21 February, 2019

विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन · 23 व 24 फेब्रूवारी रोजी करता येणार मतदार नोंदणी



विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन
·   23 व 24 फेब्रूवारी रोजी करता येणार मतदार नोंदणी
हिंगोली,दि.21: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 विचारात घेऊन हिंगोली जिल्ह्यात 01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत नुकत्याच पार पडलेल्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित मतदारांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.23 (शनिवार) व 24 (रविवार) फेब्रुवारी, 2019 या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सर्व मतदान केंद्रावर नमुना नं. 6, 7, 8 व 8अ चे अर्ज स्विकारणार आहेत. दि.01 जानेवारी, 2019 रोजी ज्या व्यक्तींच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत, अशा युवा मतदारांना या कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणी करता येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दि.23 (शनिवार) व 24 (रविवार) फेब्रुवारी, 2019 या विशेष मोहिमेच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी नमुना नं. 6, मतदार यादीतील नाव वगळणेसाठी नमुना नं. 7, मतदार यादीतील तपशिलामधील दुरुस्तीसाठी नमुना नं. 8 व मतदारसंघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नमुना नं. 8 अ चे अर्ज दाखल करावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र युवा मतदारांनी आपली मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****


No comments: