हिंगोली येथे आज भव्य अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन
हिंगोली,दि.09: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अटल मैदानावर आज जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
यांच्या मार्गदर्शनाखाली विनामुल्य सकाळी आठ ते चार या वेळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन,
पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत सकाळी 10:30
वाजता या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील 25 हेक्टर जागेवर या अटल महाआरोग्य
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसहभागातून होऊ घातलेले या शिबिरात
महाराष्ट्रातील नामाकिंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार
असून, जवळपास दिड हजार डॉक्टर याठिकाणी आरोग्यसेवा देणार आहे. यात ॲलोपॅथी,
होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी आदी
पद्धती या ठिकाणी रुग्णांना मिळणार आहेत. 19 प्रकारच्या विविध आजारांची यावेळी
तपासणी होणार आहे. याठिकाणी 100 बाह्यरुग्ण विभाग ज्यामध्ये प्रामुख्याने हृद्य
रोग, कर्करोग, नेत्र, त्वचारोग, कान नाक घसा, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग,
बालरोग, अस्थिरोग लठ्ठपणा, वृद्ध विकार, मूत्ररोग, आदी बाबींचा समावेश या
शिबिरांमध्ये आहे.
रुग्णांना सेवा देण्यासाठी सुमारे दिड हजार पॅरामेडिकलचा स्टाफ , सात हजार स्वयंसेवक कार्यकर्ते, विद्यार्थी व
समाजसेवी संस्था याठिकाणी आपल्या सेवा देणार आहेत. रुग्णांची तपासणी करण्यात
आल्यानंतर ज्यांना उपचार शक्य असतील अशा रुग्णांना तात्काळ निशुल्क औषधे देण्यात येणार असून, त्याकरीता सुमारे दीड कोटी रुपयांची औषधी या
ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांना तात्काळ
उपचार शक्य नसल्यास दिनांक 13 तारखेला पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर त्यांना उपचार
देण्यात येणार आहेत तेथे ही शक्य नसेल तर जिल्हास्तरावर आणि त्या ठिकाणी ही शक्य नसेल तर
औरंगाबाद, नागपूर, पुणे, नांदेड, मुंबई येथे रुग्णांना नेवून त्यांना मोफत उपचार
देण्यात येतील अशी माहिती शिबिर संयोजन समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सर्व शासकीय प्राथमिक आरोग्य
केंद्र, ग्रामीण रुग्णालय पूर्वतपासणी सप्ताह दरम्यान आज पर्यंत सुमारे 65 हजार
367 रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आली असून, प्रत्यक्ष् शिबिरात एक ते सव्वा
लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्व नियोजन करण्यात आले असून, या
शिबीरात सुमारे दीड हजार डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी या ठिकाणी
होणार आहे. तसेच ऐनवेळी येणाऱ्या रुग्णांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांसाठी नाष्टा,
चहापाणी तसेच दुपारी जेवणाची व्यवस्था विविध सेवी संस्था यांच्या माध्यमातून
करण्यात आलेली आहे. 25 हेक्टर जागेत शिबिर मंडप, 10 रुग्णवाहिका, वाहतूक व्यवस्था
चार अग्निशामक वाहन, 10 पाणी पिण्याचे टँकर्स, मोबाईल टॉयलेट्स, डस्टबिन आदींची व्यवस्था
याठिकाणी करण्यात आली आहे.
अतिशय सुसज्ज व नियोजनपूर्वक असे हे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न होत असून, या महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी आवश्य लाभ
घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
*****