11 April, 2025
प्रभाग, ग्रामसंघाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभियान राबवा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे
• विभागीय आयुक्त दर बुधवारी नागरिकांशी थेट बोलणार 'संवाद मराठवाड्याशी'तून
हिंगोली, दि.11 (जिमाका): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानापासून ‘संवाद मराठवाड्याशी’ या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आजपासून प्रारंभ केला. वेबिनारच्या माध्यमातून सुरु झालेल्या या उपक्रमातील पहिल्या-वहिल्या कार्यक्रमात त्यांनी मराठवाड्यातील महिलांशी संवाद साधला असता, अनेक महिलांच्या प्रमुख अडचणी समजून घेताना प्रभाग, ग्रामसंघाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त (विकास) डॉ.अनंत गव्हाणे, सुरेश बेदमुथा आणि मराठवाड्यातून प्रकल्प संचालक, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व उपस्थित होते.
यापुढे दर बुधवारी एक विषय घेऊन मराठवाड्यातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. या वेबिनारमधून अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. तसेच या उपक्रमामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) हे नोडल अधिकारी म्हणून काम करणार असल्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.
आजपासून सुरु झालेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मराठवाड्यातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 'संवाद मराठवाड्याशी' या वेबिनारमधून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सुरुवातीला या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2025 अंतर्गत महिला बचत गटांशी संवाद साधताना यामध्ये संबंधितांनी चांगले काय काम केले, त्यांना काय लाभ मिळाला आणि जिल्हा प्रशासनाकडून काय मदत करता येईल, याबाबत त्यांनी महिलांकडून माहिती जाणून घेतली. तसेच विकास उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांनी बचत गटांना मिळणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी, व्याज सवलतीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी वसमत तालुक्यातील गिरगाव येथील नारी अनमोल महिला उत्पादक कंपनीने हळदीपासून पावडर तयार करण्याचे युनिट स्थापन केल्याचे सांगितले. या गावात 264 प्रभाग गट असून, 13 ग्रामगट असल्याचे सांगून, हळद खरेदीसाठी कर्ज मंजूर झाले असून निधी तात्काळ मिळावा, अशी मागणी केली. तसेच नरसी नामदेव येथील श्री संत नामदेव महिला प्रभाग संघांनी बँक वैयक्तीक कर्ज देत नाहीत, त्यांना आपल्या स्तरावर निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. तसेच हिंगोली येथील दयानंद ढोबळे यांनी कुणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. ते देण्यासाठी आपल्यास्तरावर कार्यवाही करावी, अशी विनंती केली. यावर विभागीय आयुक्तांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जात पडताळणी कार्यालयास कळविण्यात येईल, असे सांगितले.
धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांनी प्रामुख्याने जागेची मागणी केली. त्यावर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले.
परभणी जिल्ह्यातील शिवनेरी महिला प्रभाग संघ ताडबोरगाव येथे प्रभाग व ग्रामसंघाचे कार्यालय नसल्यामुळे अडचणी येत असल्याचे महिलांनी सांगितले असता, ग्रामसेवकाने तात्काळ कार्यालय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
तर जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील महिला बचत गटाकडून चामड्यांपासून बैलांचे साज-श्रृंगार तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. काळानुरुप व्यवसाय वृद्धीसाठी बदल करावा लागणार असून, भविष्यात मागणीनुसार हा व्यवसाय असलेल्या भागात स्टॉल्स उभारून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे 75 गट असून, अनेकांनी राजीनामे दिले असून, एकाच व्यक्तीवर कामाचा ताण येत असल्याचे सांगत सीआरपीची भरती करण्याची मागणी केली असता, रिक्त जागा तात्काळ भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले.
यावेळी हिंगोलीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, तहसीलदार अश्विन माने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment