बँकांनी मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत
पूर्ण करावे
- निवासी उपजिल्हाधिकारी अनिल
माचेवाड
·
जिल्ह्यातील 1293 लाभार्थ्यांना 20 कोटी 41 लाख 29
हजार कर्जाचे वितरण
हिंगोली,
दि.20: केंद्र
शासनाने सुरु केलेल्या मुद्रा बँक योजनेतंर्गत नवीन उद्योग सुरु करणाऱ्या
उद्योजकांना मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज वितरणांचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या
सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड
यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
मुद्रा बँक योजना समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी
जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी डी.आर. आव्हाड, जिल्हा
अग्रणी बँकचे व्यवस्थापक पी. आर. शिंदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य
एस.पी. भगत, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी ग.चि.
राठोड, अशासकीय सदस्य उमाशंकर माळोदे, रमेश पंडित, रविद्र फड आणि श्रीकांत
दिक्षित, यांची उपस्थिती होती.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीने
जिल्ह्यातील सर्व बँकांना शिशु गटातील - 30 प्रकरणे, किशोर गटातील - 20 प्रकरणे
आणि तरुण गटातील - 10 प्रकरणे याप्रमाणे गटनिहाय मुद्रा बँक
योजनातंर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. कर्ज वितरणाचे काही बँकानी
उत्कृष्ट काम केले आहे. परंतू समितीने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी जिल्ह्याने
आतापर्यंत केवळ 20 टक्केच उद्दिष्ट पुर्तता केली आहे. तरी सर्व बँकांनी त्यांना
ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेचा देखील मुद्रा बँक योजनेतंर्गत समावेश करण्यात आला असून, त्यांनी देखील कर्ज
वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतू सदर
योजनेतंर्गत त्यांनी अद्यापपर्यंत एक ही कर्ज वितरणाचे प्रकरण केले नाही. काही
बँकां या जून्या खातेधारकांनाच सदर योजनेतंर्गत कर्ज वितरण करुन उद्दिष्ट पूर्ण
करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत.
यापुढे असे प्रकार होणार नाही
याची सर्व बँकांनी दक्षता घेऊन कौशल्य विकास अंतर्गत विविध विषयाचे प्रशिक्षण
प्राप्त करणांऱ्या प्रशिक्षणार्थींनीनी नवीन उद्योग सुरु करण्याकरीता कर्जासाठी
सादर केलेल्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी देवून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज
वितरण करावे. तसेच
सदर योजनेतंर्गत कृषी प्रक्रियेवर आधारित छोटे उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्यांना देखील
सर्व बँकांनी कोणतीही अट न ठेवता कर्ज वितरण करुन सदर योजनेचा लाभ द्यावा. बँकांनी
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देवून जिल्ह्यात नवीन
उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना ही निवासी उपजिल्हाधिकारी
अनिल माचेवाड यांनी यावेळी दिल्या.
तसेच मुद्रा बँक योजनेविषयी काही तक्रार
असल्यास तक्रार निवारणासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांचा दूरध्वनी क्रमांक
02456-221692 आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांचा दूरध्वनी क्रमांक 02456-221461 यावर
संपर्क साधुन तक्रार नोंदविण्याचे अवाहन ही श्री. माचेवाड यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय
उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा
बँक योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील
शिशु , किशोर आणि तरुण या गटातील एकूण 12 हजार 41 लाभार्थ्यांना 20 कोटी 41
लाख रुपय कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे
व्यवस्थापक पी. आर. शिंदे यांनी यावेळी
दिली.
अलाहाबाद
बँक -24 लाभार्थ्यांना 34 लाख , बँक ऑफ
बडोदा -37 लाभार्थ्यांना 35 लाख , बँक ऑफ इंडिया -96 लाभार्थ्यांना 51 लाख , बँक
ऑफ महाराष्ट्र - 90 लाभार्थ्यांना 112 लाख,
कॅनडा बँक 24 लाभार्थ्यांना 48 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया -10
लाभार्थ्यांना 5 लाख, देना बँक -02 लाभार्थ्यांना 1 लाख, आयडीबीआय बँक - 18
लाभार्थ्यांना 60 लाख, ओरियटंल बँक ऑफ कॉमर्स-03 लाभार्थ्यांना 2 लाख, पंजाब नॅशनल
बँक-01 लाभार्थ्यांना 05 लाख, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद-481 लाभार्थ्यांना 966
लाख, स्टेट बँक ऑफ इंडिया-162
लाभार्थ्यांना 246 लाख, सिंडिकेट बँक -57
लाभार्थ्यांना 72 लाख, युको बँक - 09 लाभार्थ्यांना 10 लाख, युनियन बँक ऑफ इंडिया -70 लाभार्थ्यांना 56
लाख, ॲक्सिस बँक -09 लाभार्थ्यांना 2 लाख,
महाराष्ट्र ग्रामीण बँक- 199 लाभार्थ्यांना 337 लाख, असे एकूण 1293
लाभार्थ्यांना 20 कोटी 41 लाख 29 हजार रुपये मुद्रा बँक योजनेतंर्गत या बँकांना
कर्ज वितरण केले आहे.
****
No comments:
Post a Comment