20 May, 2017

अवैध खतांचा साठा व बोगस बियाणे विक्री धारकांवर कारवाई करण्यात येणार

  -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी

  • कृषी केंद्रानी ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री करावी
हिंगोली, दि.20: शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही. पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होणार असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खतांचे आणि बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  दर्जेदार व उत्तम प्रतीचे खते व बियाणे उपलब्ध होणार आहेत.  अप्रमाणित खते व बियाणे विक्री करणाऱ्या विक्री धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले. 
आज श्री. भंडारी यांनी जिल्ह्यातील रिसाला बाजार येथील माऊली कृषी केंद्राचे गोदाम व प्रकाश ट्रेडींग कंपनीला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी ई-पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना खत विक्री कशा प्रकारे केली जाणार आहे याचीही माहिती घेतली. दि. 1 जून, 2017 पासून जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रानी ई-पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना खत विक्री करावी अशा सूचना हि त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या. तसेच उपस्थित व्यापाऱ्यांच्या समस्या ही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.
यावेळी रेल्वे रेक पॉईंट येथुन करण्यात येणाऱ्या खतांचा व बियाणांचा पुरवठ्याच्या देखील श्री. भंडारी रेल्वे रेक पॉईंट येथे जावून पाहणी केली. तसेच सदर खते व बियाणे पावसामुळे भिजू नयेत यासाठी काय उपाय योजना करता येतील याची पाहणी केली. तसेच खते व बियाणे भिजू नये याकरीता लवकरात लवकरण सोयी सुविधा उपलबध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल, कृषी अधिकारी पंकज राठोड व उत्तम वाघमारे तसेच कृषी विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शर्मा, महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोशिएशनचे सहसचिव आनंद निलावार, हिंगोली व्यापारी महासंघाचे सहसचिव श्री. मानका व द्वारकादास झंवर आदिंची यावेळी उपस्थिती होती. 

****


No comments: