माहिती अधिकार अधिनियम 2005 चा
वापर-अनुभव लेखन स्पर्धा-2016
हिंगोली, दि. 7:- माहिती अधिकार
कायद्याची अंमलबजावणी दिनांक 12 ऑक्टोबर
2005 पासून सुरु झाली आहे. या कायद्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, शासनव्यवस्थेत
माहितगार नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच पादर्शकता व उत्तरदायित्वाची प्रक्रिया सुरु
व्हावी यासाठी केंद्र शासनाने माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या
सूचना दिलेल्या आहेत. या निमित्ताने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा),
पुणे मार्फत माहिती अधिकार अधिनियम 2005 चा
वापर- अनुभव लेखन स्पर्धा 2015 चे आयोजन करण्यात आले असून याकरिता आपले अनुभव 15
जानेवारी, 2017 पर्यत यशदा, पुणे येथे पाठविण्याचे आवाहन माहिती अधिकार केंद्राचे संचालक
मिलिंद टांकसाळे यांनी केले आहे.
महिती
अधिकार कायद्यांच्या माध्यमातून देशभरात विविध नागरी संघटना शासकीय कारभार अधिकाधिक
उत्तरदायी बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कायद्याच्या माध्यमातून सामाजिक लेखापरीक्षणाद्वारे
तळातील माणसापर्यंत सुप्रशासन पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. माहिती अधिकाराचा वापर
करुन गेल्या नऊ वर्षात समाजहिताच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली आहे. एकूणच या कायद्याच्या
माध्यमातून पादर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभाग ही त्रिसूत्री जनसामान्यंपर्यत पोहोचवण्याचे
प्रयत्न सुरु आहेत. माहिती अधिकार कायद्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना व माहिती पुरवणाऱ्या
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षात अनेक अनुकूल-प्रतिकूल अनुभवांना
तोंड द्यावे लागले आहे. त्या दृष्टीने कायद्याचे, आपल्या अनुभवाच्याव्दारे परीक्षण
करण्याची वेळ आलेली आहे.
माहिती
अधिकाराचा समाजहितासाठी उपयोग करताना आलेले चांगले अनुभव म्हणजे यशोगाथा तसेच प्रतिकूल
अनुभव शब्दबध्द करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. यासाठी यशदामार्फत अनुभव लेखन
स्पर्धा आयोजीत करण्यात येत असून विषय पुढीलप्रमाणे - 1) माहिती अधिकार अर्ज व अनुषंगिक
उपलब्ध माहिती आणि माहितीचा उपयोग, 2) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे
विनियमन आणि कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 आणि माहितीचा
अधिकार अधिनियम, 2005, 3) माहितीचा अधिकार अधिनियम कलम 4 चे प्राधिकरणाने करावयाचे
स्वयंप्रकटीकरण सद्यस्थिती 1 हजार शब्दांमध्ये आवश्यक पुराव्यासह पाठवावीत तसेच निबंधलेखन
स्पर्धेसाठीचे विषय पुढीलप्रमाणे - 1) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वापर आंतरराष्ट्रीय
आणि राष्ट्रीय संदर्भ तूलनात्मक आढावा, 2) डिजीटल इंडिया (माहिती तंत्रज्ञान) पार्श्वभुमीवर
माहिती अधिकारी अधिनियम 2005, 3) माहिती अधिकारी अधिनियम 20052 संबंधित परिणामकारक
महत्वाचे न्यायनिवाडे.
या स्पर्धेसाठी गेल्या अकरा
वर्षातील माहितीच्या अधिकाराचा वापर करताना आलेल्या अनुभवाचे लेखन पात्र समजण्यात येईल.
सुवाच्य अक्षरात 1 हजार शब्दांपर्यत हस्तलिखित अथवा टंकलिखित केलेले अनुभव व निबंध
स्वीकारले जातील. त्यासोबत आवश्यक ते पुरावे जोडावेत. आपले अनुभव लेखन दि. 15 जानेवारी, 2017 पर्यंत प्रकल्प अधिकारी, माहिती अधिकार
केंद्र, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे 411007 या पत्यावर पाठविण्यात यावेत.
प्रवेशिका कशी पाठवावी याबाबतचा तपशील व नमुना यशदाचे www.yashada.org या संकेस्थळावर उपलब्ध आहे. या विषयातील मान्यवर
तज्ञ अनुभव लेखनाचे परीक्षण करतील, यशस्वी स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांकास रु. 5 हजार,
द्वितीय क्रमांकास रु. 3 हजार, तृतीय क्रमांकास रु. 1 हजार पारितोषिक व प्रमाणपत्र
देण्यात येईल. तर निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकास रु. 3 हजार, व्दितीय
क्रमांकास रु. 2 हजार व तृतीय क्रमांकास रु. 1 हजार उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात
येईल. तसेच तज्ञ मान्यवरांना वाटल्यास एक प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून प्रमाणपत्र देण्यात
येईल. या स्पर्धेचा निकाल यशदाच्या उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या
स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार केंद्र, यशदा येथील पुढील
दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा (020)- 25608130, असे असे प्रसिध्दी पत्रकात नमूद
केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment