05 November, 2020

सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध

 

 

 हिंगोली, दि. 5 : भारत निवडणूक आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.

काही व्यक्ती, संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराची विद्रुपीकरण करण्यात येत आहेत. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराची विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मा.भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचित केल्या नुसार महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स  व भिंतीवर जाहिरात प्रसिध्द करतांना संबंधीत स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते नष्ट करुन इमारती, मालमत्ता पूर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढुन घेणे आवश्यक असल्याने सर्व संबंधितास नोटीस देवून त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्‍य नसल्‍याने  जिल्‍हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये त्यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: