15 November, 2019

महिला लोकशाही दिनाचे 18 नोव्हेंबर रोजी आयोजन


महिला लोकशाही दिनाचे 18 नोव्हेंबर  रोजी आयोजन
        हिंगोली, दि.15: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना  सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी  यासाठी  एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे.
ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालयात  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि.जी. शिंदे यांनी केले आहे.

14 November, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी





जिल्हाधिकारी कार्यालयात
पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी  

        हिंगोली, दि. 14 : पंडीत  जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****


निवृत्ती वेतनधारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन


निवृत्ती वेतनधारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

            हिंगोली, दि.14:राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी व कुटुंब निवृत्ती वेतन धारकाची यादी निवृत्ती वेतन धारकाच्या आद्याक्षरी निहाय बँकेकडे पाठविण्यात आलेली आहे. निवृत्ती वेतनधारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेत असतील त्या बँकेत त्यांनी दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हजर राहून यादीतील  त्यांचे नाव पाहून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा  ठसा उमटवावा. पुर्नविवाह तसेच पुर्ननियुक्ती बाबतची माहिती लागू असल्यास ती ही रकान्यात नोंदवावी. तसेच बायोमॅट्रीक पध्दतीनेही जीवन प्रमाण दाखला  http://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावरुन देता येईल. सदरील सुविधा उप कोषागार, कोषागार कार्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती वेतनधारक व्यक्तीस तेथे जावून या सुविधेचा वापर करता येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****



धर्मापुरी येथील जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल शाळा आदिवासी विकास विभागाकडून रद्द


धर्मापुरी येथील जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल
 शाळा आदिवासी विकास विभागाकडून रद्द

         हिंगोली, दि.14 : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली अंतर्गत असलेली नामांकित इंग्रजी शाळा जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, धर्मापुरी जि. परभणी या शाळेत इयत्ता 1 ली या वर्गात 54 विद्यार्थ्यांना या कार्यालयाकडून प्रवेश देण्यात आला होता.
      सदरची शाळा सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी विकास विभागाकडून रद्द करण्यात आली असल्याने प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्याकडून प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सद्य:स्थितीत आपले पाल्य इयत्ता 5 वी मध्ये शिकत असल्याने सदरील शाळेऐवजी आपल्या पाल्यांना दिपावलीच्या सुट्टीनंतर एम.डी.ए. रॉयल इंटरनॅशनल स्कूल कोळपा, ता. जि. लातूर या नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यात यावेत.
         जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, धर्मापुरी जि. परभणी या शाळेत प्रवेश ठेवल्यास सदरील कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी केले आहे.
****

11 November, 2019

ग्रामीण डाक सेवक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती


ग्रामीण डाक सेवक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती

·   महाराष्ट्रासाठी एकूण 3 हजार 650 जागा रिक्त
·   नांदेड जिल्ह्यासाठी 154 ग्रामीण डाक सेवकांची पदे रिक्त

         हिंगोली, दि.11 : भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकूण 3 हजार 650 जागा रिक्त असून नांदेड जिल्ह्यासाठी 154 ग्रामीण डाक सेवकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर आहे. या पदाकरीता उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त दहावीच्या गुणातील गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदार हा 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावा. ओबीसीसाठी 3 वर्ष, एससी-एसटी साठी 5 वर्ष आणि अपंगांसाठी 10 वर्षे वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे . जे उमेदवार ओ.बी.सी., एस.सी., एस.टी . पदासाठी आरक्षित नसतील तेच उमेदवार ई.डब्ल्यू.एस. पदासाठी पात्र असतील ई.डब्ल्यू.एस. पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष वयोगटातील असावी.
नांदेड डाक विभागातील एकूण 154 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 75, एस. सी. साठी 14, एस.टी. साठी 12 आणि ओ.बी.सी. साठी 38 तसेच ई.डब्ल्यू.एस. साठी 15 जागा आरक्षित केलेल्या आहेत. या भरतीसाठी अर्जदारांनी  https://indiapost.gov.in अथवा http://appost.in/gdsonline या संकेतस्थळाला भेट द्यावी व ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत 1 ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. संबंधित संकेतस्थळावर पात्रता निकष याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरावेत असे आवाहन डाक अधिक्षक, नांदड यांनी केले आहे.

****




शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्जाकरीता 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत


शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्जाकरीता 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत

हिंगोली,दि.11: जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनु. जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांनी सन 2019-20 या वर्षात भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबिटी या संगणक प्रणालीवर अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर, 2019 आहे. या तारखेनंतर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.
विहित मुदतीत अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे मुळ स्वरुपात स्कॅन करुन अपलोड करावीत. अपूर्ण कागदपत्रे असलेले शिष्यवृत्ती अर्ज फॉरवर्ड करण्यात येणार नाही. तसेच असे अर्ज रद्द करण्यात येतील.
पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व महाविद्यालयांनी विहित मुदतीत अर्ज करणेसाठीची प्रक्रीया पूर्ण करावी. तसेच महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर अंतिम दिनांकाबाबत विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
****


जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक संपन्न


जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक संपन्न

हिंगोली,दि.11: जिल्हास्तरीय सल्लागार समितीची तिमाही बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण सिंदकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक पी.एम. जंगम, जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक धनाजी बोईले, जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती उपक्रमाचे प्रकल्प संचालक डॉ. घुले व जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान नाबार्डने बनवलेल्या संभाव्य पतपुरवठा आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या आराखड्यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी संभाव्य पतपुरवठा रु. 2334.65 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पीक कर्ज रु. 1443.47 कोटी, शेती मुदत कर्ज रु. 273.58 कोटी, लघु, मध्यम व छोटे उद्योग रु. 335.68 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे. 
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्ह्यातील सर्व बँकांना रब्बी हंगामातील पीक कर्जाची उद्दिष्टे पूण करण्याच्या सूचना दिल्या.
****