01 May, 2017

अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील
-- पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे
        हिंगोली,दि.1: जिल्हा क्रिडा संकूलात विविध क्रिडा प्रकाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्‍ध करुन दिल्यास जिल्ह्यातून उत्कृ्‌ष्ट खेळाडू निर्माण होतील असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            क्रिडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रिडा संकुल, हिंगोली अंतर्गत येथील जिल्हा क्रिडा संकुल मध्ये मल्टीपर्पज इनडोअर हॉलच्या भूमिपुजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, आमदार तान्हाजी मुटूकळे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी                     डॉ. एच.पी. तुम्मोड, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रिडा अधिकारी किशोर पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले की, चांगले नागरिक घडण्यासाठी विविध क्रिडा प्रकार खेळणे आवश्यक आहे.  क्रिडागंणे ही उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचे कार्य करत असतात.  कारण क्रिडा प्रकारातून व्यक्तीमत्वाचा विकास होण्यास मदत होऊन एकसंघाची भावना निर्माण होण्यास मदत होते. आज भूमीपुजन करण्यात आलेल्या मल्टीपर्पज हॉल हा 40 बाय 30 मीटर या आकाराचा तयार करण्यात येणार असून, याकरीता 4 कोटी 11 लक्ष खर्च करण्यात येणार आहे. या हॉल मध्ये बॅडमिंटन, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, टेबल टेनिस, ज्यूडो, कराटे आदी क्रिडा प्रकारच्या स्पर्धासाठी अत्याधुनिक सर्व सुविधा असलेला हॉल निर्माण


करण्यात येणार आहे. या मल्टीपर्पज हॉलचे काम उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री             श्री. कांबळे यांनी यावेळी संबंधीतांना दिल्या.
            तसेच अनेक दिवसापासून बंद पडलेला जलतरण तलाव दूरुस्त करुन नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावा. अर्थिक अडचणीमुळे जिल्ह्यातील जे खेळाडू मागे राहत आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी विविध माध्यमातून अर्थिक मदत करण्यात येईल असे ही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, मल्टीपर्पज इनडोअर हॉलचे काम उत्कृष्ट दर्जाचे गुणवत्तापूर्ण व्हावे. तसेच खेळाडूंना या बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन दिल्यास खेळाडूना त्यांच्या सरावासाठी होणाऱ्या समस्येचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. जिल्यातून चांगले उत्कृष्ट खेळाडूं निर्माण व्हावे यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना विविध खेळासाठी प्रोत्साहित करावे. जेणेकरुन भविष्यात हे खेळाडूं आपल्या जिल्ह्याचं तसेच देशाचं नाव उंचीवर नेण्याचे काम करतील. अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी व्यक्त केली.
            आमदार तान्हाजी मुटकुळे म्हणाले की, हिंगोली शहरातील खेळाडूंना तसेच नागरिकांना लवकरच बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन देण्यात येईल. बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन दिल्यामुळे खेळाडूंच्या क्रिडा क्षेत्राला वाव मिळेल. तसेच सदर काम लवकरात-लवकर पूर्ण होईल, अशी इच्छा श्री. मुटकुळे व्यक्त केली.
आमदार रामराव वडकुते म्हणाले की, या मल्टीपर्पज बॅडमिंटन हॉलमुळे खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले. क्रिडा अधिकारी किशोर पाठक यांनी सुत्रसंचालन केले. तर श्री. बेत्तीवार यांनी आभार मानले.
            यावेळी जिल्ह्यातील खेळाडू, नागरिक यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****   












No comments: