05 November, 2020

निवडणूक कालावधीत वाहनाच्या गैरवापरास प्रतिबंध

 


हिंगोली, दि.05: भारत निवडणूक आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने त्‍यांच्‍या निर्देशानुसार कोणत्‍याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्‍या मोटारगाड्या/वाहने यांच्‍या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिलेले आहेत. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून कोणत्या ही राजकीय पक्षानी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधीनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनाच्‍या ताफ्याचा वापर करण्‍यास प्रतिबंध घालणे आवश्‍यक असल्‍याने सर्व संबंधितास नोटीस देवून त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्‍य नसल्‍याने  जिल्‍हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये त्यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

या आदेशानुसार कोणत्‍याही वाहनाच्‍या  ताफ्यामध्‍ये दहा पेक्षा जास्‍त मोटार गाड्या अथवा वाहने (Cars/Vehicles)  वापरण्‍यास या आदेशान्वये निर्बंध घालण्‍यात येत आहेत. हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: