31 May, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
हिंगोली, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, आदिसह प्रशासकीय इमारतीमधील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 31 :  जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 31 मे, 2017 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 14 जून, 2017 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी कळविले आहे.
आगामी काळात धरणे, मोर्चे, रस्तारोको, आंदोलनाची शक्यता या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 31 मे 2017 ते दि. 14 जून, 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

                                                            *****   
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
                हिंगोली, दि. 31 : महात्मा  गांधी  तंटामुक्त  गाव  मोहिमेअतंर्गत  मोहिमेला  वस्तुनिष्ठ  प्रसिध्दी  देऊन, ही  योजना  जनसामान्यांपर्यंत  प्रभावीपणे  पोहोचविणाऱ्या  पत्रकारांसाठी  शासनाने  जिल्हाविभाग  व  राज्य  स्तरावर  पुरस्कार  देण्याची  योजना  जाहीर केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी  आपल्या  प्रवेशिका  गुरुवार दि. 15 जून, 2017 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महात्मा गांधी तंटामुक्त गाव  मोहीम  पत्रकार  पुरस्कार  जिल्हास्तरीय  समितीच्यावतीने  करण्यात  आले  आहे. 
            जिल्हास्तरीय  प्रथम  पुरस्कार  रुपये  25 हजारद्वितीय पुरस्कार रुपये 15 हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये 10 हजार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी  2 मे 2016 ते 1 मे 2017 या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण पुरस्कार पात्रतेकरिता मल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे / नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्तपत्रकार  पात्र  असतील.  पारितोषिकांसाठी  मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ, , क  वर्गवारीतील  वृत्तपत्रे / नियतकालिके  यामधून  प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच  या  पारितोषिकांसाठी  विचार  करण्यात  येईल.
         एका वर्तमानपत्राच्या  प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल.  जिल्ह्यातून  प्रथम  क्रमांक  मिळविलेल्या  पत्रकारांचे  विभागीय  स्तरावरील  पुरस्कारासाठी  आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन  होईल. 
हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, प्रशासकीय इमारत, एस-6, हिंगोली-431513 (दूरध्वनी क्र. 02456 -222635)  यांच्याकडे गुरुवार दि. 15 जून  2017  पर्यंत  पाठवाव्यात.

*****

29 May, 2017

संपाच्या कालावधीत शासकीय/निमशासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 29 : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व महाराष्ट्र केमीस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोशिएशन यांनी देशातील सर्व किरकोळ व घाऊक औषधी विक्रेते यांचे दि. 30 मे, 2017 रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषणा केलेली आहे.
याबाबत सहाय्यक आयुक्त, (औषधे) व औषध निरीक्षक यांनी केमीस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोशिएशन हिंगोली यांना जनतेची व रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता दि. 30 मे, 2017 रोजीचा बेकायदेशीर बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
औषध विक्रेते यांना आवाहन करण्यात येते की, आपणाकडून व्यवसाय करतांना जनसामान्यांच्या आरोग्य सेवेचे समाजोपयोगी कार्य घडत आहे. अशा प्रकारची सेवा जनसामान्यांना देण्याचे कार्य आपणाकडून अविरतपणे सुरू राहील याची खात्री वाटते. तरी आपण दि. 30 मे, 2017 रोजी नियमितपणे औषधी दुकाने सुरू ठेवून आपण आंदोलनात सहभागी होऊ नये. जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही.
संप काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक व  जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्यांचे अधिनस्त सर्व औषधी भांडारामध्ये पुरेसा औषधी साठा ठेवण्यास कळविले आहे. तसेच इंडियन मेडीकल असोशिएशन यांना देखील योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत कळविले आहे.
याबाबत सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, आपात्तकालीन औषधाची आवश्यकता भासल्यास नजिकच्या शासकीय / निमशासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. संपाच्या काळात नियंत्रण कक्ष कार्यरत असून (सकाळी 8.00 ते रात्री 8.00) जनतेस अथवा रुग्णास औषधे प्राप्त न झाल्यास अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य कार्यालय 02452-230218 व औषध निरीक्षक ब. दा. मरेवाड मो. 8275175232 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

***** 

28 May, 2017

 जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

        हिंगोली,दि.28 :- भारतीय इतिहासात शौर्य गाजविणारे महाराणा प्रताप सिंह यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
       यावेळी उपजिल्हाधिकारी ( रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी विवेक काळे आदि अधिकारी-कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

  ***

26 May, 2017

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता तात्काळ करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 26 : जिल्ह्यामध्ये दि. 21 नोव्हेंबर, 2016 पासून जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन झालेली असून सदर समितीच्या वेगवेगळ्या बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील निवडणूक / सेवा / विद्यार्थी अशी जात प्रमाणपत्र वैधता करणेसाठीची प्रकरणे कागदपत्राअभावी त्रुटीमध्ये आहेत. सदर त्रुटीमधील प्रकरणांचा विनाविलंब निपटारा करणेसाठी त्रुटीमध्ये निघालेल्या प्रस्तावाची स्वतंत्र यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शविण्यात आली असून निवडणूक प्रकरणे ज्या कार्यालयाकडून प्राप्त झाली त्या तहसिल कार्यालये यांना पाठविण्यात आलेली आहेत. तसेच विद्यार्थ्यांची प्रकरणे संबंधित महाविद्यालयाकडे पाठविण्यात आलेली आहेत.
सदर त्रुटींमधील प्रस्ताव अर्जदाराने स्वत: परत घेऊन जावे व दर्शविण्यात आलेल्या त्रुटींची पुर्तता तात्काळ करून आपले प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली येथे सादर करावेत. जेणेकरून सदर प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणे सोईचे होईल, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

25 May, 2017

स्वच्छ भारत मिशन यांचा स्वच्छतेवर जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि.25 : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाअंतर्गत दि. 23 एप्रिल, 2017 रोजी ग्रामपंचायत कोथळज ता. हिंगोली येथे कलापथकाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शाहिर इंगोले यांनी कलापथकाव्दारे स्वच्छता व जनजागृतीपर वर आधारित मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, श्रीमती दिपाली कोतवाल, गट विकास अधिकारी श्री. बोंदरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. वैष्णवी दिलीप घुगे, सरपंच दिलीप घुगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कलापथक कार्यक्रम हा स्वच्छतेच्या जनजागृतीपर कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेबद्दल महत्व पटवून दिले. तसेच गावातील महिलांनी सहभाग घेऊन गाव हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन याव्दारे करण्यात आले. तसेच गावातील शुध्द पाणी, गावातील रस्त्यावरील घान पाणी याबाबत व शौचालय बांधा व वापर करा. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी गावातील महिलांना शौचालय नसणाऱ्या कुटूंबाना शौचालय बांधण्याकरिता आवाहन केले.
गावातील ग्रामस्थांना गाव हागणदारी मुक्तीकरिता गावातील महिला तसेच गावातील बचत गटातील महिला कुंटूंब प्रमुख, गावातील ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले यांना कलापथकाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास जिल्हा कक्षातील तज्ज्ञ माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ श्यामसुंदर मस्के, राधेश्याम गंगासागर व गट संसाधन केंद्रातील श्री. भराडे व ग्रामसेवक उपस्थित होते.

*****
जिल्ह्यात 1800 उमेदवार देणार दुय्यम निरीक्षक पुर्व परीक्षा
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु
हिंगोली, दि. 25 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क पुर्व परीक्षा 2017, रविवार, दि. 28 मे, 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 या वेळात हिंगोली जिल्हा मुख्यालयी 07 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी 07 उपकेंद्रावर 1 हजार 800 उमेदवार परीक्षेस बसले आहेत.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दुष्टीकोनातुन परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणुन वापरण्यायोग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यास परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यास आयोगामार्फत सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या द्दष्टीकोणातून परीक्षा केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती हाताळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 परीक्षा केंद्रावर लागु करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रावर फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा मुळ पुरावा व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सुचनेनुसार  आयागाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेश दारावर पोलीसांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
सदरील परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे (ब्ल्यु टुथ, हेड फोन, स्मॉल कॅमेरा फिटेड ऑन वॉचेस/शर्ट बटन/पेन्स/रिंग्स/स्पाय कॅमेरा/स्मार्ट वॉचेस/लेन्सेस) यासारख्या साधनासह आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणतेही  साहित्य आढळून आल्यास तसेच कॉपीचा / गैरप्रकाराचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी  स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे. तसेच सदर परीक्षेस नियुक्त करण्यात आलेल्या उपकेंद्र प्रमुख/पर्यवेक्षक/समवेक्षक/लिपिक यांनी परीक्षेच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्याच्या विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.

***** 

24 May, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि.24 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 25 मे, 2017 ते 28 मे, 2017 या कालावधीत हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
गुरूवार, दि. 25 मे, 2017 रोजी सोईनुसार शासकीय वाहनाने परभणी येथून हिंगोलीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून मौजे सवड ता. हिंगोली येथे शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता मौजे घोटा ता. हिंगोली येथे शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता मौजे केसापूर ता. हिंगोली येथे शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.00 वाजता मौजे नरसी (ना.) ता. हिंगोली येथे शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 04.00 वाजता मौजे पहेणी ता. हिंगोली येथे शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 05.00 वाजता मौजे वरुड काजी ता. हिंगोली येथे शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 06.00 वाजता मौजे वरुड समद ता. हिंगोली येथे शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार 06.00 वाजता मौजे वरुड समद येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव.
शुक्रवार, दि. 26 मे, 2017 रोजी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून पुसेगाव ता. सेनगाव जि. हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता मौजे पुसेगांव ता. सेनगाव येथे आगमन व शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता मौजे पुसेगाव येथून खुडज येथे आगमन व  शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता मौजे खुडज येथून वाहनाने मौजे तळणी येथे आगमन व  शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.00 वाजता मौजे तळणी येथून वाहनाने मौजे सेनगाव येथे आगमन व  शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 05.00 वाजता मौजे सेनगाव येथून वाहनाने मौजे हत्ता येथे आगमन व  शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 06.00 वाजता मौजे हत्ता येथून वाहनाने मौजे गणेशपूर ता. सेनगांव येथे आगमन व  शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार मौजे गणेशपूर ता. सेनगांव शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव.
शनिवार, दि. 27 मे, 2017 रोजी सकाळी 09.00  वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून शासकीय वाहनाने (अमरावती) मार्गे नागपूरकडे प्रयाण.
रविवार, दि. 28 मे, 2017 रोजी पहाटे 03.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता मौजे माळवटा ता. वसमत येथे आगमन व शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता मौजे माळवटा येथून मुरुंबा ता. वसमत येथे आगमन व शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.00 वाजता मौजे मुरुंबा येथून खांडेगाव ता. वसमत येथे आगमन व शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 04.00 वाजता मौजे खांडेगाव येथून अकोली ता. वसमत येथे आगमन व शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 05.00 वाजता मौजे अकोली येथून किन्हाळा ता. वसमत येथे आगमन व शिवार संवादकार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार मौजे किन्हाळा येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. रात्री 09.30 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने जिंतूर (जि. परभणी) जालना-औरंगाबाद-अहमदनगर  मार्गे पुणेकडे प्रयाण.

*****
पालकमंत्री दिलीप कांबळे शिवार संवाद व्दारे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
हिंगोली, दि.24 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 25 मे, 2017 ते 28 मे, 2017 या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी शिवार संवाद साधणार आहेत. त्याव्दारे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजुन घेणे आणि शासनाच्या योजना आणि उपाययोजना याची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

*****
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार
हिंगोली, दि.24 : आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरीचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुढीलप्रमाणे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्जाची मागणी करण्यात येत आहे. यात 1) एम. बी. ए. पदव्युत्तरसाठी 2 अर्ज तर 2) वैद्यकिय अभ्यासक्रम पदवी 1 आणि पदव्युत्तर 1, 3) बी. टेक (इंजीनीयरींग) पदवी 1 आणि पदव्युत्तर 1, 4) विज्ञान पदव्युत्तर 1, 5) कृषी पदव्युत्तर 1 आणि 6) इतर विषयाचे अभ्यासक्रम पदव्युत्तरसाठी 2 असे एकूण राज्यातील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सवलत मिळणार आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी दि. 29 मे, 2017 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

23 May, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 23 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 25 मे, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
गुरूवार दि. 25 मे, 2017 रोजी सोईनुसार शासकीय वाहनाने परभणी येथून हिंगोलीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. शासनाने आयोजित केलेल्या शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार हिंगोली येथे राखीव व मुक्काम.


***** 
जिल्ह्यातील सात गावासाठी नवीन विंधन विहिरीच्या प्रस्तावास मान्यता
हिंगोली, दि. 23 : पाणी टंचाई अंतर्गत हिंगोली तालूक्यासाठी 05 तर कळमनूरी तालूक्यासाठी 02 अशा एकूण  07 गावाकरीता नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील 1) आठरवाडी 2) जांभरुन तांडा 3) राहोली खु. 4) हिवराबेल आणि 5) अंभेरी कळमनुरी तालुक्यातील 1) सालापूर 2) पिंप्री बु. अशा एकुण 07 गावांसाठी 07 नवीन विंधन विहिरी व हातपंपाचे कामाचे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रत्येकी 49 हजार 605 याप्रमाणे 03 लाख 47 हजार 235 रुपये निधीच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता प्रदान केली आहे. सदरील 07 गावांमध्ये जर यापुर्वी विंधन विहीरी घेण्यात आल्या असतील तर प्रामुख्याने त्याची दुरूस्ती शक्य असेल तर दुरूस्त करावे या अटीस अधिन राहून या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत.

*****  

22 May, 2017

दोन ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
            हिंगोली,दि.22: जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात विहित मुदती जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत देवजना ता. कळमनुरी ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेश तुळशीराम धोत्रे आणि ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभाबाई दिलीप कल्याणकर या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10-1 अ अन्वये सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

20 May, 2017

उत्तराखंड येथे गेलेल्या भाविक व पर्यटकांच्या नातेवाईकांनी
नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली दि. 20 : उत्तराखंड येथील दि.१९ मे, २०१७ रोजी सायंकाळी जोशीमठ जवळ भूस्खलन होऊन हजारो पर्यटक अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून उत्तराखंड येथे गेलेल्या पर्यटकांना मदत तसेच इतर सुविधा प्राप्त करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उत्तराखंड येथे गेलेल्या नागरीकांची माहिती कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र परिवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. ०२४५६-२२२५६० व  भ्रमणध्वनी ९५२७०४४१७१ या क्रमांकावर  देण्याचे आवाहन केले आहे.
            सदरील भूस्खलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षामार्फत ट्रॅव्हल्स कंपनी, यात्रा आयोजक, सोशल मिडिया तसेच स्थानिक नागरीक यांच्यामार्फत उत्तराखंड येथे गेलेल्या नागरीकांची माहिती घेण्यात आली होती. त्यानुसार माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री. भंडारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातून उत्तराखंड येथे गेलेल्या पर्यटकांशी, यात्रा आयोजक व ट्रॅव्हल्स कंपनी यांना संपर्क साधला. त्यानुसार पर्यटकांची विचारपूस करून कोणतीही अडचण नसल्याचे तसेच सुखरूप असल्याचेही पर्यटकांमार्फत कळविण्यात आले आहे. यात्रा आयोजक व ट्रॅव्हल्स कंपनी यांना पर्यटकांची काळजी घेण्याबाबत तसेच जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहण्यासाठी यावेळी सूचित करण्यात आले आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****

 

अवैध खतांचा साठा व बोगस बियाणे विक्री धारकांवर कारवाई करण्यात येणार

  -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी

  • कृषी केंद्रानी ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री करावी
हिंगोली, दि.20: शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही. पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होणार असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खतांचे आणि बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  दर्जेदार व उत्तम प्रतीचे खते व बियाणे उपलब्ध होणार आहेत.  अप्रमाणित खते व बियाणे विक्री करणाऱ्या विक्री धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले. 
आज श्री. भंडारी यांनी जिल्ह्यातील रिसाला बाजार येथील माऊली कृषी केंद्राचे गोदाम व प्रकाश ट्रेडींग कंपनीला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी ई-पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना खत विक्री कशा प्रकारे केली जाणार आहे याचीही माहिती घेतली. दि. 1 जून, 2017 पासून जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रानी ई-पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना खत विक्री करावी अशा सूचना हि त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या. तसेच उपस्थित व्यापाऱ्यांच्या समस्या ही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.
यावेळी रेल्वे रेक पॉईंट येथुन करण्यात येणाऱ्या खतांचा व बियाणांचा पुरवठ्याच्या देखील श्री. भंडारी रेल्वे रेक पॉईंट येथे जावून पाहणी केली. तसेच सदर खते व बियाणे पावसामुळे भिजू नयेत यासाठी काय उपाय योजना करता येतील याची पाहणी केली. तसेच खते व बियाणे भिजू नये याकरीता लवकरात लवकरण सोयी सुविधा उपलबध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल, कृषी अधिकारी पंकज राठोड व उत्तम वाघमारे तसेच कृषी विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शर्मा, महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोशिएशनचे सहसचिव आनंद निलावार, हिंगोली व्यापारी महासंघाचे सहसचिव श्री. मानका व द्वारकादास झंवर आदिंची यावेळी उपस्थिती होती. 

****


दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा

हिंगोली, दि.20: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेली प्रतिज्ञा

आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या
परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व
हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक
प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये
शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी
जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.
*****

 

19 May, 2017

‘चला गावाकडे जाऊ-ध्यास विकासाचा घेऊ’ मोहिमेचे आयोजन

  • जिल्ह्यात 20 ते 29 मे, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार मोहिम
हिंगोली, दि.१९: राज्य  शासनाच्यावतीने विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून, यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा जलसंधारणच्या महत्वाच्या योजनाचा समावेश आहे. सदर योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामांना पावसाळा सुरु होण्यापूर्वी गती मिळावी याकरीता जिल्ह्यात दि. २० ते २९ मे या कालावधीत ‘चला गावाकडे जाऊ-ध्यास विकासाचा घेऊ’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात येत असून, सन २०१५-१६ व २०१६-१७ मधील जलयुक्त शिवार अभियानातील उर्वरित कामे आणि २०१७-१८ करीता निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे पावसाळ्यापूर्वी तयार करून कामे पूर्ण करणे हा मुख्य उद्देश या मोहिमेचा राहणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांबरोबरच ‘चला गावाकडे जाऊ, विकासाचा ध्यास घेऊ’ या अभिनव उपक्रमातही सर्वांनी सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे.
विभागात गाव व शहरांची स्वच्छता, तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे करणे, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवाराची कामे, महिलांच्या सबलीकरणाचे उपक्रम, घरकूल, वैयक्तिक शौचालये, वैयक्तिक सिंचन विहीरी इत्यादी विषयाच्या विकास कामांत क्रांतीस्वरूप उठाव सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तसेच यात आणखी मोठ्या प्रमाणावर भर पडावी व विभागातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या जन्मागावाची सेवा करण्याची किंबहुना अल्पप्रमाणात का हाईना ऋण फेडण्याची संधी मिळावी यासाठी शासनाच्या विकासात्मक योजनांत प्रात्यक्षिकरित्या सहभाग नोंदवावा.
सदर मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तालुक्यातील एकूण गावांची विभागणी प्रत्येकी सलग दोन दिवस याप्रमाणे दिनांक निहाय चार टप्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा उदा. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रामसंपर्क अधिकारी यांच्यावर सदर मोहिमेचे नियोजन करण्याची जबाबदारी राहणार आहे.
            तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे त्यांच्या गावातील त्यांना ज्ञात असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कोणत्या तारखेस गावात मोहिम राबविण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देणार आहे. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी त्यांच्या गावातील दोन दिवसीय कामाचे योग्य ते नियेाजन करुन याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, युवक संघ, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना सहभागी करुन घ्यावे.
            सदर मोहिमेच्या कालावधीत तालुका संपर्क अधिकारी व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही गावांना भेटी देवून मोहिमेची पाहणी करणार आहेत. तसेच ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जन्मगाव या विभागात नाही, त्यांनी या विभागातील त्यांच्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या किंवा सहकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गावात जावुन मोहिमेत सहभागी व्हावे. तर शहरी भागात जन्मगाव असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शहरातील त्यांच्या प्रभागात (वॉर्डात) मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
           

*****