23 April, 2025
जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त आयोजित कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 च्या अनुषंगाने जलसंपदा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या शेतकरी प्रशिक्षण सभागृहामध्ये आज पीक पध्दती, उत्पादकता वाढ व पाण्याचे नियोजन याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता हिंगोलीचे पालक अभियंता सुधाकर कचकलवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, उगमचे जयाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पीक पध्दती, पाण्याचे नियोजन व त्या अनुषंगाने कृषी विभागाशी संबंधित विविध शासकीय योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
उगमचे जयाजी पाईकराव यांनी पाणी बचतीबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने विविध स्तरावर होत असलेल्या लोकसहभागाच्या प्रयत्नाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार यांनी कृषी विभागामार्फत संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यशाळेचा उपयोग शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीस होईल, असे मत व्यक्त केले. तसेच शेतकरी प्रदीपराव देशमुख यांनी ऊस शेतीसाठी अच्छादीत पध्दतीचा वापर केल्यामुळे पाणी बचत होऊन पिकाचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली असल्याचे अनुभव कथन केले.
दुपारच्या सत्रात शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी पीक पध्दती, उत्पादकता वाढ व पाण्याचे नियोजन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात उपस्थित शेतकरी पुत्र गजानन गणेश भवर यांची राज्य राखीव पोलीस दलामध्ये निवड झाल्याने सत्कार करण्यात आला. कार्यशाळेस परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment