्रवासा दरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधनग्रहाचा वापर करण्याकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. तसेच बसमध्ये चढतांना, उतरतांना व खानापानाकरीता व प्रसाधनग्रहाच्या वापराकरीता प्रवासादरम्यान शारिरीक अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सूचना देण्यात याव्यात. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये व कचराकुंडीचा वापर करावा. प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकांची असेल.  

वरील सूचनांचे पालन न केल्यास परनावाधारकांविरुध्द मोटार वाहन अधिनियम 1988 केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टीकोनातून वरील कार्यपध्दतीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी  प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

***** 


जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 11 रुग्ण ; तर 15 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

·  81 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

        हिंगोली,दि. 12 : जिल्ह्यात 11 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती आणि सेनगांव परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे कळमनुरी परिसरात 05 व्यक्ती  व सेनगांव  परिसरात 04 व्यक्ती असे एकूण 11 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 15 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 12 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे. सद्य:स्थितीत त्यांची  प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 236 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 104 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 81 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा

 

 

हिंगोली, दिनांक 12 :- औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून पदवीधर कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****

 

10 November, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 11 रुग्ण ; तर 06 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 90 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 10 : जिल्ह्यात 11 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 08 व्यक्ती  व वसमत  परिसरात 01 व्यक्ती असे एकूण 11 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 06 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 11 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 01 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 223 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 82 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 90 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****