मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्काची
जाणीव व्हावी
याकरिता नवयुवकांनी मतदारांना
प्रोत्साहीत करावे
--- जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी
·
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी यांनी
मतदानाची प्रतिज्ञा दिली
हिंगोली, दि. 25 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 25 जानेवारी
हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदारांना आपल्या
मतदानाच्या हक्काची जाणीव व्हावी, याकरिता प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्यावतीने आदर्श महाविद्यालय, हिंगोली
येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रमात ते बोलत
होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार विजय अवधाने, आदर्श
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एन. बर्वे आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती
होती.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी
अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यामध्ये तरुणांचा सहभाग
महत्त्वपुर्ण राहणार आहे. तसेच तरुण मतदारांनी केवळ आपल्या मतदानाच्या
अधिकारापुरता विचार न करता, आपल्या नजीकच्या परिसरातील मतदानास पात्र नागरिकांना
तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्तींना मतदानास प्रोत्साहीत करावे. मोबाईल ॲप तसेच
सोशल माध्यम, माहिती तंत्रज्ञानाचा लोकशाही बळकट करण्यासाठी वापर करावा. तसेच
निवडणुकीसंदर्भातील माहिती सर्व विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावी. निवडणुकीसंदर्भात
मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढविण्यावर भर देण्यात यावा. जेणे करुन एकही मतदार
मतदानापासून वंचित राहणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी. मतदानात आपला
सहभाग अमुल्य व महत्वाचा आहे, असेही श्री. भंडारी म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड म्हणाले
की, मतदान प्रक्रिया पारदर्शी झालेली असून
त्यामुळे बोगस मतदान होणार नाही. मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा. चांगले
लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत. त्यासाठी नवयुवकांचा मोठा सहभाग असणे आवश्यक आहे,
असेही ते यावेळी म्हणाले .
जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे
म्हणाले की, मतदार जागृती करणे व मतदानाचे प्रमाण वाढविणे ही जबाबदारी आपल्यावर
आहे. आपले मतदान हे बहुमूल्य व महत्वाचे आहे. तसेच योग्य व पारदर्शी शासन निवडून
देण्यासाठी मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. त्याकरिता नवयुवकांनी लोकशाही यशस्वी व
बळकट करण्याकरिता नागरिकांमध्ये मतदानाच्या
हक्काविषयी जनजागृती करावी, असेही मोराळे म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय मतदार
दिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते नवीन मतदारांना बिल्ले, मतदार ओळखपत्रांचे वितरण
करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शाळा, महाविद्यालयातील
विद्यार्थी-विद्यार्थींकरिता घेण्यात आलेल्या निबंध, रांगोळी, चित्रकला या
स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र
देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदर्श महाविद्यालयाचे श्री. कदम यांनी केले. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद
रणवीरकर यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.
*****
No comments:
Post a Comment